Home पुणे ‘मुलींच्या जन्माचे स्वागत घरातूनच व्हावे’; आईसोबत वडील आणि कुटुंबाचेही समुपदेशन करा :...

‘मुलींच्या जन्माचे स्वागत घरातूनच व्हावे’; आईसोबत वडील आणि कुटुंबाचेही समुपदेशन करा : डॉ. नीलम गोऱ्हे

9
0

‘मुलींच्या जन्माचे स्वागत घरातूनच व्हावे’; आईसोबत वडील आणि कुटुंबाचेही समुपदेशन करा : डॉ. नीलम गोऱ्हे

मुलींच्या घटत्या जन्मनोंदणी गुणोत्तराची दखल घ्या; बेकायदा गर्भलिंगनिदानावर कारवाई, ऊसतोड महिलांच्या आरोग्याची प्रत्यक्ष पाहणी आणि दीर्घकाळ प्रलंबित खटल्यांच्या पाठपुराव्याच्या सूचना

पुणे, दि. २७ ऑक्टोबर २०२६ : दोन मुली असलेल्या कुटुंबांमध्ये केवळ आईचे समुपदेशन करून चालणार नाही. वडील आणि कुटुंबातील इतर सदस्यांचेही समुपदेशन करून मुलगा-मुलगी समानतेची जाणीव निर्माण करावी. मुलासाठी महिलांवर येणारा दबाव दूर करण्यासाठी संपूर्ण कुटुंबाची मानसिकता बदलण्यावर भर द्यावा, अशा सूचना शिवसेना नेत्या, विधान परिषद सदस्या तथा माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.

PCPNDT व MTP कायद्यांसाठीच्या राज्यस्तरीय टास्क फोर्सच्या अध्यक्षा तसेच ऊसतोड महिला कामगारांच्या गर्भाशय शस्त्रक्रियाविषयक समितीच्या अध्यक्षा या नात्याने डॉ. गोऱ्हे यांनी आज पुणे येथे आढावा बैठक घेतली. पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग, पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील कायद्यांची अंमलबजावणी, न्यायालयीन प्रकरणे आणि ऊसतोड महिलांच्या आरोग्याचा आढावा यावेळी घेण्यात आला. आमदार उमा खापरे, डॉ. संदीप सांगळे, डॉ. भगवान पवार तसेच संबंधित आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधीक्षक बैठकीत सहभागी झाले.

मुलींच्या जन्मनोंदणी गुणोत्तराची गांभीर्याने दखल घ्या

बैठकीतील सादरीकरणानुसार, पुणे जिल्ह्यात सन २०२५ मध्ये दर हजार नोंदणीकृत मुलांमागे मुलींचे प्रमाण ८९५ होते. दि. १ जानेवारी ते २५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीतील नोंदींनुसार हे प्रमाण ८८२ असून ग्रामीण भागात ८४४ आणि शहरी भागात ८८८ आहे. या आकडेवारीत विलंबाने झालेल्या जन्मनोंदणीचाही समावेश असल्याचे सादरीकरणात नमूद करण्यात आले.

या स्थितीची तालुकानिहाय कारणे तपासून उपाययोजना कराव्यात. आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कुटुंबांशी संवाद वाढवावा आणि जनजागृतीचे प्रत्यक्ष परिणाम तपासावेत, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

नोंदणीकृत केंद्रांच्या तपासणीसोबत बेकायदा जाळ्याचा शोध घ्या

जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या सादरीकरणानुसार, ग्रामीण कार्यक्षेत्रात ११ शासकीय व ३५४ खाजगी सोनोग्राफी केंद्रे, तर ३० शासकीय व २२५ खाजगी गर्भपात केंद्रे आहेत. दि. २६ ऑक्टोबरपर्यंतच्या अहवालानुसार, पुणे महापालिका क्षेत्रात ९८८ सोनोग्राफी व ४३० MTP केंद्रांची, तर पिंपरी-चिंचवडमध्ये ६३७ सोनोग्राफी व २९१ MTP केंद्रांची नोंद आहे.

