Home नाटक / चित्रपट / मालिका / समीक्षा *‘रंगकर्मी क्रिकेट लीग मध्ये ‘स्टार मराठा’ ठरली विजेती*

*‘रंगकर्मी क्रिकेट लीग मध्ये ‘स्टार मराठा’ ठरली विजेती*

22
0

मंगेश सांगळे फाउंडेशन प्रस्तुत ‘रंगकर्मी क्रिकेट लीग २०२६’ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात १४ व १५ मे रोजी परळ येथील सेंट्रल रेल्वे ग्राऊंडवर पार पडली. मराठी मनोरंजन विश्वातील कलाकार, तंत्रज्ञ आणि रंगकर्मी यांच्या सहभागामुळे स्पर्धेला विशेष रंगत आली होती. दोन दिवस रंगलेल्या या क्रिकेट स्पर्धेत रोमांचक सामने, चौकार-षटकारांची आतषबाजी आणि खेळाडूंचा उत्साह प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरला. विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी ‘रंगकर्मी क्रिकेट लीग २०२६’ला विशेष उपस्थिती लावत खेळाडूंचा उत्साह द्विगुणित केला.

या स्पर्धेत हरीश दुधाडे यांच्या नेतृत्वाखालील ‘स्टार मराठा’ संघाने शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात संघाने दमदार खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. तर संचित यादव यांच्या नेतृत्वाखालील ‘वीर मराठा’ संघाने उपविजेतेपद मिळवले.

स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी दाखवलेला संघभावना, मैत्री आणि क्रीडाभाव यांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. ‘रंगकर्मी क्रिकेट लीग’मुळे रंगकर्मींच्या नात्यांना नवी ऊर्जा मिळाल्याची भावना सहभागी कलाकारांनी व्यक्त केली.

‘रंगकर्मी क्रिकेट लीग’मध्ये ६ संघ सहभागी झाले होते आणि त्या संघांचे नेतृत्व लोकप्रिय कलाकारांकडे सोपविण्यात आले होते. अभिनेता विजय पाटकर यांच्या नेतृत्वाखाली ‘मराठा रायझिंग’, तर संचित यादव यांच्या नेतृत्वाखाली ‘वीर मराठा’ संघ मैदानात उतरला होता. तसेच नुपूर दुधवडकर यांनी ‘मर्द मराठा’ संघाची धुरा सांभाळली होती. हरीश दुधाडे यांनी ‘स्टार मराठा’ संघाचे नेतृत्व केले होते, तर कांचन पगारे ‘मराठा शिलेदार’ आणि सागर कारंडे ‘मराठा वॉरियर’ संघाचे नेतृत्व करताना दिसले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here