मुंबई
मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्याच्या वर्षपुर्तीनिमित्त मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा गौरव, अभिमान आणि वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ३ ऑक्टोबर हा ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याचबरोबर, ३ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर हा सप्ताह ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
शासनाच्या मराठी भाषा विभागाने अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे निमित्ताने मुंबई, नागपूर व अमरावती येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
मुंबई येथील रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता अभिजात भाषा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी विशेष टपाल तिकिट व विशेष आवरणाचे अनावरण करण्यात येणार आहे. तसेच अभिजात मराठी भाषा विषयक विविध ग्रंथ, पुस्तके व विशेष अंकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच ४ ऑक्टोबर २०२५ ला सकाळी ११ वाजता पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे ‘ऑनलाईन मराठी : स्थिती व गती’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
नागपूर येथील वनामती सभागृह येथे ६ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता ‘माझ्या मराठीचा टिळा’ या निवडक कवितांचा गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे.
‘अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या अंतर्गत ६ आणि ७ ऑक्टोबर रोजी अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठात राष्ट्रीय स्तरावरील सर्व अभिजात भाषा दर्जा प्राप्त भाषांची देशातील पहिलीच ‘भारतीय अभिजात भाषा परिषद’ होणार आहे. या परिषदेच्या पहिल्या दिवशी तमिळ, संस्कृत, तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि ओडिया या अभिजात भाषांचा परिचय करून दिला जाईल, तर दुसऱ्या दिवशी मराठी, पाली, प्राकृत, असामिया आणि बंगाली भाषांवर चर्चा होईल. अभिजात भाषांचा दर्जा मिळालेल्या भारतातील विविध भाषांचा एकमेकींशी संपर्क राहावा, तसेच त्या-त्या राज्यांत अभिजात भाषेसंबंधी कोणकोणते उपक्रम राबवले जात आहेत ते इतरांना कळावेत.” हा या दोन दिवसीय परिषदेमागचा हेतू आहे. त्यासाठी त्या-त्या राज्यातील भाषातज्ज्ञ उपस्थित असणार आहेत. विशेष म्हणजे यानिमित्ताने अभिजात भाषांचा दर्जा मिळालेल्या या सर्व भाषा आणि त्यांतील तज्ज्ञमंडळी पहिल्यांदाच एकत्र येत आहेत आणि याचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य करत आहे. त्याचप्रमाणे ८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता अमरावती शहराजवळील ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्यात येणार आहे.
या संपुर्ण सप्ताहामध्ये राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या यु-ट्यूब चॅनेलवरून ७ ऑनलाईन कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार आहे. यात ३ ऑक्टोबर २०२५रोजी ‘आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळाला, त्याची एकूण प्रक्रिया कशी होती आणि अभिजात भाषा सप्ताहामागची भूमिका’ हा कार्यक्रम दाखविला जाईल. मराठी भाषेची उत्पत्ती आणि अभिजातता’ हा कार्यक्रम ४ ऑक्टोबर रोजी, मराठी भाषेतील म्हणी, वाक्यप्रचार आणि भाषेचे व्याकरण हा कार्यक्रम ५ऑक्टोबरला, मराठी भाषेतील वृत्त आणि त्यांचे सौंदर्य हा कार्यक्रम ६ऑक्टोबरला दाखविण्यात येईल. बोलीभाषा आणि प्रमाणभाषा हा कार्यक्रम ७ ऑक्टोबर रोजी, मराठी भाषा अर्थार्जनाची भाषा हा कार्यक्रम ८ ऑक्टोबरला तर नव्या पिढीची मराठी भाषा हा कार्यक्रम ९ ऑक्टोबर रोजी यु-ट्यूबवरून प्रसारित होणार असल्याचे, मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांनी कळविले आहे.
त्याचप्रमाणे, ९ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.३० वाजता पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे अभिजात मराठी भाषा सप्ताहाचा समारोप करण्यात येणार आहे.
****


















