*• संशोधन, माहितीचे विश्लेषण, क्षमता विकास आणि शाश्वत शहरी विकासावर देण्यात येणार भर*
बृहन्मुंबई महानगरपालिका आणि भारतीय व्यवस्थापन संस्था, मुंबई (Indian Institute of Management Mumbai) यांच्यात शहरी प्रशासन, संशोधन, नव उपक्रम आणि क्षमता विकास या क्षेत्रांमध्ये संस्थात्मक सहकार्याचा पाया रचणारा सामंजस्य करार (Mou) सोमवार (दि. २५ मे २०२६) करण्यात आला.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे आणि ‘आयआयएम मुंबई’चे संचालक श्री. मनोज कुमार तिवारी यांनी या करारावर सह्या केल्या. यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, सह आयुक्त (सुधार) श्री. संजोग कबरे, उप आयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उप आयुक्त (विशेष) . विनायक विसपुते, सहायक आयुक्त (बाजार) श्रीमती अलका ससाणे, महानगरपालिकेच्या व्यवसाय विकास विभागाच्या प्रमुख शशी बाला, उप प्रमुख डॉ. सतीश रेवतकर, आयआयएम मुंबईच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी निशा सिंह उपस्थित होत्या.
मुंबईसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या महानगरासमोरील गुंतागुंतीच्या शहरी समस्यांवर प्रभावी उपाय शोधण्यासाठी आयआयएम मुंबई व्यवस्थापन, डेटा विश्लेषण, सार्वजनिक धोरण आदींचा अभ्यास करणार आहे. शैक्षणिक ज्ञान आणि प्रत्यक्ष प्रशासकीय कामकाज यांची सांगड घालून शहर प्रशासन अधिक सक्षम आणि परिणामकारक करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच शहरी प्रशासन, महानगरपालिका वित्तव्यवस्था, पायाभूत सुविधा नियोजन आणि सार्वजनिक प्रशासन यांसंदर्भात संयुक्त अभ्यास करण्यात येणार आहे. त्यातून धोरणात्मक शिफारसी आणि मार्गदर्शक अहवाल तयार करण्यात येतील. महानगरपालिकेतील पेपेरलेस कारभाराला तसेच डिजिटल कार्यपद्धतीला गती देण्यासाठी देखील हा करार महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.
महानगरपालिका अधिकाऱ्यांसाठी शहरी व्यवस्थापन, पीएम गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनशी सुसंगत भू-अवकाशीय पायाभूत सुविधांचे नियोजन, सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) प्रशासन व जोखीम व्यवस्थापन तसेच सार्वजनिक खरेदी आणि करार व्यवस्थापन या विषयांवरील विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. यासोबतच घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा व्यवस्था, आरोग्य, नागरिकाभिमुख सेवा या महानगरपालिका सेवांची कार्यक्षमता वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.
या करार अंतर्गत पूर व्यवस्थापन, हवामान बदलाशी जुळवून घेणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे, पर्यावरणीय शाश्वतता आणि परिपत्र अर्थव्यवस्था (Circular Economy) या विषयांवर संयुक्त प्रकल्प राबविण्यात येतील. आयआयएम मुंबईच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रकल्प, इंटर्नशिप, क्षेत्रभेटीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या उपक्रम अंतर्गत ‘बृहन्मुंबई महानगरपालिका आणि आयआयएम मुंबई अर्बन इनोव्हेशन सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करण्याचीही संकल्पना मांडण्यात आली आहे. गतिशीलता, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा आणि डिजिटल प्रशासनातील नाविन्यपूर्ण उपाययोजनांची चाचणी याद्वारे केली जाणार आहे.
या कराराच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आयआयएम मुंबईचे संचालक आणि महानगरपालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती प्राधान्य प्रकल्प निश्चित करणे, प्रगतीचे परीक्षण करणे आणि त्रैमासिक आढावा घेण्याचे काम करणार आहे.
मुंबईतील नागरिकांच्या बदलत्या गरजांनुसार शाश्वत शहरी उपाय विकसित करण्यासह शैक्षणिक संस्था आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यातील अर्थपूर्ण सहकार्याचे हे मॉडेल देशपातळीवर आदर्श ठरेल, असा विश्वास महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी यावेळी व्यक्त केला. हा सामंजस्य करार शैक्षणिक उत्कृष्टता आणि नागरी नेतृत्व यांचा प्रभावी संगम असल्याचे आयआयएम मुंबईचे संचालक मनोज कुमार तिवारी यांनी सांगितले.
***



















