मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांची आज एक महत्त्वपूर्ण राज्यस्तरीय बैठक मा. प्रदेशाध्यक्ष श्री. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत पक्षाच्या आगामी उपक्रमांसाठी आणि निवडणूक रणनीतीसाठी विस्तृत रूपरेषा ठरविण्यात आली.
पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तापसे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, या बैठकीला राज्यभरातून वरिष्ठ नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. या बैठकीत पक्षातील नवचैतन्य व एकोप्याचे दर्शन घडले असेही तपासे पुढे म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष श्री. जयंत पाटील यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षाची तातडीची रणनीती स्पष्ट केली. त्यांनी सर्व जिल्हा व तालुका स्तरावरील यंत्रणांना बुथस्तरावर बळकट करण्याचे आवाहन केले.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पुढे म्हणाले सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या कार्यकाळात विविध शासकीय कार्यालयांमध्ये चाललेल्या प्रचंड भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्याची गरज आहे व ती भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पार पाडावी असे आवाहन श्री पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना केले.
पक्षातील नवीन पिढीला सक्षम करण्याच्या उद्देशाने, पक्ष युवक व महिला आघाड्यांचे बळकटीकरण करणार आहे व नवोदित व उत्साही स्वयंसेवकांना मोठ्या प्रमाणावर पक्षात सहभागी करून घेतले जाणार आहे असेही जयंत पाटलांनी नमूद केले.
पक्षातील वरिष्ठ पातळीवरील नेते मंडळी संपूर्ण राज्यभर लवकरच दौरे करणार आहेत व जिल्हा तालुका स्तरावरील पक्ष संघटनेचा व शासकीय स्तरावरील योजनांचा आढावा घेणार असेही श्री जयंत पाटील म्हणाले.
शेतकऱ्यांचे प्रश्न, तरुणांमधील बेरोजगारी आणि जनतेच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या इतर महत्वाच्या मुद्द्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
या बैठकीत श्री. जयंत पाटील यांनी पक्ष संघटनेत आवश्यकतेप्रमाणे फेररचनेचे संकेत दिले. नव्या जबाबदाऱ्या, नव्या नियुक्त्या व आवश्यकतेनुसार पुनर्रचना करून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यात येईल असेही श्री पाटील पुढे म्हणाले.
“आजची बैठक ही महाराष्ट्रातील जनतेप्रती असलेल्या आमच्या बांधिलकीचे पुनःप्रदर्शन होते. शरद पवार साहेब व श्री. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) अधिक मजबूत, एकजुटीत आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांशी जोडलेला पक्ष म्हणून उभा राहणार आहे. आम्ही रस्त्यावर उतरून लढायला सज्ज आहोत, आणि न्याय, विकास व लोकशाही जबाबदारी प्रस्थापित करण्यासाठी कटिबद्ध आहोत.” अशी ग्वाही तपासे यांनी दिली.
⸻


















