*• बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून प्रथमच अशाप्रकारचा अभिनव उपक्रम*
*• निवडणूक प्रक्रियेतील एकूण २ हजार ८६५ वाहनांच्या हालचालींवर राहणार लक्ष*
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने, महानगरपालिका प्रशासनाकडून चोख व्यवस्था आणि उपाययोजना करण्यात येत आहेत. याच धर्तीवर, निवडणूक प्रक्रियेत समाविष्ट असणाऱ्या वाहनांवर सक्त निगराणी ठेवण्याच्या उद्देशाने प्रथमच भौगोलिक कुंपण (जिओ फेन्सिंग) प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेत सहभागी एकूण २ हजार ८६५ वाहनांच्या हालचालींवर सूक्ष्म पद्धतीने लक्ष ठेवले जात आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात जय्यत तयारी करण्यात आली आहे. मतदान केंद्रांवर मतदारांसाठी विविध सोयी-सुविधा पुरविण्यापासून मनुष्यबळ नियोजन, सुरक्षा, मतमोजणीसाठी चोख व्यवस्था आदी बाबींसाठी पूर्वतयारी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर, निवडणूक प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आलेल्या प्रत्येक वाहनांवर सक्त निगराणी ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
याबाबत माहिती देताना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी सांगितले की, “बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने, मतदान संयंत्रे, मतदान प्रक्रियेतील अधिकारी व कर्मचारी यांची ने-आण करण्यासाठी एकूण २ हजार ८६५ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये बेस्टच्या १ हजार २३ बसेस, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या १०१ बसेस, खासगी १ हजार १६० बसेस आणि ५८१ टॅक्सींचा समावेश आहे. या सर्व वाहनांवर निगराणी ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वाहतूक शाखेमार्फत नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. येथे वाहनांचे थेट स्थान निरीक्षण (लाईव्ह ट्रॅकिंग), विशिष्ट कालावधीत मार्गक्रमणाचा इतिहास (पास्ट हिस्टरी) आणि भौगोलिक कुंपण इशारा (जिओ फेन्सिंग अलर्ट) या बाबींसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व वाहनांवर ट्रॅकिंग सिस्टम बसविण्यात आलेली असून ते नियंत्रण कक्षाशी जोडलेले आहे. त्यामुळे, कोणते वाहन कोणत्या मार्गाने प्रवास करत आहे किंवा कोणकोणत्या ठिकाणी गेले, याविषयी इत्थंभूत माहिती उपलब्ध होऊ शकते.
प्रथमच वाहनांचे थेट स्थान निरीक्षण (लाईव्ह ट्रॅकिंग) जाणून घेण्यासाठी प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यकक्षाच्या ऑनलाईन नकाशावर भौगोलिक कुंपण (जिओ फेन्सिंग) प्रणाली पुरवण्यात आली आहे. नेमण्यात आलेली वाहने संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यकक्षेबाहेर गेल्यास तात्काळ नियंत्रण कक्षाला इशारा (अलर्ट) मिळेल. त्यावरुन, संबंधित वाहनाची यथास्थिती जाणून घेता येईल. ही संपूर्ण प्रक्रिया राबविण्यासाठी नियंत्रण कक्षात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे ३ अभियंता आणि ३ प्रचालक (ऑपरेटर) यांची ८-८ तासांच्या प्रत्येक सत्रांनुसार नियुक्ती करण्यात आली आहे, असेही डॉ. अश्विनी जोशी यांनी सांगितले.
***



















