Home नाटक / चित्रपट / मालिका / समीक्षा *महिला कला महोत्सवात नाट्य-संगीत-नृत्याची बहार, ‘मी कात टाकली’ लावणीने आणली बहार*

*महिला कला महोत्सवात नाट्य-संगीत-नृत्याची बहार, ‘मी कात टाकली’ लावणीने आणली बहार*

39
0

*एक तिची गोष्ट’, ‘तिचे सूर’, ‘संगीत अष्टनायिका’, ‘मुक्ता’ आणि ‘मी कात टाकली’ या कार्यक्रमांनी रंगवली रसिकांची मैफल*

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी यांच्या वतीने आयोजित महिला कला महोत्सव २०२६ अंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात आणि दिमाखात पार पडले. नाट्य, संगीत, नृत्य, साहित्य आणि अभिवाचन यांचा सुरेख संगम घडवून आणणाऱ्या या कार्यक्रमांना प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
‘एक तिची गोष्ट’ या संगीत नाटकाचा रंगतदार प्रयोग रवींद्र नाट्य मंदिर येथे सादर करण्यात आला. प्रसिद्ध नृत्यांगना व अभिनेत्री फुलवा खामकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या नाटकात स्त्रीच्या भावविश्वाची, तिच्या आयुष्यातील विविध टप्प्यांतील अनुभवांची आणि भावनांच्या गुंतागुंतीची संवेदनशील मांडणी करण्यात आली. फुलवा खामकर, आसमा खामकर आणि ओंकार गोखले यांच्या प्रभावी अभिनय व नृत्यसादरीकरणाने नाटकाला विशेष रंगत प्राप्त झाली.

नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर यांचे असून संगीत नियाद गोळंबर यांनी दिले आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या प्रस्तुतित सादर झालेल्या या नाटकाने प्रेक्षकांना भावनिक आणि कलात्मक अनुभव दिला.

तर ‘तिचे सूर’ हा विशेष संगीत कार्यक्रम रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथील लघु नाट्यगृहात पार पडला. महिला संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या विविध गीतांचा सुरेल मेळ या कार्यक्रमातून रसिकांना अनुभवता आला. कार्यक्रमाची संकल्पना आनंदी विकास यांची, गायक सागर जाधव, वैभव पांडे, शेफाली कुलकर्णी आणि वर्षा जोशी यांनी आपल्या सुरेल सादरीकरणातून कार्यक्रम रंगवला. सूत्रसंचालन नीरजा आपटे,वाद्यसंगतीत दीपाली कुलकर्णी (संवादिनी), प्रथेमेश कानडे (की-बोर्ड), विवेक कयाळ (तबला), अक्षय शेवडे (ढोलक/ढोलकी) आणि ऋतुराज कोरे (ऑक्टोपॅड) यांनी साथ दिली. महिला आर्थिक विकास मंडळाच्या प्रस्तुतित सादर झालेल्या या कार्यक्रमाला रसिकांची उत्तम उपस्थिती लाभली.
‘संगीत अष्टनायिका’ हा विशेष कार्यक्रमात मराठी संगीत नाटकांतील विविध नायिकांच्या भावविश्वाचा सुरेल आणि नाट्यमय आविष्कार या कार्यक्रमातून साकारण्यात आला. पद्मश्री जयमाला शिलेदार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या संगीत नाटकांतील विविधरंगी नायिकांना या कार्यक्रमातून अभिवादन करण्यात आले. याची संकल्पना दीप्ती भोगलेंची होती. संगीतसाथ लीलाधर चक्रदेव आणि अभिजित जायदे यांनी दिली. भक्ति पागे, सावनी दातार-कुलकर्णी, धनश्री खरवंडीकर आणि अस्मिता चिंचाळकर यांनी आपल्या प्रभावी गायनातून विविध नायिकांचे भावविश्व उलगडले. निवेदन वर्षा जोगळेकर यांनी केले.

तर ‘मुक्ता’ हा मुक्तनाट्याचा कार्यक्रमही रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथील लघु नाट्यगृहात सादर करण्यात आला. सुप्रसिद्ध कवयित्री अरुणा ढेरे यांच्या ‘कृष्णकिनारा’ या पुस्तकावर आधारित या सादरीकरणातून कविता, अभिवाचन, नृत्य आणि संगीत यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. संकल्पना, अभिवाचन, नृत्यदिग्दर्शन आणि प्रस्तुती अर्चना अनुराधा यांनी केली होती. साहित्य लेखन व अभिवाचन स्नेहल दामले यांनी केले, तर हिंदी गीतरचना प्रणव पटवारी यांची, संगीत दिग्दर्शन कौशल इनामदार यांचे तर गायन रश्मी मोघे आणि मनोज देसाई यांनी केले. नृत्य प्रस्तुती सानिका आपटे, इरा कुलकर्णी, निवेदिता निकम आणि अनुष्का कुलकर्णी यांनी साकारली. प्रकाशयोजना ओंकार हजारे यांनी केली.
खणखणीत लावणीचा विशेष कार्यक्रम ‘मी कात टाकली’ सादर करण्यात आला. मराठी लावणी परंपरेतील ठसकेबाज नृत्य, अभिनय आणि संगीताचा सुंदर मिलाफ या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला. पारंपरिक लावणीच्या साजासोबत आधुनिक रंगमंचीय सादरीकरणाची सांगड घालणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरला. लेखन व दिग्दर्शन भूषण कोरगांवकर यांनी केले आहे.
या कार्यक्रमात पुष्पा सातारकर, गौरी जाधव, गीता वाईकर, लताबाई वाईकर, चंद्रकांत लांडे, विनायक जावळे, सुमित कुडाळकर तसेच अमेय मेहता आणि अनिता दाते यांनी आपल्या प्रभावी अभिनय व नृत्यसादरीकरणातून कार्यक्रम रंगवला. प्रकाशयोजना विक्रांत ठाकूर यांनी केली, ध्वनी संयोजन रुद्र चव्हाण यांनी सांभाळले, तर रंगभूषा अक्षय मालवणकर यांनी केली. क्रिएटिव्ह निर्मितीची जबाबदारी कुणाल विजयकर आणि गीतांजली कुलकर्णी यांनी पार पाडली. बी स्पॉट प्रॉडक्शन्स यांच्या सादरीकरणातून साकारलेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
महिला कला महोत्सवाच्या निमित्ताने सादर झालेल्या या सर्व कार्यक्रमांनी नाट्य, संगीत, नृत्य आणि साहित्य यांचा बहुरंगी संगम घडवून आणत संपुर्ण महोत्सवाला विशेष रंगत आणली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here