Home Uncategorized *पाळीव प्राण्यांची विष्ठा आणि ई – कचरा संकलनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विशेष...

*पाळीव प्राण्यांची विष्ठा आणि ई – कचरा संकलनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विशेष सेवा*

95
0

 

*घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा संकलन सेवेची व्याप्ती वाढवली*

*दिनांक ३ मे २०२५ पासून पाळीव प्राण्यांची विष्ठा आणि दिनांक ५ मे २०२५ पासून ई-कचरा संकलित केले जाणार*

वापरलेले सॅनिटरी पॅडस्, डायपर, कालबाह्य औषधी आदींच्या संकलनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेल्या घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा संकलन सेवेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. या अंतर्गत आज दिनांक ३ मे २०२५ पासून पाळीव प्राण्यांची विष्ठा आणि इतर विशेष कचऱ्याच्या संकलनाची सेवा सुरू करण्यात आली आहे. तर सोमवार, दिनांक ५ मे २०२५ पासून ई-कचरा संकलनासाठी स्वतंत्र सेवा देखील सुरू करण्यात येत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात आणि उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री. किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली मुंबईतील घनकचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. निरनिराळे उपक्रमही राबविले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या वैयक्तिक वापराशी संबंधित कचरा संकलनाच्या उद्देशाने ‘घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्यांचे संकलन’ (डॉमेस्टीक सॅनिटरी अँड स्पेशल केअर वेस्ट कलेक्शन) ही सेवा दिनांक २२ एप्रिल २०२५ पासून.सुरू करण्यात आली आहे. या सेवेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे.

या उपक्रमाबाबत उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री. किरण दिघावकर यांनी सांगितले की, मुंबईत सध्या दररोज सुमारे ७ ते ८ दशलक्ष टन घनकचरा निर्माण होतो. या कचऱ्याच्या योग्य व्यवस्थापनाची गरज ओळखून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत दिनांक २२ एप्रिल २०२५ पासून ‘घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्यांचे संकलन’ (डोमेस्टीक सॅनिटरी अँड स्पेशल केअर वेस्ट कलेक्शन) सेवा सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत दिनांक २ मे २०२५ पर्यंत या सेवेसाठी एकूण ३०७ नोंदणी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये १४८ गृहनिर्माण संस्था, १३५ श्रृंगार केंद्र (ब्युटी पार्लर), १७ शैक्षणिक संस्था आणि ७ महिला वसतिगृहांचा समावेश आहे.

ही सेवा सुरू झाल्यानंतर मिळालेला प्रतिसाद, प्राप्त सूचना आणि नागरिकांच्या विनंतीनुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत पाळीव प्राण्यांच्या विष्ठेचे संकलन देखील या सेवेद्वारे करण्यात येणार आहे. ही सुविधा आज दिनांक ३ मे २०२५ पासून सुरू करण्यात आली आहे.

‘घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्यांचे संकलन’ साठी यापूर्वीच ऑनलाईन लिंक आणि क्यू आर कोड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामध्येच पाळीव प्राणी विष्ठा संकलन सुविधेसाठी नोंदणी करता येईल.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc6zR8XHoOzXRNanCCdj4oKtS27Iu7vuaXBANiCGoKCfUCn5g/viewform या लिंकवर जाऊन किंवा विविध ठिकाणी उपलब्ध तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या समाज खात्यावर प्रसिद्ध करण्यात आलेले क्यूआर कोड स्कॅन करून ही नोंदणी करता येईल.

*ई-कचरा संकलन सेवा देखील उपलब्ध–*

मुंबई महानगरामध्ये वीजकीय (इलेक्ट्रॉनिक) उपकरणांच्या वाढत्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात ई-कचरा तयार होतो. या धोकादायक स्वरूपाच्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे व पुनर्प्रक्रिया तसेच पुनर्वापर करणे आवश्यक आहे. ही गरज ओळखून बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सोमवार, दिनांक ५ मे २०२५ पासून स्वतंत्र ई-कचरा संकलन सेवा सुरू करण्यात येणार आहे. या अंतर्गत निरुपयोगी मोबाईल फोन, चार्जर, बॅटरी, संगणक, दूरचित्रवाणी संच आणि लहान उपकरणांसारख्या तत्सम सर्व ई-कचऱ्याचे संकलन केले जाईल.

ई-कचरा संकलनासाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSemTxY-ifCjxU7VW-U7sYpr8JOD_Zj4XKnDB7uVpJyXsk6LxA/viewform?usp=header ही स्वतंत्र लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यावर किंवा ई कचरा संकलनासाठी तयार करण्यात आलेले स्वतंत्र
क्यूआर कोड स्कॅन करून या सुविधेसाठी नोंदणी करता येईल. विविध ठिकाणी तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या समाज माध्यम खात्यावर हे क्यू आर कोड प्रसिद्ध करण्यात येत आहेत.

ई-कचरा सर्वसाधारण कचऱ्यात मिसळल्यामुळे त्यातील शिसे (लीड), पारा (मर्क्युरी), कॅडमियम यांसारख्या विषारी घटकांमुळे पर्यावरण आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने ई-कचरा संकलन सेवा सुरू करण्यात येत आहे. ई-कचऱ्याची योग्य पद्धतीने, सुलभ व पर्यावरणस्नेही पद्धतीने विल्हेवाट लावता यावी, हा या सेवेमागचा उद्देश आहे.

याच पार्श्वभूमीवर, ई-कचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट, त्याचे पर्यावरणीय परिणाम आणि नागरिकांचा सहभाग यावर भर देणारे जनजागृती अभियान देखील महानगरपालिकेकडून राबवले जाणार आहे.

घनकचरा व्यवस्थापन अधिक उत्तरदायित्वपूर्ण करण्याच्या अनुषंगाने ही सेवा एक महत्वपूर्ण पाऊल आहे. पर्यावरण रक्षण, स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचे आणि सन्मानाचे संरक्षण तसेच सार्वजनिक आरोग्य सुधारण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने नमूद करण्यात येत आहे.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here