Home पुणे *“लता म्हणजे आयुष्याची वेल,आशा म्हणजे जगण्याची उमेद”*

*“लता म्हणजे आयुष्याची वेल,आशा म्हणजे जगण्याची उमेद”*

8
0

*मंगेशकर नावाने उभा राहणार अत्याधुनिक वैद्यकीय प्रकल्प; सरकारकडून पुर्ण सहकार्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही*

*मोहन भागवत यांच्या हस्ते ‘लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’चा कोनशीला समारंभ संपन्न*

पुणे, ता. १६ :
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची कोमल, सुकुमार वेल असून आशा भोसले म्हणजे त्या वेलीला मिळालेली जगण्याची आशा आहे. आयुष्याच्या या वेलीला जेव्हा आशेची जोड मिळते, तेव्हा ती अधिक बहरते, अधिक सक्षम होते. असाच हा लता-आशांचा संगम असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हे रुग्णालयही त्यांच्या नावाप्रमाणेच रुग्णांना केवळ उपचारच नाही, तर नव्या आयुष्याची आशा देणारे ठरेल.”असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

पुण्यात लता आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या कोनशिला समारंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते संपन्न झाला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी भावनिक आणि प्रभावी भाषण करत आरोग्यसेवा, समाजसेवा आणि मंगेशकर कुटुंबाच्या वारशाचा संगम अधोरेखित केला.

या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंगेशकर कुटुंबाचे सदस्य पंडित हृदयनाथ मंगेशकर, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, आनंद भोसले, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांच्यासह अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी, आमदार आणि नागरिक उपस्थित होते.

आपल्या भाषणाच्या सुरुवातीला शिंदे यांनी लता मंगेशकर आणि आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत, “त्यांचं निधन झालं नाही, त्यांनी स्वरसमाधी घेतली आहे; जोपर्यंत आकाशात चंद्र-सूर्य आहेत, तोपर्यंत त्यांचा स्वर अजरामर राहील,” असे सांगितले.
आशाताईंच्या संघर्षमय जीवनाचा उल्लेख करत त्यांनी नमूद केले की, अनेक अडचणींना सामोरं जाऊनही त्यांनी कधी दुःख व्यक्त केले नाही, तर आयुष्याचं आनंद गाणं केलं आणि म्हणूनच त्या प्रत्येकासाठी प्रेरणास्थान आहेत असे सांगितले.

पुढे बोलताना शिंदे यांनी सांगितले की, “आशाताईंनी लाडकी बहीण योजनेचे मनापासून कौतुक करत १५०० चं महत्त्व अधोरेखित केलं होतं. त्यांनी गरजू महिलांच्या अडचणी समजून घेत स्पष्टपणे सांगितले होते की अशा मदतीमुळे किमान दोन वेळचं अन्न मिळू शकतं.” याच वेळी त्यांनी अजित पवार यांच्या आठवणींनाही उजाळा देत, “महाराष्ट्राचं कधीही न भरून येणारं नुकसान झालं आहे; त्यांच्या आठवणींशिवाय एकही दिवस जात नाही,” अशा शब्दांत श्रद्धांजली वाहिली.

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गेली २५ वर्षे लाखो रुग्णांसाठी संजीवनी ठरल्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, आता उभारल्या जाणाऱ्या लता-आशा मंगेशकर मेडिकल इन्स्टिट्यूटमुळे हजारो रुग्णांना जीवनदान मिळणार असून अनेक कुटुंबांचे दुःख दूर होणार आहे. “आजचा दिवस फक्त पुण्यासाठी नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे,” असे म्हणाले. यावेळी त्यांनी प्रभावी शब्दांत सांगितले की, “काही वेळा रुग्णाला फक्त दवा नाही, तर दुवा देखील लागते; लतादीदी आणि आशाताईंचे स्वर हीच ती दुवा आहे,” आणि या रुग्णालयात औषधोपचारांसोबत मानवी संवेदनांचा स्पर्श मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

याच अनुषंगाने त्यांनी रुग्णालयात म्युझिक थेरपी विभाग सुरू करण्याचा अभिनव प्रस्ताव मांडत, लता-आशांच्या सुरेल स्वरांमुळे रुग्णांच्या मनावर सकारात्मक परिणाम होईल, असे सांगितले. संगीताच्या माध्यमातून मनावर उपचार आणि आधुनिक वैद्यकीय सुविधांमधून शरीरावर उपचार असा दुहेरी लाभ येथे मिळू शकतो, अशी कल्पना त्यांनी मांडली. तसेच मंगेशकर कुटुंबाचा संगीत वारसा जतन करणारे संग्रहालय उभारण्याची संकल्पना मांडत, हा प्रकल्प केवळ रुग्णालय न राहता संस्कृती आणि सेवेचा संगम ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की, “नागपूर, ठाणे, चंद्रपूर आणि इंदूर येथे विविध आरोग्य प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले असून अशा उपक्रमांमागे समाजात सेवाभाव निर्माण करण्याचा आणि राष्ट्र निरोगी करण्याचा व्यापक विचार असतो. ‘आरोग्य आणि शिक्षण हेच खऱ्या अर्थाने राष्ट्रकार्य आहे,’ ” हा संदेश त्यांनी अधोरेखित असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.

शेवटी “मंगेशकर कुटुंबाने सुरू केलेल्या रुग्णसेवेच्या कार्याला राज्य सरकारकडून संपूर्ण सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही देत त्यांनी सांगितले की, या प्रकल्पामुळे हजारो रुग्णांच्या आयुष्यात नवसंजीवनी निर्माण होईल. लता दीदी आणि आशाताई आज आपल्यात नसल्या तरी या भव्य प्रकल्पाच्या माध्यमातून त्या लाखो रुग्णांच्या जीवनात ‘सूरसंजीवनी’ बनून कायम राहतील.” असा विश्वास व्यक्त करत त्यांनी भाषणाचा समारोप केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here