Home मुंबई *कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता, शेतकऱ्यांना...

*कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या: हर्षवर्धन सपकाळ*

9
0

*राजू शेट्टींनी कोकणातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सुरु केलेल्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा.*

*स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी घेतली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट*

मुंबई

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही मदत केली नाही. ग्लोबल वॉर्मिंगचा मोठा फटका कोकणातील शेतकऱ्यांना बसल्याने ते हवालदिल झाले आहेत, त्यांना भरीव मदत करण्याची गरज आहे. शेतकरी जगला पाहिजे ही काँग्रेसची भूमिका असून कोकणच्या शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरु केलेल्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असून या आंदोलनात काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी होतील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज गांधी भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन कोकणातील शेतकऱ्यांसाठी सुरु असलेल्या आंदोलनाची माहिती दिली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी आ. बाळ माने व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी ही उपस्थित होते. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, कोकणातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून उद्योगपतींना मात्र मोकळे रान करून दिले जात आहे. शक्तीपीठ महामार्गाची काहीही गरज नसताना व कोणीही त्याची मागणी केली नसताना केवळ लाडक्या उद्योगपतींना गडचिरोलीतील खजिन संपत्ती लुटून थेट गोव्याच्या समुद्री किनारी सुरळीत वाहतुक करता यावी यासाठी मध्य भारतातून गोव्यापर्यंत हा महामार्ग आखला आहे, या शक्तीपीठ महामार्गाला काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध आहे असेही सपकाळ म्हणाले..

*कोकणच्या शेतकऱ्यांसाठी ‘वर्षा’वर धडक मोर्चा…*

माजी खासदार राजू शेट्टी यावेळी म्हणाले की, कोकणातील आंबा व काजू उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले असून खर्च मात्र जास्त होत आहे, ग्लोबल वॉर्मिंगचा फटका या शेतकऱ्यांना बसला आहे. आंब्याच्या एका कलमाला वर्षाला ३८०० ते ४००० रुपये खर्च येतो, मजुराला दिवसाला ८०० रुपये द्यावे लागतात आणि सरकारने मात्र एका कलमाला फक्त २०० रुपये नुकसान भरपाई दिली आहे, ही मदत अत्यंत तुटपुंजी आहे. एनडीआरएफ मधून तसेच राज्य सरकारने भरीव मदत दिली पाहिजे, विमा कंपन्यांनीही नुकसान भरपाई दिली नाही. कोकणातील शेतकऱ्याला भरीव मदत मिळावी यासाठी आंदोलन सुरु असून १८ तारखेला रत्नागिरीत पुढील आंदोलनासंदर्भात मेळावा होणार आहे. सरकारने भरीव मदत दिली नाहीतर मुंबईत शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन केले जाईल. गिरगावपासून वर्षा बंगल्यावर धडक मोर्चा काढला जाईल.” असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला. “कोकणातील शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला आहे तसा इतर पक्षांनीही द्यावा.”असे आवाहनही राजू शेट्टी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here