शिवाजी पार्क दादर येथील धुळीच्या प्रश्नाबाबत मुंबई महानगरपालिकेने तात्काळ उपायोजना करावी याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आज मुंबई महानगरपालिकेला विशेष निर्देश दिले आहेत.
या निर्देशास अनुसरून मुंबई महानगरपालिकेने सदर ग्राउंडची देखभाल करण्यासाठी एका तज्ञ व्यक्तीची निवड तात्काळ करावी, सध्या मैदानात उपलब्ध असलेल्या मातीचा दर्जा तपासून त्यावर योग्यरीत्या वाढेल असे गवत की जे गवत वाढल्यानंतर त्याची मुळे त्या मातीला घट्ट धरून बसतील अशा योग्य त्या गवताची निवड पुढील महिन्याभरात परीक्षण करून करावी असे देखील निर्देश देण्यात आले आहेत. सदर योग्य त्या गवताची निवड करण्यासाठी पुढील एक महिन्यात योग्य ती कार्यवाही करून प्रत्यक्ष योग्य गवताची निवड करावी आणि पावसाळ्यापूर्वी या गवताची लागवड पूर्ण होईल अर्थात याकरता ज्या ठिकाणी क्रिकेट खेळले जाते तितकाच क्रिकेट पिचचा परिसर बघून उर्वरित परिसरात या गवताची लागवड करावी, त्यासाठी त्याला योग्य तो पाणीपुरवठा होईल याकरिता संबंधित मैदानाच्या शेजारून जाणारी जी सांडपाणी वाहिनी आहे त्या वाहिनीच्या पाण्यावर याच मैदानातील योग्य ठिकाणी महानगरपालिकेने गरज भासल्यास जलशुद्धीकरण यंत्रणा उभारावी आणि त्या पाण्याचा वापर या गवताच्या वाढीसाठी आणि मैदानाची निगा राखण्यासाठी करावा असे निर्देश देखील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महानगरपालिकेला दिले आहेत. याबाबत महानगरपालिकेने उपायोजना केल्या जाणार असल्याचा अहवाल, त्याचे वेळापत्रक एप्रिल 2025 अखेरपर्यंत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास सादर करावे असे निर्देशात म्हटले आहे. त्याचबरोबर शिवाजी पार्क च्या चहुबाजूने योग्य त्या झाडांची लागवड करावी आणि शिवाजी पार्क मैदानावरील कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात या मैदानावर खड्डे पाडले जाणार नाहीत याचे निर्देश संबंधित आयोजक संस्थेला वेळोवेळी द्यावेत असे या आदेशात म्हटले आहे.
महानगरपालिका ज्या ज्या उपायोजना करत आहे त्याची संपूर्ण माहिती शिवाजी पार्क रहिवासी संकुल आणि आजूबाजूच्या महत्त्वाच्या संस्था यांना देखील देण्यात यावी असे निर्देश आजच्या पत्रात नमूद करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम आणि सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज शिवाजी पार्क रहिवाशी संघाशी चर्चा करून सदरवून निर्देश महानगरपालिकेला देत असल्याबद्दल संबंधित रहिवासी संघाला माहिती दिली. या उपायोजनांची माहिती वेळोवेळी महानगरपालिकेकडून घेतली जाईल आणि त्यावर पूर्णपणे लक्ष ठेवले जाईल अशी माहिती माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी यावेळी दिली.


















