भाजप उमेदवारावर जीवघेणा हल्ला, काँग्रेसवर गंभीर आरोप
गृहमंत्र्यांच्या एरियात, नागपुरात भाजप उमेदवारावर जीवघेणा हल्ला !
नागपुरातील महापालिका निवडणुकीच्या पूर्वसंध्येलाच हिंसक वळण लागले असून शहरात रक्तरंजित राडा झाला आहे. नागपुरात भाजप उमेदवारवर जीवघेणा हल्ला झाला आहे. प्रभाग ११चे भाजप उमेदवार भूषण शिंगणे हे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेत. त्यांना नागपूरच्या मेयो या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रभाग ११ मधील काँग्रेस उमेदवार आणि त्याच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी हा जीवघेणा हल्ला केल्याचा भाजपचा आरोप आहे. या हल्ल्यात भूषण शिंगणे यांच्या चेहऱ्यावर आणि नाकावर जोरदार मार लागला असून हात फ्रॅक्चर झाला आहे.
फायटर अन् दगडाने मारहाण, भूषण शिंगणे गंभीर जखमीदरम्यान, घटनेची माहिती मिळताच नागपूरच्या मेयो रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर भाजप कार्यकर्ते आणि नेते जमले. मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आलीय.
यावर बोलताना भाजपचे शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी म्हणाले की, “गोरेवाडा परिसरात काही असामाजिक तत्व वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोबतच पैशांचा देखील वाटप करत आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी गेलेल्या भाजप उमेदवार भूषण शिंगणेवर हल्ला करण्यात आला. फायटरने त्यांच्या नाकावर मारण्यात आलं. त्यामुळे मोठ्याप्रमाणात रक्तबंबाळ ते झालेत. खाली पडल्यावर दगडाने मारलं. त्यांचा हात फॅक्चर झाला असून इतर सहकारीही जखमी झाले आहेत. या संदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र समाजकारण करत असताना अशा पद्धतीने हल्ला करणे हे निषेधार्त आहे. इथेच नाही तर काँग्रेसकडून चंद्रशेखर बावनकुळे यांचा देखील ताफा अडवण्यात आला. अशा पद्धतीने दडपशाही करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भाजपचे शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी केले.
“हे प्रकरण मी गांभीर्याने घेतलं आहे, त्यामुळे कुठलाही गुन्हेगार त्यातून सुटणार नाही.” – मुख्यमंत्री , गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांनी भूषण शिंगणे यांची भेट घेऊन विचारपूस केली आहे. शिंगणेंच्या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, “या कुठल्याही दहशतीला आमचा पक्ष घाबरणार नाही. यासंदर्भात आधी इंटिमेशन दिल्यानंतरही पोलिसांनी योग्य कारवाई केली, असं सर्वांचं मत आहे. त्याचीही चौकशी करणार. तक्रार दिल्यानंतरही ज्या गंभीरतेनं या घटनेकडे बघायला पाहिजे होतं, तसं बघितलं गेलं नाही. मी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे, त्यामुळे कुठलाही गुन्हेगार त्यातून सुटणार नाही.”
“नागपुरात काँग्रेसने गुंडांना तिकिट दिलंय. काँग्रेसच्या अशाच एका गुंडाकडून शिंगणेंवर हल्ला करण्यात आला आहे. मुळात दहशत निर्माण करण्याची यांची क्षमताच राहिली नाही. कोणी केलं तर पोलीस त्यांना ठोकून काढतील. कोणत्याच प्रकारची दहशत खपवून घेतली जाणार नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी दुबार मतदारांच्या आरोपांवर फडणवीस पुढे म्हणाले, “दुबार मतदार शोधण्याचं काम इलेक्शन कमिशनने करेल. आत बसलेल्या एजंटने त्यावर आक्षेप घ्यायला हवा. कोणी दुबार मतदान केलं तर आम्हीही त्यावर आक्षेप घेऊ. पण हे मारामारी करणारे कोण आहेत. मतदान कमी झालं पाहिजे, याकरिता केलेला हा प्रयत्न आहे.
दरम्यान हल्ल्यात भूषण शिंगणे यांच्या चेहऱ्याला आणि नाकाला जबर मार लागला असून त्यांचा हातसुद्धा फ्रॅक्चर झाला आहे. गोरेवाडा परिसरात काहीजण वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि सोबत पैसेसुद्धा वाटत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तिथे पाहणीसाठी गेलेल्या भूषण शिंगणेंवर हल्ला करण्यात आला. शिंगणेंना बघताच तिथं असलेल्या ४०-५० जणांनी त्यांच्यावर आणि त्यांच्यासोबत असलेल्या तीन भाजप कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला केला. भूषण शिंगणे इथून जिवंत जाऊ नये, अशीच मारहाण त्यांना करण्यात आल्याचं शहराध्यक्ष तिवारी यांनी सांगितलं.


















