*दहा एकर क्षेत्रावर प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव*
*आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प उभारावा;सखोल अभ्यास करून पुढील कार्यवाही करण्याचे मंत्री राणे यांचे निर्देश*
*आमदार विक्रांत पाटील यांच्या निवेदनावर बैठकीत चर्चा*
मुंबई
पनवेल येथील मत्स्य उपकेंद्रात प्रस्तावित ‘स्कायला अॅक्वेरियम व सी लायन मनोरंजन केंद्र’ प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा उभारण्यासाठी सर्वंकष अभ्यास करून नियोजन करण्यात यावे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.
आमदार विक्रांत पाटील यांच्या प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकल्पाबाबत आज मंत्रालयात बैठक पार पडली. प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा उभारण्यात आला, तर देश-विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणावर आकर्षित होतील. त्यामुळे या संकल्पनेचा सखोल अभ्यास करून पुढील कार्यवाही करावी, असेही मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले.
बैठकीत आमदार विक्रांत पाटील यांनी प्रकल्पाबाबत सविस्तर मांडणी करत आवश्यक निधी व प्रशासकीय सहकार्याची मागणी केली. त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले की, पनवेल येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत असलेले मत्स्य उपकेंद्र समुद्रमुखाजवळ (estuary) स्थित असून सागरी व अंतर्जल परिसंस्थेच्या संवर्धनासाठी अत्यंत उपयुक्त आहे. या ठिकाणी सुमारे १० एकर क्षेत्रावर ‘स्कायला अॅक्वेरियम व सी लायन मनोरंजन केंद्र’ उभारण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पात जागतिक दर्जाचे सागरी व गोड्या पाण्यातील जीवसृष्टी प्रदर्शन तसेच सी लायन शोसारखे आकर्षक उपक्रम समाविष्ट करण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे.
या बैठकीस मत्स्यव्यवसाय विभागाच्या आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, महाराष्ट्र मत्स्यउद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.















