*• स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेडून जानेवारी ते डिसेंबर २०२६ या कालावधीत ‘स्वच्छता मंथन’ स्पर्धेचे आयोजन*
*• नामांकित व्यक्ती (सेलिब्रिटी), नागरिकांनी एखादा परिसर किंवा गृहनिर्माण संस्थांनी आसपासचा परिसर दत्तक घेऊन स्वच्छता करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार*
*• नागरिक, खासगी आस्थापनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे*
*• मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आवाहन*
बृहन्मुंबई (मुंबई शहर आणि उपनगरे) क्षेत्र अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या अनुषंगाने, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने दि. १ जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत ‘स्वच्छता मंथन’ स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. स्वच्छ प्रशासकीय विभाग (वॉर्ड), स्वच्छ निवासी संकुल, स्वच्छ झोपडपट्टी परिसर, स्वच्छ वाणिज्यिक आस्थापना, स्वच्छ रुग्णालय (शासकीय व खासगी), स्वच्छ शाळा (शासकीय व खासगी), स्वच्छ उपाहारगृह (रेस्टॉरंट), स्वच्छ सामुदायिक शौचालय, स्वच्छ रस्ते/मार्ग, स्वच्छ उद्यान आणि मोकळ्या जागा, स्वच्छ बाजार परिसर तसेच आसपासचा परिसर स्वच्छतेसाठी दत्तक घेणे अशा विविध गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येईल. या विविध गटांसाठी एकूण ४ कोटी २० लाख रुपयांचे पुरस्कार असतील. प्रत्येक गटांतील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना रोख पुरस्कार आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. या स्पर्धेच्या माध्यमातून नामांकित व्यक्ती (सेलिब्रिटी), नागरिकांना एखादा परिसर किंवा गृहनिर्माण संस्थांना आसपासचा परिसर दत्तक घेऊन तेथील स्वच्छता राखण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येईल. नागरिक आणि खासगी आस्थापनांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.” , असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री (मुंबई शहर) एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
‘स्वच्छता मंथन’ स्पर्धेसंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात सादरीकरण करण्यात आले. ही स्पर्धा प्रशासनाने संपूर्ण मुंबई महानगरात अत्यंत प्रभावीपणे राबवावी.”असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले.
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या देखरेखीत बृहन्मुंबई (मुंबई शहर आणि उपनगरे) क्षेत्रात स्वच्छतेच्या दृष्टीने निरनिराळे उपाययोजना केल्या जात आहेत तसेच विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर, मुंबईत स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी ‘स्वच्छता मंथन’ स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रशासकीय विभाग (वॉर्ड) आणि त्या परिसरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांचा सहभाग आणि सहकार्य वृद्धिंगत करणे तसेच मुंबईला अधिक स्वच्छ आणि सुंदर करण्याच्या उद्देशाने ‘स्वच्छता मंथन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. स्वच्छ प्रशासकीय विभाग (वॉर्ड), स्वच्छ निवासी संकुल, स्वच्छ झोपडपट्टी परिसर, स्वच्छ वाणिज्यिक आस्थापना, स्वच्छ रुग्णालय (शासकीय व खासगी), स्वच्छ उपाहारगृह (रेस्टाँरंट), स्वच्छ सामुदायिक शौचालय, स्वच्छ रस्ते/मार्ग, स्वच्छ उद्यान आणि मोकळ्या जागा, स्वच्छ बाजार परिसर तसेच आसपासचा परिसर स्वच्छतेसाठी दत्तक घेणे या विविध गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येईल. स्वच्छ प्रशासकीय विभाग (वॉर्ड) गटात प्रथम ५० लाख रुपये, द्वितीय २५ लाख रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी १५ लाख रुपयांचा निधी दिला जाईल. स्वच्छ निवासी संकुल गटात प्रथम १५ लाख रुपये, द्वितीय १० लाख रुपये, तृतीय ५ लाख रुपये; स्वच्छ झोपडपट्टी परिसर गटात प्रथम १५ लाख रुपये, द्वितीय १० लाख रुपये, तृतीय ५ लाख रुपये; स्वच्छ वाणिज्यिक आस्थापना गटात प्रथम १५ लाख रुपये, द्वितीय १० लाख रुपये, तृतीय ५ लाख रुपये; स्वच्छ रुग्णालय (शासकीय व खासगी) गटात प्रथम १५ लाख रुपये, द्वितीय १० लाख रुपये, तृतीय ५ लाख रुपये;स्वच्छ शाळा (शासकीय व खासगी) गटात प्रथम १५ लाख रुपये, द्वितीय १० लाख रुपये, तृतीय ५ लाख रुपये; स्वच्छ उपाहारगृह गटात प्रथम १५ लाख रुपये, द्वितीय १० लाख रुपये, तृतीय ५ लाख रुपये; स्वच्छ सामुदायिक शौच्छालय गटात प्रथम १५ लाख रुपये, द्वितीय १० लाख रुपये, तृतीय ५ लाख रुपये; स्वच्छ रस्ता/मार्ग गटात प्रथम १५ लाख रुपये, द्वितीय १० लाख रुपये, तृतीय ५ लाख रुपये, स्वच्छ उद्यान आणि मोकळ्या जागा गटात प्रथम १५ लाख रुपये, द्वितीय १० लाख रुपये, तृतीय ५ लाख रुपये; स्वच्छ बाजारपेठ परिसर गटात प्रथम १५ लाख रुपये, द्वितीय १० लाख रुपये, तृतीय ५ लाख रुपये पुरस्कार राहील. तर, आसपासचा परिसर स्वच्छतेसाठी दत्तक घेणे या विशेष गटासाठी प्रथम १५ लाख रुपये, द्वितीय १० लाख रुपये, तृतीय ५ लाख रुपये पुरस्कार राहील. या संपूर्ण स्पर्धेचे मूल्यमापन त्रयस्थ संस्थेमार्फत करण्यात येईल. मा. मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत डिसेंबर २०२६ मध्ये भव्य पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात येईल. सिनेअभिनेते अक्षयकुमार यांनी या सर्व उपक्रमांत स्वत:हून सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
“चित्रपट, क्रीडा व अन्य क्षेत्रातील नामांकित व्यक्ती (सेलिब्रिटी), नागरिक आदींनी एखादा परिसर दत्तक घ्यावा आणि इतरांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व स्वच्छता राखण्यासाठी प्रोत्साहित करावे. गृहनिर्माण संस्थांनी सभोवतालचा परिसर दत्तक घेऊन तेथील स्वच्छता राखावी. स्पर्धेसाठी अर्ज करण्याची पद्धत, स्पर्धेसाठीचे विविध प्रवर्ग (कॅटेगरी), पुरस्कारांचा तपशील आणि अन्य तपशील लवकरच जाहीर करण्यात येईल. या स्पर्धेत नागरिक, खासगी आस्थापना आदींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि ‘स्वच्छ व सुंदर मुंबई’साठी प्रशासनाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना सहकार्य करावे.” असे आवाहनदेखील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केले आहे.
**





















