डिजिटलायजेशन प्रकल्पांतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश!
मुंबई
महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली “महाराष्ट्र विधानमंडळाच्या ग्रंथालय समिती”ची बैठक आज पार पडली. १९२२ मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या ग्रंथालयामध्ये महाराष्ट्र विधानमंडळाच्या डिजिटलायजेशन प्रकल्पांतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करून सुधारणा करण्यासाठी या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा आणि सूचना करण्यात आल्या. या प्रकल्पासाठी लागणारा निधी, कर्मचारी संख्या, डिजिटलायजेशन,अत्याधुनिक पायाभूत सुधारणा अशा अनेक मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली.
ग्रंथालय समिती ही तर्द्थ (ॲडव्हॉक) समिती असून ही समिती विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या२० सदस्यांची असते.
या ग्रंथालय समिती बैठकीकरिता समिती प्रमुख महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, विशेष निमंत्रित सदस्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे तसेच समिती सदस्य सुधीर मुनगंटीवार, सुधीर गाडगीळ, डॉ. मनिषा कायंदे, सुनील शिंदे, सुलभा गायकवाड, सई डहाके, अतुल भातखळकर, ज्ञानेश्वर कटके,राजेश विटेकर, मनोज जामसुतकर, अनिल मांगुळकर,अमित गोरखे, , शिवाजीराव गर्जे, अभिजित वंजारी आणि महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-३ डॉ.विलास आठवले, सचिव-४शिवदर्शन साठ्ये, ग्रंथपाल माहिती आणि संशोधन अधिकारी निलेश वडनेरकर, शत्रुघ्न मुळे, त्रिभुवनदास पाटील उपस्थित होते.
***






















