Home मुंबई *मुंबईच्या खेळाडूंमध्ये ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये तिरंगा फडकवण्याची क्षमता*

*मुंबईच्या खेळाडूंमध्ये ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये तिरंगा फडकवण्याची क्षमता*

16
0

*मुंबई महापौर चषक पॉवरलिफ्टिंग स्पर्धा – २०२६ पारितोषिक वितरण सोहळ्यात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचे उद्गार*

*महापौर स्पर्धांच्या तरतुदीत पाच कोटी रुपयांपर्यंत वाढ करण्याची घोषणा*

मुंबईच्या खेळाडूंमध्ये ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदक पटकावून तिरंगा फडकावण्याची क्षमता आहे, हे मी जाणून आहे. त्यामुळे होतकरू, गुणवान खेळाडूंच्या पाठीशी बृहन्मुंबई महानगरपालिका नेहमी खंबीरपणे उभी राहील, असे उद्गार मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी काढले. तसेच, क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचा उद्देश समोर ठेवून, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापौर चषक तरतुदीमध्ये विविध स्पर्धा मिळून आता एकूण पाच कोटी रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे, अशी घोषणाही महापौरांनी यावेळी केली.

मुंबई शहर पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या वतीने आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सौजन्याने आयोजित ‘मुंबई महापौर चषक पॉवरलिफ्टिंग स्पर्धा – २०२६’ दादर (पश्चिम) स्थित कीर्ती महाविद्यालयात संपन्न झाली. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी मुंबईच्या महापौर रितू राजेश तावडे या बोलत होत्या.

यावेळी डेक्कन एज्युकेशन सोसायटी (पुणे) चे विश्वस्त. ॲड. नील हेळेकर, महाराष्ट्र स्टेट पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सरचिटणीस तथा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्री. संजय सरदेसाई, सहचिटणीस तथा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते संजय माधव, कीर्ती महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल मार्तंड, दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते . दिलीप केळुसकर, मुंबई शहर पॉवरलिफ्टिंग असोसिएशन अध्यक्ष तथा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते महेश पेडामकर, मुंबई शहर पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सचिव तथा जिल्हा क्रीडा पुरस्कार विजेते समीर दळवी, अन्य मान्यवर, क्रीडापटू उपस्थित होते.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना महापौर रितू तावडे यांनी सांगितले की, मुंबईतील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका कटिबद्ध आहे. मुंबईतील क्रीडा मैदानांचा विकास, खेळाडूंसाठी आधुनिक क्रीडा आणि व्यायामाची साधने उपलब्ध करून देणे यांसारख्या विविध योजना अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहेत, असे त्यांनी नमूद केले.

*महिला खेळाडूंच्या उल्लेखनीय सहभागाचे कौतुक*

या स्पर्धेत १०० पुरुष खेळाडूंसोबतच ४७ महिला खेळाडूंनी विविध वजनी गटांत प्रभावी कामगिरी करत आपली ताकद सिद्ध केली. याबाबत बोलताना महापौरांनी नमूद केले की, आजची स्त्री केवळ घरापुरती मर्यादित नसून ती आपल्या जिद्दीच्या बळावर शेकडो किलो वजन उचलून जगासमोर आपली क्षमता सिद्ध करत आहे. एका बाजूला अनुभवी खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला १४७ आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पदक विजेते तसेच उदयोन्मुख खेळाडू उपस्थित आहेतं. हे चित्र पाहून मुंबई व महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीचे भविष्य अत्यंत सक्षम हातात आहे, असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला. आपण स्वतः माजी खो-खो खेळाडू असल्याचा उल्लेख करून, खेळाडूंनी पराभवाला न घाबरता अधिक जोमाने पुढे जावे, असे आवाहनही त्यांनी केले.

स्ट्रॉंग वुमन ऑफ इंडिया श्रीमती रुबी दास यांनी बक्षीस स्वीकारताना दाखवलेल्या खेळाडूवृत्तीबद्दल महापौरांनी विशेष कौतुक केले तसेच आयोजकांचेही आभार मानले.

या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत एकूण १४७ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. त्यामध्ये ४७ महिला व १०० पुरुष खेळाडूंचा समावेश होता. या स्पर्धेच्या अनुषंगाने शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार, दादोजी कोंडदेव पुरस्कार तसेच जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त आजी-माजी खेळाडू व प्रशिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला, हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले. मुंबई शहर पॉवरलिफ्टिंग असोसिएशनने या स्पर्धेचे अत्यंत नेटके आयोजन केले.

*स्पर्धेतील विजेते*

*पुरुष गट*

१) सब ज्युनिअर स्ट्रॉंग बॉय – आयर्न मॅटर (मुंबई शहर)
२) ज्युनिअर स्ट्रॉंग बॉय – विराज पावसकर (उपनगर मुंबई)
३) सीनियर स्ट्रॉंग मॅन – योगेश गुंड (मुंबई शहर)
४) मास्टर स्ट्रॉंग मॅन – राजेश शेटे (मुंबई शहर)

*महिला गट*

१) सब ज्युनिअर गर्ल – सेजल बेलवलकर (उपनगर मुंबई)
२) ज्युनिअर स्ट्रॉंग गर्ल – तन्वी शिंदे (मुंबई शहर)
३) सीनियर स्ट्रॉंग वुमन – सेजल मकवाना (उपनगर मुंबई)
४) मास्टर स्ट्रॉंग वुमन – रुबी दास (मुंबई शहर)
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here