Home Uncategorized *महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकल्याने विरोधकांचं कटकारस्थान मुंबईकरांनी उधळून लावले- अमीत साटम*

*महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकल्याने विरोधकांचं कटकारस्थान मुंबईकरांनी उधळून लावले- अमीत साटम*

57
0

*मातृशक्तीचं नेतृत्व मुंबईच्या महानगरपालिकेला लाभलेलं आहे- अमीत साटम*

महायुतीकडून महापौर आणि उपमहापौर पदाच्या उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर भाजपा मुंबई अध्यक्ष आणि आमदार अमीत साटम प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, “४४ वर्षांनंतर भाजपाचा महापौर मुंबईच्या महानगरपालिकेत विराजमान होणार असून येणाऱ्या काळात मुंबई शहराला भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याच्या हेतूने, मुंबई शहराचा विकास आणि प्रगती घडवण्याच्या, तसेच शहराची सुरक्षा अबाधित ठेवण्याच्या दृष्टीकोनातून मुंबईच्या महापौर कार्यरत असतील. महापालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढणं हे त्यांचं परम कर्तव्य असेल. मुंबईकरांचं जीवन सुकर करणं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजननुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महापौर आणि उपमहापौर हे कार्य करतील.”

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे यांच्याकडून उमेदवारीची शक्यता असल्याने याचं आव्हान वाटतं का? या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, “सर्वांनाच उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं स्वातंत्र्य असतं. त्यामुळे ज्यांना अर्ज दाखल करायचे आहेत ते सर्वच उमेदवारी अर्ज दाखल करु शकतात पण भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट) यांचे ११८ नगरसेवक आणि नगरसेविका आहेत आणि त्या ११८ व्यतिरिक्त आणखी काही नगरसेवकांचा पाठिंबा मिळाल्यामुळे महायुतीला स्पष्ट बहुमत प्राप्त झालेलं आहे.” यासोबत एमआयएमच्या नगरसेवकांना सोबत घेऊन जाणार का या प्रश्नाचं उत्तर देताना, “मी अजिबात त्यांचं स्वागत करणार नाही. आमचा त्यांच्याशी कोणताही संबंध नाही. समाजविरोधी, समाजविघातक, देशविरोधी वृत्तींच्या शक्तींशी सहानुभूती ठेवणाऱ्यांशी आम्ही नेहमीच संघर्ष केलेला आहे आणि तो कायम राहील.” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
ते पुढे म्हणाले, “मुंबईचा महापौर हा हिंदू आणि मराठीच असेल ही सुरुवातीलाच सांगितलेलं होतं. कदाचित विरोधकांना त्यांचा महापौर हा दुसराच कोणीतरी करायचा होता मात्र महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकला असून त्यांचं कटकारस्थान हे मुंबईकरांनी उधळून लावलेलं आहे आणि मुंबईकरांना, हिंदू, मराठी, कोकणी आणि मालवणी महापौर लाभलेला आहे. मातृशक्तीचं नेतृत्व मुंबईच्या महानगरपालिकेला लाभलेलं आहे. ज्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली मुंबई शहर भ्रष्टाचारमुक्त करून शहराचा विकास करायचा आहे. त्या सर्व हिंदुत्ववादी शक्तींचं आम्ही स्वागत करतो.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here