भुयारी मार्गातील पालिकेचेपंप कुचकामी
पावसाने केली पालिकेच्या कामाची पोलखोल, भुयारी मार्गात साचणाऱ्या पाण्याच्या समस्येसमोर पालिकेने टेकले गुढगे
कांदिवली
अनिल चासकर
दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाने,पुन्हा जोर धरल्याने उपनगरातील भुयारी मार्गात पाणी साचले. वाहतुकीची कोंडी तर काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली. वाहतुकीच्या कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने रुग्णाचे हाल झाले. दैनंदिन व्यवहार कोलमडले, दुचाकी, तीनचाकी वाहने बंद पडली, सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले.
शाळांची सुट्टी उशीरा जाहीर करण्यात आली त्यामुळे पहिल्या अधिवेशनातील विध्यार्थ्यांसह पालकांचे हाल झाले.एकूणच गेले कित्येक वर्ष समस्या असलेल्या भुयारी मार्गापुढे पालिकेने हात टेकल्याचे दिसून आले.
उपनगरातील अंधेरी, मालाड,पोंईसर, आणि दहिसर भुयारी मार्गात पाणी साचले, पालिकेने एक, दोन चार पंप लावून देखील पाणी साचल्याने, वाहन चालकांसह प्रवाशांना, पालक आणि विध्यार्थ्यांना तारेवरची कसरत करतच मार्ग क्रमण करावे लागले. मालाड भुयारी मार्गात पाणी साचते, म्हणून पालिकेचे तीन पंप कार्यरत आहेत तरी देखील पाणी साचते!
दहिसर भुयारी मार्गात देखील तशीच परिस्थिती आहे. दहिसर भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा झाला.वाहतूक व्यवस्था कोलमडल्याने, ऍम्ब्युलन्स अडकल्या, वाहन चालकांसह प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.
कांदिवली पश्चिम स्वामी विवेकानंद मार्गाहून पूर्वेला दृत गती मार्गाकडे तसेच पोंईसर विभागातील नागरिक दैनंदिन व्यवहारासाठी पोंईसर भुयारी मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. पोंईसर भुयारी मार्गात तर गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते. भुयारी मार्गाच्या दुतर्फा ३ फूट उंच व फक्त दोन फूट रुंदीचे पदपथ आहे. पोंईसर विभागातील बहुतांशी विध्यार्थी पश्चिमेकडील शाळेत शिकतात. मुसळधार पावसात गुढघ्याइतके पाणी साचले. यामुळे पालकांसह विध्यार्थ्यांचे हाल झाले. अनेक दुचाकी बंद पडल्या, काही पालकांनी दुचाकी बाजूला ठेवून, चालत जाणे पसंत केले.
गेले कित्येक वर्ष पोंईसर भुयारी मार्गात पंप लावला जात आहे. तरीदेखील गुढघ्याइतके पाणी साचल्याने, पालिकेची भुयारी मार्गात पंप लावण्याची तकलादू यंत्रणा कुचकामी ठरल्याचे दिसून आले.कोट्यावधी रुपये खर्च करून देखील नागरिकांना वर्षानुवर्षे पावसाळ्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने, पालिकेच्या भोंगळ आणि तकलादू कारभारा विषयी नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
कांदिवली गावठाणातून वाहणारा पोंईसर नाला तुडुंब भरल्याने, तसेच बाजूलाच असलेला गणपती विसर्जन तलाव भरून वाहिल्याने गावठाण मार्गात पाणी साचल्याने गावठाणातील मार्ग वाहतुकीस बंद झाला.



















