Home मुंबई *मुंबई महानगरात शुक्रवार, दि. १५ मे २०२६ पासून १० % पाणी कपात*

*मुंबई महानगरात शुक्रवार, दि. १५ मे २०२६ पासून १० % पाणी कपात*

33
0

*• जलाशयांमधील पाणीसाठा घटल्याने खबरदारी म्हणून मुंबई मनपा प्रशासनाचा निर्णय*

*• सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन*

मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने, हा पाणीसाठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा यादृष्टीने खबरदारीचा उपाय तसेच भारतीय हवामान खात्याने पुढील वर्षी येणाऱ्या अल निनो व आयओडी बाबत वर्तवलेला अंदाजानुसार कमी मान्सून प्रमाण लक्षात घेता जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार मुंबई महानगरात शुक्रवार, दि. १५ मे २०२६ पासून १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. मुंबईकर नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे विनम्र आवाहन देखील बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

सोमवार, दि. ११ मे २०२६ रोजीची आकडेवारी लक्षात घेता, मुंबईस पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये मिळून एकूण ३ लाख ४० हजार ३९९ दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. वार्षिक १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटरच्या तुलनेत सध्या २३.५२ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. पाणीसाठ्यावर महानगरपालिका प्रशासनाचे अत्यंत बारकाईने लक्ष असून दररोज नियोजनपूर्वक पाणीपुरवठा केला जात आहे.

एवढेच नव्हे तर, भातसा धरणातील निभावणी साठ्यातून १,४७,०९२ दशलक्ष लीटर तर अप्पर वैतरणा धरणातील निभावणी साठ्यातून ९०,००० दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणीसाठा मुंबईला मिळणार आहे. याचाच अर्थ मुंबईसाठी पाणीसाठा उपलब्ध असून मुंबईकर नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही.

असे असले तरी, अलीकडे वाढलेले तापमान, पर्यायाने वाढणारे बाष्पीभवन आणि पाणीसाठा १० टक्केपेक्षा कमी झाल्यानंतर यापुढेही पाणीपुरवठा नियोजनपूर्वक करता यावा, या सर्व पैलूंचा विचार करून, खबरदारीचा उपाय म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने १० टक्‍के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका व इतर गावांना जो पाणीपुरवठा केला जातो, त्यात देखील शुक्रवार दि १५ मे २०२६ पासून १० टक्के पाणीकपात लागू राहणार आहे. समाधानकारक पर्जन्यमान होऊन जलाशयांमधील उपयुक्त साठ्यामध्ये सुधारणा होईपर्यंत ही पाणी कपात लागू राहणार आहे.

*पाण्याचा अपव्यय टाळावा-*

– दैनंदिन जीवनात पाण्याचा काटकसरीने वापर करणे, त्याचा अपव्यय टाळणे शक्य आहे. यासाठी पाणी बचतीच्या सवयी अंगीकाराव्यात.

-आवश्यक तितकेच पाणी पेल्यामध्ये घेवून प्यावे. आंघोळीसाठी शॉवरचा उपयोग न करता बादलीमध्ये पाणी घेवून आंघोळ केल्याने पाण्याची मोठी बचत होते. नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळावे.

घरकामे करताना पाण्याचे नळ वाहते ठेवू नका. त्याऐवजी भांड्यांमध्ये पाणी घेवून कामे उरकावीत.

वाहने धुण्यासाठी नळी न लावता भांड्यामध्ये पाणी घेवून ओल्या कापडाने वाहने पुसणे सहज शक्य असते. घरातील लादी, गॅलरी, व्हरांडा, जिने आदी धुवून काढण्याऐवजी ओल्या फडक्याने पुसून घ्या. आदल्या दिवसाचे पाणी शिळे समजून फेकू नका.

वॉशिंग मशीनमध्ये एकाचवेळी शक्य तेवढे कपडे धुतल्यास, मशीनचा पर्यायाने पाण्याचा वापर कमी होवू शकतो.

नळ तसेच वॉश बेसिनचे नळ यांचा प्रवाह मर्यादीत करणाऱया किंवा तुषार स्वरुपात पाणी प्रवाहित करणाऱया तोटी (नोझल) बाजारात सहज उपलब्ध असतात. नळांना अशा प्रकारची तोटी लावून पाण्याची तब्बल दोन तृतीयांश बचत करणे शक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी त्याचप्रमाणे सर्व हॉटेल्स, उपाहारगृहे यांनी त्याचा वापर करावा.

उपाहारगृहे, हॉटेल्समध्ये ग्राहकांना आवश्यक असेल तेव्हाच पेल्यांमध्ये पाणी द्यावे. अथवा पाण्याची बाटली पुरवावी. जेणेकरुन अकारण पाण्याने भरुन ठेवलेल्या पेल्यांचे पाणी वाया जाणार नाही.

सर्व घरांमध्ये, गृहनिर्माण संस्थांमध्ये पाण्याची यंत्रणा, वाहिन्या तपासाव्यात. कोठेही गळती आढल्यास तात्काळ दुरुस्ती करुन घ्यावी, यातून पाण्याची बचत देखील होते व पाणी दूषित होत नाही.

छतावरील पाण्याच्या टाक्या भरताना त्या ओसंडून वाहणार (ओव्हरफ्लो) नाहीत, याची दक्षता घेणे आवश्यक आहे.

ज्या-ज्या ठिकाणी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो, त्या सर्व व्यावसायिक व वाणिज्यिक आस्थापनांनी देखील पाण्याचा अपव्यय टाळून बचत करता येईल, अशा कार्यपद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे.

एकूणच, पाणी बचतीच्या उपाययोजना अंगीकारणे सहज शक्य आहे. त्याचा अवलंब करुन मुंबईकरांनी शक्य तितकी पाणीबचत करावी, पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा, महानगरपालिका प्रशासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here