Home Uncategorized *’घरोघरी तिरंगा’ अभियान अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबई महानगरात विविध उपक्रमांचे आयोजन*

*’घरोघरी तिरंगा’ अभियान अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबई महानगरात विविध उपक्रमांचे आयोजन*

77
0

*• मुंबईकर नागरिकांनी या देशभक्तीपर अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे महानगरपालिका प्रशासनाकडून आवाहन*

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार, भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही दिनांक २ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीदरम्यान ‘हर घर तिरंगा’ अर्थात ‘घरोघरी तिरंगा’ अभियान राबविले जात आहे. या अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र शासनाकडून सन २०२२ पासून ‘हर घर तिरंगा’ अर्थात ‘घरोघरी तिरंगा’ अभियान राबविले जात आहे. नागरिकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे तसेच भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल जागरुकता वाढवणे, ही या उपक्रमाची मूळ संकल्पना आहे. ‘हर घर तिरंगा’ अर्थात ‘घरोघरी तिरंगा’ अभियान आता लोकचळवळ बनली असून या अभियानात महाराष्ट्र राज्याने आणि मुंबई महानगराने लक्षवेधी कामगिरी केलेली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार, दिनांक १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत ‘घरोघरी तिरंगा’ अभियान राबविले जाणार आहे.

मुंबई महानगरातही हे अभियान व्यापकपणे आणि अत्यंत उत्साहात राबविण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत.

‘घरोघरी तिरंगा’ अभियान अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व विभागांमध्ये (वॉर्ड) तिरंगा महोत्सव, तिरंगा मेळा, तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा बाईक रॅली आणि सायकल रॅली, तिरंगा यात्रा, तिरंगा विक्री व वितरण, तिरंगा दौड आणि मॅरेथॉन, तिरंगा ट्रीब्यूट आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच, शाळेच्या भिंती सजवणे, तिरंगा प्रदर्शन, तिरंगा रांगोळी स्पर्धा, तिरंगा राखी बनविण्याच्या स्पर्धा व कार्यशाळा, तिरंगा विणकाम व धागे सार्वजनिक प्रदर्शन, तिरंगा राष्ट्रध्वजाबाबत भावनेचा गौरव करण्यासाठी भारतीय जवान आणि पोलिस कर्मचाऱ्यांसाठी पत्रलेखन अभियान, तिरंगा प्रश्नमंजुषा, घरोघरी तिरंगा घरोघरी स्वच्छता : स्वातंत्र्याचा उत्सव स्वच्छतेसह आदी उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.

” मुंबईकर नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवावा. तसेच तिरंगा राष्ट्रध्वजासोबत सेल्फी, छायाचित्र किंवा व्हिडिओ काढून https://harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करावे. तसेच, ‘घरोघरी तिरंगा’ अभियानात स्वयंसेवक म्हणून नोंदणी करावी”, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here