Home नागपूर *संघभूमीतच संघ आणि भाजपचा अहंकार जनतेने धुळीस मिळवला,तरुणांच्या रोषाचा विधान परिषद निवडणुकीत...

*संघभूमीतच संघ आणि भाजपचा अहंकार जनतेने धुळीस मिळवला,तरुणांच्या रोषाचा विधान परिषद निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना दणका*

12
0

*संघभूमीतच संघ आणि भाजपचा अहंकार जनतेने धुळीस मिळवला,तरुणांच्या रोषाचा विधान परिषद निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना दणका*

*काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांचा विधान परिषद निवडणुकीवरून भाजपवर हल्लाबोल*

नागपूर, दि. २९ –
विधान परिषद निवडणुकीतील निकालाने सत्तेच्या अहंकारात चूर झालेल्या भाजपचे डोळे उघडले आहेत. संघभूमी असलेल्या नागपुरातच संघ आणि भाजपचा प्रभाव दिसला नाही. सत्तेच्या मस्तीत दंग असलेल्या भाजपला तरुण, बेरोजगार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील जनतेच्या रोषाचा मोठा फटका बसला आहे. राज्यातील बदलाचे वारे आता स्पष्टपणे वाहू लागले असून महायुती सरकारच्या परतीचे दिवस सुरू झाले आहेत, अशी घणाघाती टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

विधान परिषद निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार म्हणाले की, तीन पदवीधर मतदारसंघांत महाविकास आघाडीला मिळालेला विजय हा जनतेच्या विश्वासाचा आणि सत्ताधाऱ्यांविरोधातील संतापाचा कौल आहे. ज्या मतदारसंघांत मतदानाचा प्रतिसाद अधिक होता, तिथे महाविकास आघाडीला यश मिळाले, तर कमी मतदान झालेल्या मतदारसंघांत महायुतीला यश मिळाले. संघभूमीतूनच भाजपला तरुणांनी गो बॅकचा संदेश दिला आहे. वाराणसीतील नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ट्विटमधून दिसलेला सत्तेचा अहंकार जनतेला मान्य नसल्याचे या निकालाने दाखवून दिले आहे.

महायुतीतील नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांवर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, नांदा सौख्यभरे, एवढेच मी त्यांना सांगणार आहे. हे पक्ष केवळ सत्तेत टिकून राहण्यासाठी एकत्र आले आहेत. जनतेच्या प्रश्नांशी त्यांना काहीही देणेघेणे नाही. महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांमध्ये आता केवळ हमरीतुमरी सुरू आहे. जनतेच्या हितापेक्षा सत्तेची खुर्ची वाचवणे हाच त्यांचा एकमेव अजेंडा आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत न्यायालयाच्या निर्णयावर बोलताना वडेट्टीवार यांनी ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले की, ओबीसींच्या आरक्षणाबाबत ठोस तोडगा न निघाल्याने समाजाचे राजकीय प्रतिनिधित्व कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत स्तरावर ओबीसींच्या सुमारे ६० टक्के जागा कमी झाल्याचा आमचा आक्षेप आहे. उद्या जिल्हा परिषदांमध्येही अशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते.

सरकारने ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही, अशी भूमिका मांडली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांवर अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. अशा परिस्थितीत ओबीसींच्या कमी होणाऱ्या जागांबाबत सरकार काय उत्तर देणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

निवडणुका होण्यास आमचा विरोध नाही, मात्र ओबीसी समाजाला त्यांचा घटनात्मक आणि कायदेशीर चौकटीतील आरक्षणाचा हक्क मिळालाच पाहिजे. ओबीसींचे प्रतिनिधित्व कमी करून निवडणुका होत असतील, तर हे सरकार ओबीसीविरोधी आहे, हे लपून राहणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निवडणुका होत असल्या तरी ओबीसी समाजाचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने प्रभावी पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.

विधान परिषद निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना वडेट्टीवार म्हणाले की, महाराष्ट्रातील निकाल देशात बदलाचे वारे वेगाने वाहू लागल्याचे संकेत देत आहेत.
येत्या १ नोव्हेंबरला दिल्लीतील आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होतील. निवडणूक आयुक्तांना हटवून लोकशाही वाचवण्याची मागणी हा जनतेच्या आक्रोशाचा आवाज असेल, असा दावा त्यांनी केला.

निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग चालवण्याच्या प्रस्तावाबाबतही इंडिया आघाडीने तयारी सुरू केली असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. निवडणूक प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असताना संबंधित यंत्रणांना सरकारकडून संरक्षण मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला. देश लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे जात आहे का, असा प्रश्न उपस्थित करत लोकशाही वाचवण्यासाठी हा लढा केवळ काँग्रेसचा नसून देशातील प्रत्येक नागरिकाचा असल्याचे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here