प्रतिनिधी /ठाण
गेल्या आठवड्यात बँकॉक (थायलंड) येथे पार पडलेल्या आशियाई खुल्या शालेय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्र जलतरण संघाने भारताचे प्रतिनिधित्व केले. ठाण्याच्या स्टारफिश फाउंडेशनचा जलतरणपटू कु. रेयांश दिपक खामकर(७) याने महाराष्ट्र संघाचा भाग बनत प्रशिक्षक कैलाश आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिमाखदार कामगिरी करत दोन रौप्य व दोन कांस्य पदकांची लूट केली.
महाराष्ट्र जलतरण संघाने तब्बल २२ सुवर्ण, १५ रजत व १० कांस्य अशी एकूण ४७ पदकांची लयलूट करत १६७६ गुणांसह पदक तालिकेत ६ वा क्रमांक पटकावला.
७ वर्षीय रेयांश खामकर याने १०० मीटर फ्रीस्टाईल व १०० मीटर बटरफ्लाय मध्ये रौप्य पदके, तसेच १०० मीटर बॅकस्ट्रोक व २५ मीटर फ्रीस्टाईल मध्ये कांस्य पदके पटकावली.
ठाण्यातील नौपाडा येथील सरस्वती मंदिर ट्रस्टच्या इंग्लिश मिडियम शाळेत रेयांश सध्या दुसरी इयत्तेत शिकत आहे. दिवंगत मारोतराव शिंदे जलतरण तलाव येथील स्टारफिश फाउंडेशन चे प्रशिक्षक कैलाश आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तो जलतरणाचे धडे गिरवत आहे.



















