मुंबई महापौरपदाची निवडणूक बिनविरोध, महापौरपदासाठी शिवसेनेचा( उबाठा) उमेदवार नाही.
मुंबई: मुंबईच्या महापौरपदाचा सस्पेन्स आज संपला आहे. भाजपच्या नगरसेविका रितू तावडे यांच्या नावावर भाजप नेतृत्वाने अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील पक्ष कार्यालयातून या नावाची अधिकृतपणे घोषणा केली . या ऐतिहासिक निवडीमुळे तब्बल २९ वर्षांनंतर मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा महापौर विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला. तर मुंबईच्या महापौरपदी रितू तावडे यांची निवड झाली, तर उपमहापौरपदी शिवसेना (शिंदे ) नेते संजय घाडींची वर्णी लागली आहे. त्यांच्या नावाची घोषणा सरचिटणीस राहुल शेवाळे यांनी केली.
शनिवारी सकाळी महापालिका मुख्यालयात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षांच्या नेत्यांची महत्त्वाची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत सत्तेचे समीकरण आणि पदांच्या वाटपावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी भाजपकडून मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि गटनेते गणेश खणकर उपस्थित होते. तर शिवसेना शिंदे गटाकडून राहुल शेवाळे, गटनेते अमेय घोले उपस्थित होते.
या बैठकीनंतर दोन्ही नावाची घोषणा करुन रितसर अर्ज दाखल केले गेले.
घाडी हे सव्वा वर्षांसाठी उपमहापौर असणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून अनेक नावे चर्चेत होती, मात्र रितू तावडेंच्या नावावरती शिक्कामोर्तब झाले .
रितू तावडे या प्रभाग क्रमांक १३२ मधून भाजपच्या नगरसेविका झाल्या आहेत. मुंबई महापालिकेत दोन टर्म त्या नगरसेविका आहेत.
मुंबईची सेवक म्हणून काम करणार – रितू तावडे
मुंबईची महापौरपदी निवड झाली असली तरी मुंबईची सेवक म्हणून काम करणार आहे. महापौरपद कोणाला मिळणार याची उत्सुकता सर्वांना होती. मुंबईच्या हितासाठी सर्व नगरसेक निवडून गेले आहेत. सभागृहाची गरिमा ठेवून मुंबईच्या हितासाठी पक्षभेद विसरुन निर्मळ आणि प्रामाणिक काम करावं अशी माझी अपेक्षा आहे,.” असे रितू तावडे म्हणाल्या.
कोण आहेत मुंबईच्या नव्या महापौर रितू तावडे?
रितू तावडे या भाजपच्या नगरसेविका आहेत. प्रभाग क्रमांक १३२ मधून भाजपच्या नगरसेविका झाल्या आहेत. मुंबई महापालिकेत दोन टर्म त्या नगरसेविका आहेत. घाटकोपरमधील गुजराती बहुल मतदारांमधील मराठी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. मुंबई महापालिकेत याआधी शिक्षण समितीचे अध्यक्षपदी रितू तावडे होत्या , स्थापत्य समितीच्या उपाध्यक्षा देखील राहिल्या आहेत. भाजपचा ईशान्य मुंबईतील आक्रमक चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. वीज दरवाढीविरोधात आक्रमक आंदोलन त्यांनी केलं आहे.
दरम्यान
मुंबई महापौरपदाची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट झाले आहे.
कारण शिवसेना (उबाठा) महापौरपदासाठी उमेदवार देणार नाही.
मातोश्रीवरील बैठकीनंतर बोलताना किशोरी पेडणेकरांनी “आम्हाला आकड्यांचं गणित मान्य असल्याचं सांगत आपण निवडणुकीत अपशकुन करणार नसल्याचं म्हटले,सोबतच शिवसेना (उबाठा) सभागृहात विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावणार असल्याचं म्हटले.
यावरून मुंबई महापौर निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं चित्र स्पष्ट झाले आहे.
महापालिकेतील पक्षीय बलाबल
मुंबईकरांनी महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. सत्तेसाठी आवश्यक असलेली ११८ ( ११४) ही संख्या महायुतीकडे आहे.भाजप – ८९ शिवसेना ठाकरे गट – ६५शिवसेना – २९ काँग्रेस – २४ मनसे – ६ एमआयएम- ८एनसीपी – ३ एसपी – २ एनसीपी शप – १






















