गोरेगाव ते राम मंदिर मार्गावरील मृणालताई गोरे उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असून तब्बल ९० ते ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. हा महत्त्वाचा उड्डाणपूल लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करावा. सुमारे १५२ रुग्णशय्या क्षमतेच्या ओशिवरा प्रसूतिगृह इमारतीचे बांधकाम गुणवत्तापूर्ण पद्धतीने आणि निर्धारित मुदतीत पूर्ण करावे. ओशिवरा स्मशानभूमीच्या प्रलंबित कामांना गती देऊन ती तातडीने मार्गी लावावीत, अशा सूचना उपमहापौर श्री. संजय घाडी यांनी केल्या.
मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी आज (दिनांक २९ मे २०२६) मृणालताई गोरे उड्डाणपूल, ओशिवरा प्रसुतिगृह व ओशिवरा स्मशानभूमीच्या कामांची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी विविध सूचना केल्या.
सहायक आयुक्त (पी उत्तर विभाग) कुंदन वळवी, सहायक आयुक्त (पी दक्षिण विभाग)अनिरुद्ध कुलकर्णी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल पांपटवार यांच्यासह संबंधित महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
प्रसारमाध्यम प्रतिनिधींसमवेत संवाद साधताना श्री. घाडी म्हणाले की, मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपूल (मुख्य पूल) सन २०१६ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. सध्या पुलाच्या विस्ताराचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून विविध पूरक कामांना वेग देण्यात आला आहे. रस्त्याचे पुनर्पृष्ठीकरण (रिसरफेसिंग), दिशादर्शक फलक उभारणे, दिवाबत्ती व्यवस्था, गतिरोधक बसविणे, तसेच रस्त्यावर पांढरे व पिवळे पट्टे आखणे आणि पुलाच्या कठड्यांचे रंगकाम आदी कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. पुलाच्या दोन्ही बाजूंना निवासी इमारती व वसाहती असल्यामुळे नागरिकांना ध्वनीप्रदूषणाचा त्रास होऊ नये, यासाठी दोन्ही बाजूंना ध्वनीरोधक (Noise Barrier) उभारण्यात आले आहेत. तसेच, पुलाची लोड टेस्ट पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी उर्वरित सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत आणि उड्डाणपूल तातडीने वाहतुकीसाठी खुला करावा, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच, रहदारीचे प्रभावी व्यवस्थापन करून परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा, यासाठी प्रशासनाने आवश्यक ती तत्पर कार्यवाही करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
१५२ रुग्णशय्या क्षमतेच्या ओशिवरा प्रसूतिगृह (मॅटर्निटी होम) इमारतीचा विकास प्रकल्प वेगाने सुरू असून अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सज्ज आरोग्यसेवा केंद्र उभारण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये शस्त्रक्रिया विभाग, नवजात बालक अतिदक्षता विभाग (एनआयसीयू), लहान मुलांसाठी एमआयसीयू, डायलिसिस विभाग, सिटी स्कॅन सुविधा, तसेच डॉक्टर व परिचारिकांसाठी निवासी व्यवस्था आदी महत्त्वपूर्ण कामांचा समावेश आहे. या प्रकल्पाच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. इमारतीचे बांधकाम उच्च गुणवत्तेचे व निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यात यावे, तसेच नागरिकांना आधुनिक व दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा स्पष्ट सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.
ओशिवरा स्मशानभूमीतील काही कामे अद्याप अपूर्ण अवस्थेत आहेत. ही सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून परिसरातील नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पुढील पंधरा दिवसांच्या आत स्मशानभूमीतील छोटी-मोठी सर्व कामे पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती उपमहापौर संजय घाडी यांनी दिली.
***




















