Home नाटक / चित्रपट / मालिका / समीक्षा *अश्वत्थामाचे शापित अमरत्व म्हणजे वेदना, पश्चात्ताप आणि न संपणाऱ्या संघर्षाचे प्रतीक!…डॉ. सुनिता...

*अश्वत्थामाचे शापित अमरत्व म्हणजे वेदना, पश्चात्ताप आणि न संपणाऱ्या संघर्षाचे प्रतीक!…डॉ. सुनिता चव्हाण*

9
0

*नाटक : ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’*
*निर्मिती : ऋग्वेद निर्मिती*
*लेखक व दिग्दर्शक : अशोक समेळ*
*मुख्य कलाकार : अशोक समेळ आणि धनश्री प्रधान दामले*
*सूत्रधार : दीपक गोडबोले*
*संगीत : संग्राम समेळ*

अश्वत्थामा.. सप्त चिरंजीवातील एक चिरंजीव! इतर सहा चिरंजीवांचे जगणं हे वरदान आहे परंतु अश्वत्थामाचे चिरंजीवीत्व मात्र शापित आहे. महाभारतातील एक पराक्रमी, युद्धकुशल, उत्कृष्ट धनुर्धर पण शोकांत व्यक्तिमत्त्व! तो गुरु द्रोणाचार्य यांचा जन्मतः कपाळावर दिव्य मणी लाभलेला पुत्र. द्वापार युगात घडलेल्या महाभारतातील कुरुक्षेत्रात पित्याचा कपटी वध केल्यामुळे सूडाने पेटून उठलेल्या या सेनापतीने केलेले कुकृत्य श्रीकृष्णाने परतवले नसते तर पांडवाचा कुलसंहार निश्चित होता. त्याच्या या दुष्कृत्याचे फळ म्हणजे जन्मजात निलमण्याचे वैभव त्याला गमवावे लागले. भळभळणारी जखम घेऊन, तेल शोधत संभ्रमावस्थेत जगणारा हा चिरंजीवी अश्वत्थामा पाच हजार वर्षापुर्वीपासून अस्तंबा पर्वतावर आपले शापित जीवन जगत आहे..हा जीवन प्रवास वाचला होता..*प्रख्यात नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक कादंबरीकार अशोक समेळ* यांच्या *मी अश्वत्थामा चिरंजीव* या महाकादंबरीमध्ये! कादंबरी मनाला भावते…त्यावर आधारित *मी अश्वत्थामा चिरंजीव* हे नाटक ..आणि ती भूमिका प्रत्यक्ष *अशोक समेळ* करत आहेत. नाटक पाहिलं. त्या प्रवासात प्रवाही होऊन समजून…उमजून घेता आलं..कारण..
*८४ वर्षाच्या या अभिनय सम्राटाने ती भूमिका, ती वेदना अक्षरश: जगली आहे..कलाकार कधी संपत नसतो याचं उदाहरण म्हणजे अशोक समेळ !*

*मी अश्वत्थामा चिरंजीव* हे नाटक म्हणजे स्वत्व आणि अस्तित्व यांची ओळख विसरलेल्या अश्वत्थामाचा संभ्रमावस्थेतील प्रवास..येथूनच दोन अंकी नाटकाला सुरुवात होते. स्मृतीभ्रंशापासून स्वत्वाची, आपल्या अस्तित्वाची ओळख होईपर्यंतचा एक भाग आणि त्यानंतर ती वेदना, पश्चाताप आणि शापमुक्त होऊनही ते शापग्रस्त जीवन अजून का जगत आहोत हा जाब विचारण्यासाठी केशवाला भेटण्याची अगतिकता नि श्रीकृष्ण भेट होताच स्वकार्याची जाणीव झाल्याने या कलियुगाचा अंत होऊ नये यासाठी धर्मसंस्थापक म्हणून स्वीकारलेलं आपलं उत्तरदायित्व.. हा प्रवास पाहताना आपण भारावून जातो… अश्वत्थामाच्या भावनेच्या विविध छटा पाहताना त्यांच्या विलक्षण अभिनयाचे अनेक कंगोरे आपल्याला मनमुग्ध करून सोडतात. त्यांची संवादशैली, देहबोली आणि चेहऱ्यावरील हावभाव यांची इतक्या तन्मयतेने उधळण केली आहे की ..आपले मन कारुण्याने भरून जातं..ती वेदनाही आपली होते नि पापण्या ओलावतात…हीच जादू, हीच ताकद आहे समेळांच्या अभिनय क्षमतेची! आणि या अभिनयाबरोबर तितक्याच ताकदीने दुसरे पात्र पेलले आहे धनश्री प्रधान दामले या गुणी अभिनेत्रीने… कमाल केली आहे..जबरदस्त! !
दुसरे पात्र आहे…नियतीचे! जिच्याशिवाय कोणतीच गोष्ट घडत नाही…ती मात्र सोबत करते अश्वत्थामाला..तिची या नाटकात विविध रूपे पाहायला मिळतात..कधी ती अश्वत्थामाची आई आहे तर कधी अर्जुन, द्रौपदी, श्रीकृष्ण आहे तसेच या युगात अश्वत्थामाला भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीचे पात्र तिने अतिशय जबाबदारीने आणि उत्स्फूर्ततेने निभावले आहे… ती व्यक्ती मग गुजराती असो, मराठी असो वा पारशी…प्रत्येकाची बोली, देहबोली नि सशक्त वावर…प्रत्येक पात्र जिवंत होऊन गेले आहे.. इतका सुंदर, उत्कृष्ट अभिनय! समेळांच्या बरोबरीने आपल्या अभिनयाचे अष्टपैलूत्व अधोरेखित करून तिनेही बाजी मारली आहे… अप्रतिम..अनाकलनीय!

