धाराशिव जिल्ह्यात अफूची बेकायदेशीर शेती उघडकीस आल्यावर शिवसेना (उबाठा) च्या नेत्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने तात्काळ हकालपट्टी केली आहे.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तातडीने धाड टाकत तपासणी केली असता शेतात मोठ्या प्रमाणात अफूची झाडे आढळली. बाजारभावानुसार या झाडांची किंमत ७३ लाख रुपये इतकी आहे. यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने या नेत्याची हकालपट्टी करण्यात आली आहे. धारशिव जिल्ह्याचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी याबाबत प्रसिद्धपत्रक जारी करत याबाबत माहिती दिली आहे.
समाधान मनोहर उघडे मौजे दसमेगाव ता. वाशी जि. धाराशिव यांनी पक्षाच्या अधिकृत धोरणांविरुद्ध जाऊन शेतात अफुची लागवड केल्याबाबतची बाब पक्षाच्या निदर्शनास आली आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली असता त्यांनी पक्षाच्या भूमिकेला बाधा आणणारे आणि पक्षशिस्त भंग करणारे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले आहे.
पक्षशिस्त आणि संघटनात्मक नियमांचे पालन प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यास बंधनकारक आहे. पक्षाच्या विचारसरणी आणि अधिकृत भूमिकेविरुद्ध जाणारी कोणतीही कृती सहन केली जाणार नाही, याची स्पष्ट जाणीव सर्वांना करून देण्यात येत आहे. वरील पार्श्वभूमीवर, पक्षप्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार समाधान मनोहर उघडे यांची पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांवरून तत्काळ प्रभावाने हकालपट्टी करण्यात येत आहे.


















