मुंबई दि. ८ जून – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एनडीए’ची बैठक दिल्ली येथे बुधवार दिनांक १० जून रोजी बोलावली असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा २७ वा वर्धापन दिन गुरुवार दिनांक ११ जून रोजी दुपारी २ वाजता षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या बैठकीला देशभरातील ‘एनडीए’चे घटक पक्ष आणि त्या घटक पक्षांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि काही सदस्य उपस्थित राहणार आहेत. त्या बैठकीला जाणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने मुख्यमंत्री यांच्यामार्फत आमच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रावहिनी आणि मला बैठकीला उपस्थित राहणे महत्त्वाचे आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.
दोन वर्षापूर्वी जनतेने तिसर्यांदा नरेंद्र मोदी आणि एनडीएला देशाची पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी दिली. सलग तीन वेळा संधी मिळाल्यानंतर देशाची प्रगती… देशाचा विकास… जगभरात युध्दाचे सावट असताना देशाच्या प्रगतीत तितकीच केलेली वाढ अशा या दोन वर्षे पूर्ततेचा एक आढावा किंवा बैठक ही आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.
दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीनंतर एनडीएच्या बैठकीत सहभागी झालो होतो. अशावेळी नरेंद्र मोदींचा गौरव तर आहेच एनडीएच्या भक्कमपणाने… देशात एकसंघपणाने जी वाटचाल होतेय त्या कुशल पुढील वाटचालीचेसुध्दा त्या बैठकीत मंथन होऊ शकते हेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.
त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचा २७ वा वर्धापन दिन हा गुरुवार दिनांक ११ जून रोजी दुपारी २ वाजता षण्मुखानंद सभागृहात म्हणजे जिथे नियोजित केला होता तिथेच फक्त तारखेमध्ये बदल करण्यात आला आहे. याची माहिती राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माझ्या सर्व सहकार्यांना कळावी म्हणून ही पत्रकार परिषद घेतल्याचे सुनिल तटकरे यांनी सांगितले.
दादांच्या दुर्दैवी निधनानंतर आम्ही वर्धापन दिन साजरा करत आहोत. अतिशय संयमाने… धिरोदत्तपणाने राष्ट्रीय अध्यक्षपदाची… उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे सुनेत्रा वहिनींनी हाती घेतल्यानंतर या कालखंडात पक्षाची उभारणी सुरू आहे. सन २०२९ मध्ये एनडीए म्हणून आम्हाला सामोरे जायचे आहे. मधल्या कालावधीत काही जिल्हा परिषद निवडणूका झाल्या आणि अजून जिल्हा परिषदेच्या निवडणूका व्हायच्या आहेत. ५० टक्के आरक्षणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयातून आल्यानंतर ऑक्टोबर – नोव्हेंबरकडे या निवडणूका होऊ शकतात. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा वहिनींचा राज्यभरातील दौरा नियोजित करत आहोत. एसआयआरचा कार्यक्रम आम्ही दिला आहे. त्याचबरोबर संघटनात्मक बांधणी बुथ लेव्हलपासून राज्यपातळीपर्यंत ते देशपातळीपर्यंत मजबूत करणे पक्षाचा विस्तार करणे याला अधिक प्राधान्य देणार आहोत असे सांगतानाच सुनिल तटकरे यांनी पक्षाचा २७ वा वर्धापन दिन दादांना समर्पण… संघर्ष आणि संकल्प या विचारासह साजरा करणार आहोत असे स्पष्ट केले.


















