Home Uncategorized *मुंबईतील मनोरंजन क्षेत्राला उत्तमोत्तम सोयीसुविधा पुरविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका कटीबद्ध – महानगरपालिका आयुक्त...

*मुंबईतील मनोरंजन क्षेत्राला उत्तमोत्तम सोयीसुविधा पुरविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका कटीबद्ध – महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी*

59
0

*• मुंबईतील चित्रपट उद्योगासंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई-युनेस्को क्रिएटीव्ह सिटी ऑफ फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मुंबईतील चित्रपट क्षेत्राबाबत भागधारकांशी विचारविनिमय’ या विषयावर परिसंवाद संपन्न*

*• ‘मुंबई-द सिटी ऑफ फिल्म’ या कॉफीटेबल बुकचे आणि ग्रीन फिल्मिंग हँडबुकचेही प्रकाशन*

विविध नागरी सेवा पुरविण्यापासून उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका अविरतपणे कार्यरत आहे. हिंदी चित्रपटांचे माहेरघर म्हणून मुंबईची जागतिक ओळख आहे. तथापि, अर्थव्यवस्थेतील एक महत्वाचा घटक म्हणून मुंबईतील मनोरंजन क्षेत्राला उत्तमोत्तम सोयीसुविधा पुरविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका कटीबद्ध आहे. महानगरपालिकेच्या अंतर्गत निसर्गसौंदर्यांनी नटलेले तलाव, शाळा, रुग्णालये, कचरा क्षेपणभूमी आदी आस्थापना आहेत. अशा ठिकाणी कोणत्याही परवानगीविना चित्रिकरण करता यावे, यासाठी महानगरपालिकेच्या वतीने उपाययोजना केल्या जात आहेत. सध्या काही चित्रिकरण स्थळे शोधण्यात आली असून आगामी काळात त्यात आणखी भर पडेल, असे बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी सांगितले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे व्यवसाय विकास विभाग आणि मुंबई-युनेस्को क्रिएटीव्ह सिटी ऑफ फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मुंबईतील चित्रपट क्षेत्राबाबत भागधारकांशी विचारविनिमय’ या विषयावर आज (दिनांक ३० जुलै २०२५) वांद्रे येथील हॉटेल ताज लँड्स इन येथे विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी श्री. गगराणी बोलत होते.

महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी पुढे म्हणाले की, जगातील अनेक शहरांमध्ये मनोरंजन क्षेत्राचे प्रशासन स्थानिक प्रशासन संस्थेच्या अख्यत्यारित आहे. मुंबईची पालकसंस्था म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यरत आहे. तथापि, येथील मनोरंजन क्षेत्रासाठी स्वतंत्र प्रशासन कार्य करते. मात्र, सेवासुविधांच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका मनोरंजन क्षेत्रासोबत कार्यरत आहे. हे क्षेत्र अधिक गौरवशाली व्हावे, यास अधिक वैभव प्राप्त व्हावे, यासाठी मुंबईला जागतिक सांस्कृतिक ठिकाण म्हणून पुढे आणण्यासाठी महानगरपालिका प्रयत्न करत आहे. या माध्यमातून देशाला अभिमान वाटेल, अशी आणखी मोठी अर्थव्यवस्था आकारास यावी, असा या उपक्रमाच्या आयोजनामागील उद्देश असल्याचेही श्री. गगराणी यांनी यावेळी सांगितले.

यावेळी ‘मुंबईच्या आर्थिक विकासात चित्रपटांची भूमिका’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, दादासाहेब फाळके चित्रनगरीचे सह व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रशांत साजणीकर, व्हिसलिंग वूड इंटरनॅशनलचे उपाध्यक्ष श्री. चैतन्य चिंचीलकर, प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नितीन आहुजा, मोशन पिक्चर्स असोसिएशनच्या वरिष्ठ संचालिका श्रीमती लोहिता सुजीत, चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक श्री. शिवराज वायचळ यांनी या परिसंवादात भूमिका मांडली. मुंबईत चित्रिकरणासाठी परवानगीची प्रक्रिया सुलभ करणे, योग्य शुल्क आकारणी करणे, विविध यंत्रणांचे एकिकृत मंच तयार करुन चित्रिकरणासंबंधीत बाबींमध्ये सुसूत्रता आणणे आदी विषयांवर यावेळी चर्चा झाली. दरम्यान, या कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रतिनिधींनी मनोरंजन क्षेत्रातील विविध अडचणी, प्रशासनाकडून अपेक्षा आदींबाबत मते व्यक्त केली.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्री. अमित सैनी यावेळी म्हणाले की, मनोरंजन क्षेत्राला असलेल्या अपेक्षा किंवा त्यांच्या समस्यांच्या निराकरणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन नक्कीच कार्य करेल. वर्ल्ड ऑडिओ-व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट अर्थात वेव्ह्जच्या आयोजनातून या क्षेत्राविषयीच्या अनेक अभिनव बाबी पुढे आल्या. मुंबईतील विविध ठिकाणी चित्रिकरणासाठी आवश्यक असलेल्या परवानगी आणखी सुलभतेने देणे, महानगरपालिकेने सध्या निश्चित केलेल्या चित्रिकरणाच्या ठिकाणी मूलभूत सोयीसुविधा पुरवणे, चित्रिकरणाच्या अनुषंगाने स्थानिक नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेणे तसेच पोलिस दल, महाराष्ट्र सागरी मंडळ आणि अन्य यंत्रणांचे मिळून चित्रिकरणाच्या अनुषंगाने स्वतंत्र कक्ष सुरू करणे आदींबाबत संबंधितांशी चर्चा करुन निर्णय घेता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे व्यवसाय विकास विभाग आणि मुंबई-युनेस्को क्रिएटीव्ह सिटी ऑफ फिल्म्स यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या ‘मुंबई द सिटी ऑफ फिल्म’ या कॉफीटेबल बुकचे तसेच ग्रीन फिल्मिंग हँडबुकचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले.

उपायुक्त (परिमंडळ-३) श्री. विश्वास मोटे, व्यवसाय विकास विभागाच्या प्रमुख श्रीमती शशी बाला आदी यावेळी उपस्थित होते.

****
(जसंवि/२२४)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here