Home मुंबई *शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदत करण्याचे...

*शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदत करण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश*

19
0

*शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदत करण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश*

*अर्जापासून पंचनाम्यापर्यंत शिवसैनिक देणार शेतकऱ्याला साथ*

*शिवसेनेकडून दिवाळीचा शिधा वाटपानंतर दुष्काळग्रस्त भागात पाण्याचे टँकरही पुरवणार*

*सरकारी मदत प्रत्यक्ष लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्याची पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी*

मुंबई, ता. 25 :

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी आणि ग्रामीण जनतेला तातडीने मदत मिळावी, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे सर्व मंत्री, खासदार आमदार आणि पदाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष बांधावर उतरून शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. दुष्काळग्रस्तांना मदत देताना अर्जापासून पंचनाम्यापर्यंत आणि सरकारी मदत प्रत्यक्ष लाभार्थ्याच्या हातात येईपर्यंत शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहण्याची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी आज त्यांना व्हीसी द्वारे केले.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून दसरा मेळाव्याला १७९ दुष्काळग्रस्त तालुक्यात ४ लाख ६० हजार धान्य किट
मदत म्हणून पाठविण्यात आली. मात्र मदत पाठविणे एवढ्यावर न थांबता ती खरोखर गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचावी याची खात्री करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले. धान्य किटसोबत आवश्यक जीवनावश्यक वस्तूंची व्यवस्था आणि स्थानिक पातळीवर वितरणाची जबाबदारीही पदाधिकाऱ्यांनी घ्यावी, असे त्यांनी यावेळी सांगितले. पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई पाहता पक्षाच्या वतीने गावोगावी टँकर पुरवण्याचा देखील नक्की विचार करू असे शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

दुष्काळात राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देण्याचा संदेश देताना शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाच्या विचाराची आठवण करून दिली. आरोप-प्रत्यारोपात वेळ न घालवता शिवसैनिकांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जावे आणि त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

प्रत्येक मंत्र्याने त्यांना सोपवलेल्या दुष्काळग्रस्त भागाची जबाबदारी स्वीकारून नियमित दौरे करावेत. केवळ बैठका न घेता शेत, गाव, बाजारपेठ आणि पाणीटंचाईच्या ठिकाणी जाऊन शेतकरी, महिला, शेतमजूर, पशुपालक आणि ग्रामस्थांशी थेट संवाद साधावा, असे निर्देश देण्यात आले. सध्या परिस्थिती बिकट असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या मनात आत्महत्या करण्याचे टोकाचे विचार येऊ शकतात त्यांना वेळीच रोखून धीर देण्याचा प्रयत्न करावा असेही त्यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना सांगितले.

पीक नुकसान आणि पंचनामे, नुकसानभरपाई, पीक कर्ज पुनर्गठन, कृषी पंपांचा वीजपुरवठा, पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा-पाणी, रोजगार आणि शासनाच्या योजनांचा लाभ यांचा आढावा घेण्यास सांगण्यात आले. पात्र शेतकऱ्याला केवळ कागदपत्रे किंवा प्रशासकीय विलंबामुळे मदतीपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी मंत्री आणि पालकमंत्र्यांनी दर १५ दिवसांनी दुष्काळग्रस्त तालुक्यांचा प्रशासनाकडून आढावा घ्यावा, त्याची नोंद वही तयार करून सर्व भागात आवश्यक मदत पोहोचते की नाही ते स्वतः तपासावे असेही सुचवले.
शासकीय मदत मिळवताना अर्ज भरण्यापासून पंचनाम्यापर्यंत शिवसैनिकांनी शेतकऱ्यांना मदत करावी, अशी स्पष्ट भूमिका शिंदे यांनी यावेळी मांडली.

पाणी हा सर्वोच्च प्राधान्यक्रम ठेवून टँकरची गरज, टँकर वेळेवर पोहोचतो का, विहिरी-बोअरवेलची स्थिती आणि पुढील १५ ते ३० दिवसांची पाणीव्यवस्था याची पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जनावरांसाठी चारा, पाणी, छावण्या आणि पशुवैद्यकीय सेवांकडेही लक्ष देण्यास सांगण्यात आले.

दरम्यान, दुष्काळाच्या काळात भव्य कार्यक्रम, अनावश्यक स्वागत-सत्कार, शक्तिप्रदर्शन, मंडप, जाहिरातबाजी, बॅनर-होर्डिंग्जवरील खर्च टाळून उपलब्ध साधनसंपत्ती मदतकार्यासाठी वापरण्याचे आवाहन करण्यात आले. पक्ष, जात, गाव किंवा राजकीय मत न पाहता प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत मदत पोहोचली पाहिजे, हा शिंदे यांच्या मार्गदर्शनाचा केंद्रबिंदू ठरला. शेतकऱ्याला जगवणे सगळ्यात जास्त महत्त्वाचे असून बाकीच्या गोष्टीना नंतर प्राधान्य द्या असेही त्यांनी पक्ष सहकाऱ्यांना सांगितले.

याशिवाय पक्ष पदाधिकाऱ्यांनी सुचवलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी त्या आगामी कॅबिनेट बैठकीत मांडून त्यांना मंजुरी मिळण्याबाबत त्यांनी सकारात्मकता दाखवली. तसेच काही मागण्या केंद्रीय पातळीवर सोडवण्यासाठी केंद्र शासनाला पत्र लिहिण्याची देखील त्यांनी तयारी दर्शवली.

मायक्रो फायनान्स कंपन्या, बँका आणि खाजगी सावकार यांच्याकडून शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रशासकीय पातळीवर ठोस निर्णय घेण्यात येणार असून त्याची अंमलबजावणी करण्याबाबत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दक्ष राहावे असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले. शासकीय यंत्रणेच्या सोबतीने शिवसेनेची यंत्रणा राबली तर शेतकऱ्यांना नक्की मोठा दिलासा मिळेल असे सांगून त्यासाठी सर्वांनी एकदिलाने कामाला लागावे असे आवाहन शिंदे यांनी यावेळी केले.

यावेळी शिवसेनेचे सर्व मंत्री, खासदार,आमदार, प्रमुख पक्ष पदाधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.

.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here