नियमित तपासण्यांसोबत वाहनांमधून किंवा अनधिकृत ठिकाणी होणाऱ्या बेकायदा गर्भलिंगनिदानाचा शोध घ्यावा. गोपनीय माहितीची पडताळणी करून पोलीस यंत्रणेच्या सहकार्याने डिकॉय कारवाई करावी, अशा सूचना डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या. शिरूर, उरुळीकांचन आणि दौंड येथील प्रकरणांमध्ये दाखल गुन्हे व संबंधित केंद्रांवरील कार्यवाहीचाही आढावा घेण्यात आला.

खटले रखडू नयेत; अधिकाऱ्यांचे मनोधैर्यही टिकले पाहिजे

पुणे महापालिकेच्या अहवालानुसार, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयातील २१, जिल्हा व सत्र न्यायालयातील ११ आणि उच्च न्यायालयातील सात प्रकरणे प्रलंबित आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयानेही सात न्यायालयीन प्रकरणांची माहिती सादर केली.

खटले दीर्घकाळ चालल्याने कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना बदली किंवा निवृत्तीनंतरही न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागते. त्यांचे मनोधैर्य टिकविण्यासाठी कायदेशीर मदत आणि प्रशासकीय पाठबळ आवश्यक आहे. अधिकारी निर्भयपणे काम करू शकतील, यासाठी त्यांच्या अडचणी सोडवाव्यात, असे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

विशेष सरकारी वकिलांची स्वतंत्र बैठक घेऊन प्रलंबित प्रकरणांचा पाठपुरावा करावा. जलद निपटाऱ्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी चर्चा करून विशेष व्यवस्थेची शक्यता तपासावी, असेही त्यांनी सुचविले.

ऊसतोड महिलांच्या आरोग्यासाठी थेट कार्यस्थळी पोहोचा

सादरीकरणातील हंगामपूर्व तपासणीच्या माहितीनुसार, तपासणी केलेल्या ६,३८३ ऊसतोड महिलांपैकी ५१२ महिलांना रक्तक्षय आढळला असून त्यांना लोहयुक्त गोळ्या देण्यात आल्या आहेत. नोंदविलेल्या ११८ गर्भवती ऊसतोड महिलांपैकी १२ महिलांना रक्तक्षय असल्याची माहिती देण्यात आली.

तपासणीनंतर उपचार पूर्ण होतात का, याची खात्री करावी. गर्भवतींची नियमित तपासणी आणि सुरक्षित प्रसूतीसाठी आरोग्य विभाग, साखर कारखान्यांचे कामगार अधिकारी व मुकादम यांचा समन्वय वाढवावा. स्थलांतरित महिलांच्या आरोग्य नोंदी संबंधित जिल्हे व रुग्णालयांना वेळेत उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.

पुण्यातील अहवालात मार्च २०२३ पूर्वी गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया झालेल्या सात ऊसतोड महिलांची नोंद असून या शस्त्रक्रिया पुणे जिल्ह्याबाहेर झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. मार्च २०२३ नंतरची नोंद शून्य दाखविण्यात आली आहे. प्रत्यक्ष संवादातून मिळणारी माहिती आणि अधिकृत नोंदींमध्ये तफावत असल्यास ती तपासावी. महिलांशी विश्वासाने संवाद साधून शस्त्रक्रियांची कारणे व वैद्यकीय आवश्यकता पडताळावी, असे त्यांनी सांगितले.

गर्भपातापूर्वी व नंतर महिलांना संवेदनशीलपणे समुपदेशन करून कुटुंबनियोजनाच्या पर्यायांची माहिती द्यावी. महिलांची गोपनीयता आणि परिस्थिती लक्षात घेऊन शक्य असेल तेथे पतीचाही समुपदेशनात सहभाग घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली.

आमदार उमा खापरे यांनी समित्यांचे काम नागरिक व लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचविण्यावर भर दिला. डॉ. संदीप सांगळे यांनी जिल्ह्यांमधील समन्वय व आरोग्यविषयक माहितीची देवाणघेवाण वाढविण्याची गरज मांडली. डॉ. भगवान पवार यांनी कारवाई करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना न्यायालयीन प्रक्रियेत संस्थात्मक पाठबळ आवश्यक असल्याचे नमूद केले.

दिवाळीनंतर तालुकानिहाय सामाजिक कार्यकर्ते, महिला प्रतिनिधी आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिनिधींची ऑनलाइन बैठक घेऊन जनजागृती व लोकसहभाग वाढविण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here