Home Uncategorized *मराठा आंदोलन शिष्टमंडळाने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांची घेतली भेट,...

*मराठा आंदोलन शिष्टमंडळाने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांची घेतली भेट, नागरी सेवा-सुविधांच्या अनुषंगाने चर्चा*

61
0

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदानात दिनांक २९ ऑगस्ट २०२५ पासून आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांना आवश्यक असणाऱ्या नागरी सेवा-सुविधांबाबत चर्चा करण्यासाठी, आंदोलकांच्या वतीने शिष्टमंडळाने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांची आज (दिनांक १ सप्टेंबर २०२५) सायंकाळी भेट घेतली. “शिष्टमंडळाने केलेल्या सूचना व मागण्या यांचा योग्य विचार करुन आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल.”असे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने गगराणी यांनी स्पष्ट केले.

महानगरपालिका मुख्यालयात, महानगरपालिका आयुक्त यांचे सभागृहात याअनुषंगाने बैठक झाली. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, विशेष कार्य अधिकारी (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, उपआयुक्त (परिमंडळ १) चंदा जाधव, उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर हे प्रत्यक्ष तर इतर संबंधित अधिकारी यावेळी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

मराठा समाज आंदोलनाच्या वतीने आलेल्या शिष्टमंडळामध्ये निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, ॲड. आशीषराजे गायकवाड, ॲड. रमेश ठुबे-पाटील, ॲड. हिमांशू पाटील, ऍड. आनंदराव काटे, ॲड. गौरव भालसिंग, ॲड. अनिरुद्ध रोटे, ॲड. प्रताप मोटे आदींचा समावेश होता.

प्रारंभी, उपआयुक्त (परिमंडळ चंदा जाधव यांनी संगणकीय सादरीकरण केले. आझाद मैदान व परिसरात आंदोलनकर्त्यांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने पुरवण्यात येत असलेल्या सर्व नागरी सोयी-सुविधांची सविस्तर माहिती त्यांनी दिली.

शिष्टमंडळातील सदस्यांनी या नागरी सेवा-सुविधांबाबत समाधान व्यक्त करुन महानगरपालिकेचे आभार मानले. तसेच नागरी सेवा-सुविधांमध्ये वाढ व इतर मुद्यांबाबत सूचना, मागण्या केल्या.

महानगरपालिकेच्या वतीने, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक गगराणी म्हणाले की, “शिष्टमंडळाने केलेल्या सूचना व मागण्या यांचा यथायोग्य विचार करुन, महानगरपालिका प्रशासनाच्या स्तरावर आवश्यक असलेली सर्व कार्यवाही केली जाईल.”असे त्यांनी आश्वस्त केले.

आंदोलनकर्ते व महानगरपालिका प्रशासन यांच्यामध्ये योग्य समन्वय व सुसंवाद रहावा, कोणतेही गैरसमज होवू नयेत, यासाठी प्रमुख व्यक्तिंची नावे व संपर्क क्रमांक यांचे आदानप्रदानही करण्यात आले.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here