शहरातील निर्जन, अंधाऱ्या ठिकाणी पुरेशी प्रकाशव्यवस्था करण्याबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुणे महानगरपालिकेला सूचना*
*महिलांच्या सुरक्षेसाठी पुणे महानगरपालिकेची यंत्रणा सशक्तपणे कार्यान्वित झाली पाहिजे- डॉ. नीलम गोऱ्हे*
पुणे दि. १ जानेवारी २०२५ : पुणे शहर पोलिसांनी शहरातील २७४ अंधारी, निर्जन ठिकाणी आवश्यक प्रकाश व्यवस्था करण्याविषयी विनंती केली असल्याचे समजते. मात्र शहरातील काही ठिकाणी खासगी जागा असल्याने महापालिकेला तिथे प्रकाश व्यवस्था करणे शक्य नसल्याचे वृत्तपत्रातील बातमीवरून निदर्शनास आले आहे.
सद्यस्थितीत पुण्यामध्ये नुकतीच झालेली अत्याचाराची घटना पाहता शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शहरामध्ये निर्जन ठिकाणी आवश्यक प्रकाश व्यवस्था व सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना पुणे महानगरपालिकेला दिल्या होत्या.

त्यानुसार, आपल्यामार्फत शहरांमध्ये विविध ठिकाणी पथदिवे नव्याने उभारण्याचे कारण सुरू आहे. पुढील सहा महिन्यात सर्व कामे पूर्ण होतील. त्याचबरोबर पुणे शहरातील दुर्दैवी घटना टाळण्याकरिता डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काही महत्त्वाचे निर्देशही दिले आहेत.
खासगी ठिकाणी कोणतीही दुर्दैवी घटना घडू नये, यासाठी महानगरपालिका कायद्यातील तरतुदीनुसार खासगी विकसक मालक यांना पथदिवे अथवा पुरेशी प्रकाश व्यवस्था करणे व सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक करावेत. महापालिका यंत्रणेने दक्ष राहणे आवश्यक आहे. पालिका विभाग स्तरावरील अधिकाऱ्यांनी, पोलीस अधिकाऱ्यांसोबत शहरातील अशी ठिकाणे निश्चित करून त्या ठिकाणी लवकरात लवकर वरील बाबींची पूर्तता करून घ्यावी.
शहरातील अडगळीच्या ठिकाणी सुशोभीकरणकरून पुरेशी प्रकाशव्यवस्था राहील याची दक्षता घ्यावी. नादुरुस्त पथदिवे तातडीने दुरुस्त होतील याकरिता संबंधितांना स्पष्ट निर्देश द्यावे. पुणे शहर व परिसर महिलांकरिता सुरक्षित आहे हा आत्मविश्वास पुण्यातील महिलांना येण्याकरिता पुणे महानगरपालिकेची यंत्रणा सशक्तपणे कार्यान्वित झाली पाहिजे, असंही याप्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत.





















