Home Uncategorized प्रभू श्रीरामचंद्रांच्या दर्शनासाठी कोराडी येथून बस रवाना* १५ तारखेला दुसरी बस...

प्रभू श्रीरामचंद्रांच्या दर्शनासाठी कोराडी येथून बस रवाना* १५ तारखेला दुसरी बस होणार रवाना; १०० लाडक्या बहिणी घेणार दर्शन

129
0

*प्रभू श्रीरामचंद्रांच्या दर्शनासाठी कोराडी येथून बस रवाना*

१५ तारखेला दुसरी बस होणार रवाना; १०० लाडक्या बहिणी घेणार दर्शन

*कोराडी (जि. नागपूर), ता. १ :* नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आई महालक्ष्मी जगदंबेचे स्थान असलेल्या कोराडी येथून प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन घेण्यासाठी अयोध्या येथे ५५ लाडक्या बहिणींची एक बस रवाना झाली आहे. महसूल मंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी या बसला हिरवा झेंडा दाखवला.

आई महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी तसेच मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जात आहे. यात ५५ लाडक्या बहिणींचा समावेश असलेली एक बस आज रवाना झाली असून, अजून एक बस १५ तारखेला रवाना होणार आहे. एकूण, १०० लाडक्या बहिणींना या उपक्रमाच्या माध्यमातून प्रभू श्रीरामचंद्रांच्या दर्शनाचे भाग्य मिळणार आहे. चार दिवसांचा हा प्रवास असून, याकरिता परिसरातील महिलांची मोठी मागणी होती, असे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

आपण मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असून, त्यांना आई महालक्ष्मी जगदंबेची काष्ठशिल्पातील मूर्ती भेट दिली. या प्रसंगी त्यांना आई महालक्ष्मी जगदंबेच्या दर्शनासाठी कोराडी येथे येण्याचे निमंत्रण दिले असून, येत्या काळात होणाऱ्या नागपूर दौऱ्यावेळी ते कोराडी येथील आई महालक्ष्मी जगदंबेच्या मंदिराला भेट देतील, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदी यांनी राज्य सरकारचा कारभार पारदर्शी करावा, केंद्र सरकारच्या योजना पूर्ण क्षमतेने राबवाव्यात या बद्दल मार्गदर्शन केले असून, जनतेने प्रचंड बहुमताने निवडून दिलेल्या सरकारच्या आपण पाठीशी असल्याचा आशीर्वादही दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात डबल इंजिन सरकार महाराष्ट्रात असल्याने, राज्याच्या विकासाचा वेग दुप्पट होणार असल्याचा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

कोणत्याही प्रकरणात आमदारांनी माध्यमांशी बोलण्यापूर्वी सरकारमधील यंत्रणा, संबंधित मंत्री यांच्याशी बोलावं आणि संबंधित प्रकरणात काय कार्यवाही झाली आहे, हे जाणून घ्यावं, तसेच, एखाद्या प्रकरणाचा तपास करताना तपासयंत्रणांवर दबाव येणार नाही याची काळजी घ्यावी, असा सल्लाही बावनकुळे यांनी या वेळी दिला.

• आरोपी सुटणार नाही

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांनी सरकारची भूमिका सुस्पष्टपणे मांडली असून, यातील एकही आरोपी सुटणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. या संदर्भात योग्य पुरावे मिळून योग्य चार्जशीट तयार होऊन आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, काही पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे काही मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारला नसल्याचे ते म्हणाले.

स्वामित्व योजना ही केंद्र सरकारची योजना असून, राज्याच्या सहकार्याने ती राबवायची आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झाल्याने राष्ट्रीय दुखवटा असल्याने या योजनेचा आरंभ होऊ शकला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्याशी या संदर्भात चर्चा केली असून, त्यांची वेळ मिळाली, की हा कार्यक्रम होईल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याबाबत प्रश्न विचारला असता, या संदर्भात त्यांनी दोघांनी निर्णय घ्यायचा असून, यात भाजपची काही भूमिका नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

*प्रदेशाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू*
भारतीय जनता पक्षाचे नवीन प्रदेशाध्यक्ष निवडण्यासंदर्भात टप्पे प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती महसूल मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या वेळी दिली. १ ते २० जानेवारीपर्यंत हे अभियान सुरू राहणार असून, यात दीड कोटी सदस्यांची नोंदणी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यानंतर सक्रिय सदस्यांची नोंदणी केली जाणार आहे. पुढे १ लक्ष बूथअध्यक्षांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर तालुकाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांची निवड केली जाणार असून, त्यानंतर प्रदेशाध्यक्षांची निवड होणार आहे. या संदर्भात, आमचे केंद्रीय नेतृत्व अंतिम निर्णय घेणार असल्याचेही बावनकुळे यांनी या वेळी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here