Home नाटक / चित्रपट / मालिका / समीक्षा *… म्हणून निर्मित सावंत यांनी ‘सुपर डुपर’साठी मकरंद अनासपुरेंची मदत घेतली*

*… म्हणून निर्मित सावंत यांनी ‘सुपर डुपर’साठी मकरंद अनासपुरेंची मदत घेतली*

19
0

मराठी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेत्री निर्मिती सावंत या पुन्हा एकदा त्यांच्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. आगामी ‘सुपर डुपर’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये त्यांच्या तोंडी असलेला रांगडा लहेजा, संवादफेक आणि अस्सल गावाकडचा अंदाज प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे.

या चित्रपटात त्या गावातील एका खंबीर बाईची भूमिका साकारत आहेत. ट्रेलरमध्येच त्यांच्या व्यक्तिरेखेची झलक पाहायला मिळते. घर सांभाळणारी, परिस्थितीशी झुंज देणारी आणि कुटुंबाच्या अस्तित्वासाठी उभी राहाणारी स्त्री. विशेष म्हणजे, या भूमिकेला अधिक वास्तववादी बनवण्यासाठी निर्मिती सावंत यांनी खास मेहनत घेतली आहे.

ग्रामीण भाषेचा नेमका फ्लेवर, रांगडेपणा आणि बोलीभाषेतील बारकावे अचूक साधण्यासाठी त्यांनी मराठी सिनेसृष्टीत स्वतःची एक खास शैली निर्माण करणाऱ्या अभिनेता मकरंद अनासपुरे यांची मदत घेतली.

याबद्दल निर्मिती सावंत म्हणतात, ” ट्रेलरमध्ये दिसतंच आहे की, मी एका गावाकडच्या बाईची भूमिका साकारतेय. तिचं आयुष्य, तिचं जगणं हे खूप वास्तव आहे.
भाषेचा आणि लहेजाचा अचूकपणा यासाठी मी मकरंद अनासपुरेशी संपर्क साधला. अर्थात दिग्दर्शकाच्या परवानगीने. मकरंद त्याच भागातला असल्यामुळे, त्याच्या मार्गदर्शनामुळे त्या बोलीचा रांगडेपणा आणि नैसर्गिकपणा मला समजला. तिथले काही शब्द कसे वापरले जातात , हे कळले. त्यामुळे ही भूमिका अधिक खरी वाटते. अशीच जर मी ती भूमिका साकारली असती तर ‘माझ्या आणखी एक भूमिकेपैकीच’ ती राहिली असती, मात्र आता ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, असं मला वाटतं.”

नवीन वर्षात विविध सुपरहिट चित्रपटांमधून वेगवेगळ्या, लक्षवेधी भूमिका साकारत निर्मिती सावंत यांनी आपली अभिनयाची छाप अधिक गडद केली आहे. ‘सुपर डुपर’मधील त्यांची ही ग्रामीण भूमिका देखील प्रेक्षकांच्या मनात घर करेल, यात शंका नाही.

झी स्टुडिओजची प्रस्तुत, नाईंटी नाईन प्रॉडक्शन्स आणि सिद्धिविनायक प्रॉडक्शन्स निर्मित ‘सुपर डुपर’ हा कौटुंबिक मनोरंजनाचा महासोहळा येत्या ३ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. समीर आशा पाटील दिग्दर्शित ‘सुपर डुपर‘ या चित्रपटाचे विजय शिंदे व नरेश बोर्डे निर्माते आहेत. उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता असून छायांकन संजय जाधव यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here