कोल्हापूर:शाहूवाडी प्रतिनिधी
गोगवे ता.शाहूवाडी येथे मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला करून वीस मेंढ्या ठार केल्या. सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच मलकापूर वन विभागाचे अधिकारी घटनस्थळी दाखल झाले.
समजलेली माहिती अशी की, शाहूवाडी तालुक्यातील गोगवे येथील अशोक पाटील यांच्या शेतात सोनवडे येथील मेंढपाळ संजय बंडगर, अवघतू वग्रे, बाळू वग्रे, काशिनाथ जानकर या मेंढपाळांच्या मेंढ्या शेतात बसवल्या होत्या . त्यातील लहान-मोठ्या मेंढ्या शेतात वाघर लावून ठेवून दिवसभर इतर मेंढ्या चालण्यासाठी गेले असता सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शेतात असणाऱ्या मेंढ्या व कोकरांवर बिबट्याने हल्ला केला. यात वीस मेंढ्या ठार केल्या या घटनेची माहिती शाहूवाडी वनविभागाला कळतात वनविभागाचे वन अधिकारी अमित भोसले, वनपाल नायकवडी, वनरक्षक पाटील तसेच रेस्क्यू टीम ही दाखल झाली. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. शाहूवाडी तालुक्यात मेंढपाळांच्या तळांवर बिबट्या कडून होणारा हा दुसरा हल्ला आहे.
तालुक्यात सतत कोणत्या ना कोणत्या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव जनावरे, पाळीव कुत्री ठार केल्याची घटना घडत आहेत . त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
वन विभागाने तात्काळ बिबट्यांचा बंदोबस्त करावा. अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शाहुवाडी तालुक्यातील शेतकरी व मेंढपाळांनी दिला आहे.




















