*अभिनेते अक्षय कुमार, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, आ अमित साटम, आ हारुन खान यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पोत्सवास सुरुवात*
*फुलांनी सजविलेला भारताचा नकाशा, शंकराची पिंड-नंदी, सनई-चौघडे आणि मोर-फुलपाखरू आदींनी वेधले लक्ष*
वैविध्यपुर्ण रंगीत फुलांनी साकारलेली संगीत क्षेत्रातील वाद्यांच्या प्रतिकृती…फुलांनी सजविलेले मोर-फुलपाखरू, हत्ती-घोडे आणि सनई-चौघडे, तुतारी…बहरलेली फुलझाडे…आश्चर्यचकीत करणारी पिटुनिया, ब्रोकोली, साल्विया वनस्पती…झेंडू, गुलाब, मोगरा आदींसह मनमोहून टाकणारी सुगंधी फुलांची सजावट…औषधी वनस्पती…वेली, भाजीपाला… आणि या सर्वांसाठी खते, कुंड्या आदींनी सजलेल्या अंधेरी पुष्पोत्सवाचे शनिवार दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी अभिनेते, पद्मश्री अक्षय कुमार यांच्या हस्ते आज उद्घघाटन करण्यात आले.
यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, आमदार अमित साटम, आमदार हारुन खान, नगरसेविका सुधा सिंह, नगरसेवक दीपक कोतेकर, नगरसेवक रोहन राठोड, नगरसेवक अनिश मकवानी, नगरसेविका सुनिता मेहता, नगरसेवक विठ्ठल बंदेरी, नगरसेवक रुपेश सावरकर, नगरसेविका सायली कुलकर्णी, उप आयुक्त (परिमंडळ ४) भाग्यश्री कापसे, के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले, बृहन्मुंबई महानगरपालिका उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी व विविध मान्यवर उपस्थित होते.
बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे दक्षिण मुंबईत नुकताच मुंबई पुष्पोत्सव आयोजित करण्यात आला होता. या प्रदर्शनाला तब्बल दीड लाख मुंबईकरांनी भेट दिली. या प्रदर्शनापाठोपाठ आता अंधेरीतही पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात आले. जुहू परिसरातील व्ही. एम. मार्गावरील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पुष्पा नरसी उद्यानात हा दोन दिवसीय उत्सव भरविण्यात आला आहे. शनिवार, दि. १४ फेब्रुवारी आणि रविवार, दि. १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत पुष्पोत्सव सर्व नागरिकांसाठी खुला आहे.
अंधेरी पुष्पोत्सवात रंगीबेरंगी फुलांच्या सजावट करण्यात आली आहे. तसेच बागेसाठी झाडे, कुंड्या, खते, उद्यानातील अवजारे, विविध रोपे व झाडांची नर्सरी, फुलांपासून बनवलेली औषधे, कीटकनाशके, फवारणी यंत्रे, खते आदी दालनेही आहेत. यासोबतच वेगवेगळ्या बोन्साय प्रजाती, शोभेच्या वनस्पती, फुले, भाज्या, औषधी वनस्पतीही प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत.
अभिनेता अक्षय कुमार म्हणाले, “मुंबई खूप धावपळीचे शहर आहे. महानगरपालिकेने सुंदर पुष्पोत्सव आयोजित केला आहे. हा पुष्पोत्सव वर्षातून दोन वेळा भरवायला हवा. पुष्पोत्सवामध्ये एक जाणवतं, ते म्हणजे इकडे येऊन येऊन ‘थांबा’. आयुष्यात ‘थांबणे’ खूप गरजेचे आहे. आयुष्यात येऊन फक्त शांत व्हा. इकडे या, बसा, बघा…ही फुलं तुमच्याशी काहीतरी बोलू इच्छितात, की आपल्या आयुष्यात ‘शांतता’ आणा. स्वतः बहरा. कोणाशी स्पर्धा करू नका, फक्त स्वतः बहरा…आणि जेव्हा सर्वजण बहरतात, तेव्हाच जाऊन एक ‘उद्यान’ तयार होते. सर्वांना खूप काम करायचं आहे. मी सुद्धा खूप काम करतो. पण मी संध्याकाळी ६ वाजल्यानंतर स्वतःला पूर्णपणे रिलॅक्स करतो. कारण सर्वात महत्त्वाची गोष्ट आरोग्य आहे. आपल्या आरोग्याची खूप काळजी घ्यायला हवी आणि पुष्पोत्सवातील तुम्हाला याची जाणीव करून देतात.”
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी म्हणाले, “मुंबईच्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पुष्पोत्सव हे एक उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. आम्हाला ही मोहीम आणि हा वारसा अधिक उंचावर न्यायचा आहे, जेणेकरून प्रत्येक मुंबईकराचा यात सहभाग असेल. निसर्गाचा हा ठेवा केवळ महानगरपालिकेचा किंवा कोणा एका व्यक्तीचा नसून, तो प्रत्येक मुंबईकरांचा ठेवा आहे. आपल्या सर्वांना याचे जतन करायचे आहे. ”
आमदार अमित साटम म्हणाले, “आपण सर्वांनी मुंबई महानगराला सतत स्वच्छ आणि सुंदर ठेवायला हवे. यासाठी अभिनेते यांनी स्वच्छतेच्या स्पर्धेची संकल्पना मांडली. ज्यात अंधेरीची स्पर्धा पार्ल्यासोबत, पार्ल्याची सांताक्रुझसोबत, सांताक्रुझची वांद्र्यासोबत, वांद्रेची माहीमसोबत, माहीमची दादरसोबत आणि दादरची मलबार हिलसोबत अशा प्रकारे एक स्वच्छतेची स्पर्धा आयोजित करा.” असे मत त्यांनी मांडले. येणाऱ्या काळात याबाबत नक्कीच विचार करू. मुंबई सध्या स्वच्छ भारतमध्ये ९ व्या क्रमांकावर आहे. लवकरच मुंबईला १ल्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करू.” असेही आमदार साटम म्हणाले.
अंधेरीतील पहिल्या पुष्पोत्सवाला स्थानिक नागरिक, महानगरपालिका शाळेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, तरुण, ज्येष्ठ नागरिक आदी भेट देत आहेत.
***





















