Home मनोरंजन गोवर्धन’मध्ये अ‍ॅक्शनरूपात दिसणार भाऊसाहेब शिंदे

गोवर्धन’मध्ये अ‍ॅक्शनरूपात दिसणार भाऊसाहेब शिंदे

160
0

‘गोवर्धन’मध्ये अ‍ॅक्शनरूपात दिसणार भाऊसाहेब शिंदे

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘ख्वाडा’ या गाजलेल्या मराठी चित्रपटामध्ये नायक साकारत अवघ्या देशातील रसिकांचं लक्ष वेधून घेत सिनेसृष्टीत दाखल झालेला अभिनेता भाऊसाहेब शिंदे नेहमीच नवनवीन रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘बबन’ या बहुचर्चित चित्रपटामध्ये डॅशिंग भूमिकेत दिसलेल्या भाऊसाहेबचं ‘रौंदळ’ चित्रपटामधलं अ‍ॅक्शनरूप खऱ्या अर्थानं रसिकांना खिळवून ठेवणारं होतं. भाऊसाहेब आता पुन्हा एकदा अ‍ॅक्शन रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भाऊसाहेबची मुख्य भूमिका असलेल्या ‘गोवर्धन’ या आगामी मराठी-हिंदी चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.

भूमिका फिल्म्स अ‍ॅण्ड एन्टरटेन्मेंट या बॅनरअंतर्गत बाळासाहेब शिंदे आणि प्रमोद भास्कर चौधरी यांनी ‘गोवर्धन’ या चित्रपटाची निर्मिती केली असून राईज बिझनेस ग्रुप चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. ‘रौंदळ’ या बहुचर्चित चित्रपटानंतर भाऊसाहेबचा ‘गोवर्धन’ हा आगामी अ‍ॅक्शनपटही मराठीसह हिंदीतही बनवण्यात येणार असून दिग्दर्शक गजानन नाना पडोळ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. गजानन नाना पडोळ यांनी यापूर्वी ‘रौंदळ’चे यशस्वी दिग्दर्शन केले होते. ‘गोवर्धन’ या चित्रपटाचं नवं कोरं पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. या पोस्टरवर गोवर्धनच्या भूमिकेत भाऊसाहेब दिसणार असल्याचं लिहिलं आहे. पोस्टरवरील भाऊचा अँग्री यंग मॅनसारखा लूक लक्ष वेधून घेतो. भाऊसाहेबने नेहमीच आपल्या मातीतील सिनेमे बनवण्याला प्राधान्य दिलं आहे. ‘गोवर्धन’ हा चित्रपटही त्याला अपवाद नाही. पोस्टर पाहिल्यावर याची खात्री पटते. या चित्रपटात भाऊसाहेबचे गायी-वासरांचं रक्षण करणाऱ्या ‘गोवर्धन’चं रूप पाहायला मिळणार आहे. वासराला पाठीला बांधून खलनायकाला कंठस्नान घालण्यासाठी सज्ज झालेला नायक ‘गोवर्धन’च्या पोस्टरवर दिसतो. रक्तानं माखलेला शर्ट, कपाळाला टिळा आणि जखम, वाढलेली दाढी-मिशी, पाठीला बांधलेलं गायीचं वासरू, डाव्या हातात शस्त्र असा ‘गोवर्धन’चा लूक पोस्टरवर पाहायला मिळतो. याखेरीज दोन गायीसुद्धा पोस्टरवर आहेत. हे सर्व पाहिल्यावर या चित्रपटाच्या निमित्ताने भाऊसाहेब महाराष्ट्रातील एका ज्वलंत प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी सज्ज झाल्याचं जाणवतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here