*महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास बदलण्याचा भाजपाचा डाव, प्राण गेला तरी शिव, शाहु, फुले व आंबेडकरांचा महाराष्ट्र कोणाला बदलू देणार नाही.*
*बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसच्या शिवसन्मान अन्नदाता संघर्ष पदयात्रेला मोठा प्रतिसाद!
मुंबई/बुलढाणा
काँग्रेस आघाडीचे सरकार असताना शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत केली जात होती. शेतकरी कर्जमाफी करण्यात आली. कोणतीही नैसर्गिक आपत्ती ओढवली तरी काँग्रेस सरकार शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जात परंतु २०१४ पासून केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता आल्यापासून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम भाजपा सरकारने केले आहे. शेतमालाला भाव नाही व दुसरीकडे शेती साहित्य महाग झाल्याने शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. महाराष्ट्रात दर तीन तासाला एक तर दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या होत आहेत आणि त्याला सर्वस्वी नरेंद्र व देवेंद्र यांचे सरकारच जबाबदार आहे, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली आज बुलढाणा जिल्ह्यातील मानेगाव ते जळगाव जामोद अशी शिवसन्मान शेतकरी संघर्ष पदयात्रा काढण्यात आली. यावेळी प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे, हनुमंत पवार यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पदयात्रेच्या सांगता सभेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा सरकारवर तोफ डागली, ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्याच्या सोयाबीन, कापूस, कांदा, तूर, हरभरा, धानाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल आहे, एकीकडे आस्मानी संकट तर दुसरीकडे सुलतानी संकटात तो अडकला आहे आणि देशातील व राज्यातील भाजपा सरकार मात्र शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही. एपस्टिन फाईलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचे नाव आहे, त्याच्या जोरावरच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ब्लॅकमेल करत आहेत, मोदी अमेरिकेसमोर सरंडर झाले आहेत आणि त्यातूनच अमेरिकेबरोबर नरेंद्र मोदींनी दबावाखाली व्यापारी करार केला, त्याचा मोठा परिणाम भारतातील शेतकऱ्यांवर होणार आहे. या करारामुळे भारतातील शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळणार नाही आणि शेतकरी देशोधडीला लागेल, हे पाप भाजपा सरकारने केले आहे. तर काँग्रेस पक्षाने मात्र शेतकऱ्यासाठी संघर्षाची भूमिका घेतली आहे, बळीराजाचे राज्य आणेपर्यंत काँग्रेस स्वस्थ बसणार नाही असे सपकाळ म्हणाले.
भाजपा व संघ परिवारातील लोक सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करत आहेत. छत्रपतींचा इतिहास विकृत करण्याचे काम केले जात आहे गोलवलकर, सावरकर यांच्यापासून भगतसिंह कोश्यारी, राहुल सोलापूरकर, कोरटकर यांच्यासारख्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला पण त्यांच्यावर कारवाई मात्र केली नाही. पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास विरोध करणारे संघ विचाराचे लोक होते, सावित्रीबाईंनाही याच विचाराने विरोध केला, आणि त्याच विचाराचे फडणवीस आज सत्तेत आहेत. परंतु प्राण गेला तरी शिव, शाहु, फुले व आंबेडकरांचा महाराष्ट्र कोणाला बदलू देणार नाही, असा इशारा सपकाळ यांनी दिला.
पाच राज्याच्या निवडणुकीचे निकालानंतर भाजपाने महाराष्ट्रात फटाके फोडून विजयाचा जल्लोष केला, राज्यात तर तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या होत आहे, महिलांवर दररोज अत्याचार होत असताना फटाके फोडून जल्लोष करताना भाजपाला लाज कशी वाटत नाही, असा संतप्त सवाल करत ममता बॅनर्जींना पराभूत करण्यासाठी भाजपाने सर्वशक्ती पणाला लावली. निवडणूक आयोग व सुप्रीम कोर्टही मैदानात उतरले आणि सर्वांनी मिळून पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव केला असेही सपकाळ म्हणाले.
यावेळी राहुल बोंद्रे, हनुमंत पवार यांनीही भाजपा सरकारवर हल्लाबोल केला.
















