*• लोकप्रतिनिधींशी सातत्यपुर्ण संवाद ठेवा, विविध कामकाज सद्यस्थिती लोकांपर्यंत पोहोचवाव्यात*
*• विविध व्यवसायांच्या गरजा लक्षात घेऊन पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यावर भर द्यावा*
मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरू आहेत. हे रस्ते दीर्घकालीन वापरात येण्याच्या दृष्टीने तसेच यावरील वाहतुकीच्या अनुषंगाने रेल्वेच्या धर्तीवर आदर्श संचालनात्मक नियमावली (Model Operational Norms) तयार करावी. यामध्ये रस्त्यांच्या देखभालीसोबतच पुढील १० वर्षांमध्ये वाहतुकीत होणारे बदल, दुरुस्ती व देखभाल, उपयोगिता आणि अन्य बाबींचा समावेश करावा. मुंबईत कार्यरत विविध व्यवसायांच्या गरजा लक्षात घेऊन पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यावर भर द्यावा. माननीय नगरसेवक आणि अन्य लोकप्रतिनिधींशी सातत्यपूर्ण संवाद ठेवून स्थानिक बाबींसंदर्भात त्यांच्या सूचना जाणून घ्याव्यात. नाल्यांतील गाळ काढणे, रस्त्यांच्या कामकाजांची सद्यस्थिती आदी माहिती लोकापर्यंत पोहोचवाव्यात. तसेच, महानगरपालिकेच्या उत्तम दर्जाच्या मूलभूत सेवा लोकाभिमूख पद्धतीने उपलब्ध करण्यावर (Back to Basics) भर द्यावा, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व विभागांची मासिक आढावा बैठक शनिवार दि. ११ एप्रिल रोजी महानगरपालिका मुख्यालयात पार पडली. त्यावेळी भिडे बोलत होत्या.
दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईत अनेक मोठे प्रकल्प, विकासकामे हाती घेतली आहेत. यामध्ये विविध प्राधिकरणाच्या यंत्रणा कार्यरत आहेत. या यंत्रणांशी योग्य समन्वय राहावा. प्रशासकीय विभाग (वॉर्ड) आणि अन्य यंत्रणांमध्ये सुसंवाद प्रस्थापित व्हावा. तसेच, वेगवेगळ्या नाविन्यपुर्ण बाबींचा आढावा घेण्याच्या उद्देशाने प्रत्येक महिन्यात एका शनिवारी बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असेही भिडे यांनी स्पष्ट केले. तसेच, आढावा बैठकीत केलेल्या चर्चेनुसार संबंधीत कार्यपुर्तीचा अहवालही या बैठकीत घेतला जाईल. बृहन्मुंबई महानगरपालिका ही नागरी सेवासुविधा पुरविण्याचे काम करते. मात्र, आता त्यापुढे जाऊन (Beyond Basics) आपल्याला काम करायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, सह आयुक्त (दक्षता) डॉ. एम. देवेंदर सिंह यांची यावेळी उपस्थिती होती. तसेच, सर्व सह आयुक्त, उप आयुक्त, सहायक आयुक्त, खाते प्रमुख आदी या बैठकीस उपस्थित होते.
*माननीय लोकप्रतिनिधी स्थानिक समस्या समोर आणतात, त्यांच्याशी सातत्याने संवाद ठेवावा व त्यांना नियमितपणे माहिती द्यावी*
विविध समस्यांबाबत माननीय नगरसेवकांनी सभागृहात केलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्टपणे निर्देशित केले की, जनतेच्या समस्या आणि स्थानिक स्तरावरील वस्तुस्थिती योग्यप्रकारे समोर आणण्याचे काम लोकप्रतिनिधी करत असतात. त्यामुळे, प्रत्येक अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी सातत्याने संवाद ठेवून त्यांना आपल्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या नाल्यांतून गाळ काढणे, स्वच्छता किंवा अन्य संबंधित कामकाजांच्या सद्यस्थितीबाबत नियमितपणे माहिती देत राहावी. स्थानिक नगरसेवकांकडून आलेल्या सूचना, प्रतिक्रियांचे पालन होईल, यासाठी सहायक आयुक्त यांनी प्रयत्न करावेत. सातत्यपुर्ण संवाद आणि त्यात पारदर्शकता ठेवल्यास आपापसांतील समन्वय प्रभावी होतो. प्रशासनाने स्वत:हून सक्रियपणे आणि वस्तुनिष्ठपणे सातत्याने माहिती उपलब्ध करून दिल्यामुळे कोविडमध्ये आपण यशस्वी ठरू शकलो. आताही त्याच सक्रियतेने काम करावे, असे आवाहन भिडे यांनी यावेळी केले.
*काम पुर्ण न झालेले रस्ते पावसाळ्यादरम्यान वाहतुकीसाठी सुलभ व सुरक्षित राहतील, याची दक्षता घ्यावी*
मुंबईतील रस्त्यांच्या कामांबाबत बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर, अश्विनी भिडे म्हणाल्या, सध्या सुरू असलेली रस्त्यांची कामे सुमारे ७० टक्क्यांपेक्षा अधिक झाली असल्यास ती १ जुनपुर्वी पुर्ण झालीच पाहिजे. सुरू असलेली कामे दिलेल्या विहित मुदतीत पूर्ण करून वाहतुकीसाठी सुरळीत राहतील, याची दक्षता घ्यावी. रस्त्यांवरील खड्डयांच्या बाबतीत सकारात्मक निष्कर्ष असून मागील तीन वर्षांत खड्ड्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. तसेच, याबाबत होणारा खर्चही सातत्याने कमी होत आहे, असेही त्यांनी सांगितले.