हे दोन अंकी नाटक या दोघांनी अतिशय प्रगल्भतेने जिवंत केले आहे. भूतकाळ आणि वर्तमानकाळ यामधील संवाद सेतू सोबतच सूत्रधाराचे निवेदन नि त्यासंग प्रसंगानुरूप पार्श्वभूमी, चित्रफिती आणि संगीत यांच्या सजग समन्वयामुळे अश्वत्थामाचा हा प्रवास केवळ दोन पात्रे असूनही स्मरणात राहतो.. त्रंबकेश्वरातील महादेव असो वा व्यासमुनी असोत वा ऋषी परशुराम असोत…त्यांचे चित्रीकरण पार्श्वभूमीवर असले तरी आपण व्यासांच्या कुटीसमोर उभे आहोत असा थ्री डी आभास नक्कीच होतो, ही जिवंत, सदृश्य कल्पना अचंबित करणारी आहे त्यामुळे नाटकावर जबरदस्त पकड राहते आणि दोन पात्रांपेक्षा अधिक पात्राचा अनुभव आपण यानेत्री पाहतो. अभिनयाबरोबर ही सुसंगती सुद्धा या नाटकाच्या यशाचे गमक आहे.

स्मृतिभ्रंशातून बाहेर पडताना अश्वत्थाम्याचे एकेक स्मृतिदालन उघडते नि स्मृतिपटलावर अश्वत्थामाचे बालपण, आई-वडिलांशी भावनिक नाते, कौरवांच्या अधिपत्याखालील समृद्ध जीवन, पांडवांशी मुख्यतः अर्जुन, द्रौपदी यांच्याशी त्याची मैत्री, सर्वोत्तम धनुर्धर, एकलव्याशी केलेला पक्षपात, शीघ्रकोपामुळे अविवेकी विचाराने पित्याच्या वधाचा सूड घेताना सोडलेले अस्त्र जे पांडवांचा कुलसंहार करणार होते, त्याला श्री कृष्णाने परतवून लावले नि त्या दुष्कर्माची त्याला सजा दिली.. भयानक, वेदनादायी अशा शापित जीवनाची! सोबत होती कपाळावरील निलमणी काढून घेतल्यामुळे झालेली दुर्गंधीयुक्त भळभळणारी जखम! अश्वत्थामाचा हा शापित प्रवास आपल्याला या सर्व प्रसंगातून समजत जातो नि त्याबरोबरच अश्वत्थामा देखील!
अस्तंबा पर्वतावरील त्याचे आताचे वास्तव्य, लोकांना आलेले प्रत्यक्षदर्शी अनुभव हे सर्व पाहताना अश्वत्थामा जिवंत आहे आणि तो अजून का जिवंत आहे याचे आकलन होते..
तो जिवंत आहे याचा अर्थच असा की कलियुगात अजून वेदना, सूड, पश्चाताप जिवंत आहे..आणि या अधर्माला परावृत्त करून धर्मसंस्थापनाचे महत्त् कार्य अश्वत्थामा करतो आहे..तेही आपल्या माथ्यावर आग ओकणारी दाहक जखम घेऊन! अश्वत्थामा जिवंत आहे म्हणून जग जिवंत आहे कारण त्याची वेदना अजून श्वास घेते आहे.

“अश्वत्थामा जिवंत आहे” ही पौराणिक, काल्पनिक कथा आहे असे समजणाऱ्यांनी या शापित गुरूपुत्राचे काळीज पिळवटून टाकणारे हे बोधदायी, प्रेरणादायी नाटक नक्की पहावे..अगदी सहकुटुंब जाऊन पाहावे आणि इतरांनाही उद्युक्त करावे. अशोक समेळ त्यांच्या अभिनय कौशल्याने अश्वत्थामा नजरेसमोर आला नि कैलास लेण्यासारखा हृदयावर कोरला गेला आहे.. अविस्मरणीय!!
—-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here