मुंबई दि. ८ एप्रिल – राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने दिनांक १ ते ३ मे रोजी गौरवशाली महाराष्ट्राचा ६५ वा वर्धापन दिन वरळीच्या जांबोरी मैदानावर ‘महाराष्ट्र महोत्सव’ म्हणून साजरा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना आज दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र महोत्सव म्हणून राज्यभर साजरा केला जाणार आहे. त्यासंदर्भात आज प्रदेश कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीनंतर सुनिल तटकरे यांनी ही माहिती दिली.
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, १०६ हुतात्म्यांच्या बलिदानानंतर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी आणलेला मंगल कलश आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा, जिजाऊंचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र ही या महाराष्ट्राची ओळख आहे. सर्वदूर क्षेत्रात महाराष्ट्राची जी ओळख आहे, महाराष्ट्राने जी प्रगती केली आहे त्याचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न ‘महाराष्ट्र महोत्सवातून’ राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात येणार आहे असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने पक्षातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि वेगवेगळ्या क्षेत्रात जे मान्यवर काम करतात त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. येत्या पाच – सहा दिवसात या संपूर्ण कार्यक्रमाची रुपरेषा तयार झाली की ती महाराष्ट्रातील जनतेसमोर मांडणी केली जाईल असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.
*रायगड जिल्ह्यात आरोग्य यंत्रणांकडून घडलेल्या घटना लांच्छानास्पद ;संबंधित वैद्यकीय अधिकार्यांवर तात्काळ कारवाई व्हावी…*
रायगड जिल्हयात दुर्दैवाने घडलेल्या घटना अत्यंत दुर्दैवी आहेत.माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात गौरांग गायकर या १४ वर्षाच्या विद्यार्थाला ताप आला म्हणून म्हसळयाच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल झाला होता. तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढील उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात पाठवले होते. मात्र ड्युटीवर असलेले वैद्यकीय अधिकारी त्यादिवशी आले नव्हते. तिथे उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकार्यांने तपासणी केली. त्याला फारसं काही न सांगता तु घरी जा असा सल्ला त्याला व नातेवाईकांना दिला तोही रात्री दीड – दोन वाजता. मात्र दुर्दैवाने सकाळी पुन्हा ताप आला आणि काही क्षणात त्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. हा त्या रुग्णालयाचा हलगर्जीपणा आहे. या घटनेची चौकशी झालीच पाहिजे. एका १४ वर्षाच्या विद्यार्थ्याचा झालेला मृत्यू केवळ त्यांच्या पालकांपुरता सिमीत नाही तर सडलेल्या आरोग्य यंत्रणेचे द्योतक आहे असा गंभीर आरोप सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना केला.
गेली ४० वर्ष मी या जिल्हयात जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहे हे सांगतानाच सरकारने ताबडतोब या घटनेची चौकशी केली पाहिजे आणि जे वैद्यकीय अधिकारी जबाबदार आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणीही केली.
श्रीवर्धन येथील दुसर्या घटनेबाबत बोलताना आमदार अनिकेत तटकरे व अदितीताई तटकरे यांनी कार्डीओ रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली होती. त्या रुग्णवाहिकेचा पाटा तुटलेला होता. त्यामुळे ती १५ दिवस बंद आहे. याबाबत प्रभारी सिव्हिल सर्जन, श्रीवर्धन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांच्याशी बोलणं झालं मात्र हा हलगर्जीपणा असून याचीही चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करतानाच याकडे आरोग्यमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनीही लक्ष द्यावे आणि आरोग्य यंत्रणा ज्यापद्धतीने काम करत आहे ती आम्हा सर्वांच्या दृष्टीने लांच्छानास्पद आहे असे उद्विग्न होत सुनिल तटकरे यांनी मत व्यक्त केले .

