*नाल्यांतून गाळ काढण्याच्या कामांच्या सद्यस्थितीची माहिती नियमितपणे लोकांपर्यंत पोहोचवा*
बृहन्मुंबई क्षेत्रातील लहान-मोठ्या नाल्यांतील गाळ काढण्याचे काम वेगाने सुरू आहे. याचा प्रशासकीय विभागनिहाय (वॉर्ड) आढावा बैठकीत घेण्यात आला. यावेळी भिडे म्हणाल्या, नाल्यांतून गाळ काढण्याची कामांची सद्यस्थिती माननीय नगरसेवक, लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांपर्यंत दैनंदिन स्वरुपात पोहोचवावी. जेणेकरुन, त्यांना दैनंदिन कामाची स्थिती कळेल. त्यावर त्यांच्या काही सूचना असतील तर त्याही प्रशासनापर्यंत पोहोचतील. तसेच, नाले स्वच्छतेची माहिती महानगरपालिका समाजमाध्यमांद्वारे नागरिकांच्या माहितीसाठी प्रसारित करावे.
*पाणी साचण्याच्या ठिकाणांवर दीर्घकालीन उपाययोजनेसाठी आतापासूनच आराखडा तयार करा*
पावसाळा पुर्वतयारी आणि उपाययोजनांबाबत बैठकीत चर्चा झाली. यामध्ये पाणी साचण्याचे संभाव्य ठिकाण, पाणी उपसा करणारी यंत्रणा, पंप आणि अन्य उपकरणांची सुसज्जता यावर विचारविनिमय करण्यात आले. याबाबत महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले की, पाणी साचण्याच्या ठिकाणी महानगरपालिकेकडून कायमच सुसज्जता असते. तथापि, अशा ठिकाणी (Chronic Spot) दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी आतापासूनच आराखडा तयार करावा. त्यावर, यंदा अंमलबजावणी होणे शक्य नसले तरी पुढील वर्षी येणाऱ्या पावसाळ्यापूर्वीपर्यंत काम करता येईल. याबाबत कार्यपद्धती (Workline) निश्चित करून त्यासाठी लागणारा कालावधी ठरवावा. तसेच, कोणत्याही परिस्थितीत एकही मनुष्य प्रवेशिका (Manhole) उघडी राहणार नाही, याची कटाक्षाने काळजी घ्यावी. पावसाळ्यापूर्वी प्रवेशिकांना जाळ्या लागायला हव्यात. जेणेकरुन, कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही. दरम्यान, मुंबईत मोठ्या प्रकल्पांची कामे सुरू असताना महानगरपालिकेच्या विविध सेवा-सुविधा वाहिन्या सुस्थितीत असल्याची खात्री संबंधित अधिकाऱ्यांनी करून घ्यावी.” असे निर्देशही त्यांनी दिले.
*विविध व्यवसायांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्मितीचा विकास नियोजनात समावेश असावा*
विकास नियोजन आराखड्यात विविध बाबींसाठी आरक्षित भूखंड आणि सद्यस्थितीबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानंतर भिडे म्हणाल्या, ऑनलाइन खाद्यपदार्थ विक्री, गिग वर्कर्स आदी नवनवीन क्षेत्र उदयास आली आहेत. ठिकठिकाणी डिलिव्हरी पॉईंट्स उभारले जात आहेत. त्यामुळे, विकास नियोजन करताना केवळ पारंपरिक बाबींचाच विचार न करता या नवनवीन व्यवसाय किंवा क्षेत्रांना महानगरपालिकेकडून संरचनात्मक सहाय्य (Structural Support) देण्यासाठी सोयीसुविधांची निर्मिती करण्याकडेही भर द्यायला हवा. व्यवसायांच्या गरजा जाणून विकास नियोजन करावे. तसेच, विविध सोयीसुविधांसाठी आरक्षित असलेल्या भूखंडांची सद्यस्थिती जाणून घ्यावी आणि जीआयसारख्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यांची स्थाननिश्चिती करावी. सुविधांसाठी आरक्षित भूखंडांबाबत समग्र धोरण तयार करावे.”असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
*स्वच्छतेकडे एखाद्या प्रकल्पाप्रमाणे पाहू नये, अधिकाऱ्यांनी यासाठी स्वयंशिस्त मोडमध्ये यावे*
घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून स्वच्छतेबाबत केल्या जाणाऱ्या विविध कार्यवाही आणि उपक्रमांचा यावेळी आढावा घेण्यात आला. यामध्ये कचऱ्यांबाबत तक्रारी, कचरा संकलन केंद्र, राडारोडा संकलन आदींबाबत चर्चा करण्यात आली. नागरी स्वच्छता ही अत्यंत महत्वाची बाब आहे. स्वच्छतेकडे एखाद्या प्रकल्पाप्रमाणे पाहू नये. ही नियमित स्वरुपातील प्रक्रिया असून अधिकाऱ्यांनी यासाठी स्वयंशिस्त मोडमध्ये यावे. आपल्या भागातील स्वच्छतेची स्थिती जाणून घेण्यासाठी लोकप्रतिनिधींचा सोबत घेऊन सहायक आयुक्त यांनी नियमितपणे विभागांत ठिकठिकाणी भेटी द्याव्यात, असे निर्देश श्रीमती भिडे यांनी यावेळी दिले..
***
















