Home नाटक / चित्रपट / मालिका / समीक्षा “कलाली – मराठी शब्दकोश : ऐतिहासिक दस्तावेज” – डॉ. रामदास चवरे यांचा...

“कलाली – मराठी शब्दकोश : ऐतिहासिक दस्तावेज” – डॉ. रामदास चवरे यांचा गौरव

33
0

“कलाली – मराठी शब्दकोश : ऐतिहासिक दस्तावेज” – डॉ. रामदास चवरे यांचा गौरव

*विदर्भ संशोधन मंडळाचा स्व. सरोजबेन कोठारी स्मृति ग्रंथ पुरस्कार जाहीर*

विदर्भ संशोधन मंडळातर्फे देण्यात येणाऱ्या स्व. सरोजबेन कोठारी स्मृति ग्रंथ पुरस्कारासाठी प्रा. डॉ. रामदास चवरे यांनी अथक परिश्रम करून लिहिलेल्या *’कलाली-मराठी शब्दकोश’* या ग्रंथाची निवड करण्यात आली आहे.

पुरस्कार समारंभ *शनिवार दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सायं. ७ वाजता* मंडळाच्या डॉ. वा. वि. मिराशी सभागृह, नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.

या निमित्ताने या कोशाचे महत्व आणि स्वरूप विशद करणारा हा लेख.

*प्रा. डॉ. रामदास चवरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन!*
– संपादक

—

महाराष्ट्रात विविध बोली भाषा आहेत. त्यापैकीच पूर्व विदर्भात बोलली जाणारी एक बोली भाषा म्हणजे ‘कलाली’ होय. ही कलाली भाषा कलाल समाज तर बोलतोच, मात्र इतरांनाही ती बोलता यावी, निदान समजावी, या बोलीतील शब्द कळावेत, विविध शब्दांचा अर्थ माहीत व्हावा यासाठी कलाली भाषेचा पहिला आणि ऐतिहासिक दस्तावेज डॉ. रामदास चवरे यांनी उपलब्ध करून दिला आहे.

शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, खासगी संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा शब्दकोश उपयुक्त ठरणार आहे. विशेष करून कॉलेज, विद्यापीठात शिकणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शक आणि संशोधनासाठी हा कोश फायदेशीर ठरणार आहे.

डॉ. रामदास चवरे हे गेल्या ४०-४५ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. प्राध्यापक, प्राचार्य असा त्यांचा प्रवास राहिला आहे. ते साहित्यिक आणि संशोधक असल्यामुळे त्यांचा हा शब्दकोश अधिकच व्यापक आणि एकमेव कायमस्वरूपी ठेवा आहे, यात शंका नाही. कविता, कथा, कादंबरी, ललित, संशोधनात्मक पुस्तके तसेच ‘असो चैतको मयना’ या कलाली बोलीतील कवितासंग्रहाची त्यांनी निर्मिती केली आहे.

डॉ. चवरे हे विदर्भातील अमरावती जिल्ह्याच्या मुऱ्हा या गावातील असल्यामुळे त्यांना ग्रामीण वजा शहरी भागातील लोकांचे राहणीमान, त्यांचे वागणे, बोलणे, सवयी, भाषा आदींचा चांगलाच अभ्यास आहे.

*कलाली-मराठी शब्दकोशाचे वैशिष्ट्य:*
या शब्दकोशात कलाली भाषेत बोलल्या जाणाऱ्या सर्व शब्दांचा समावेश करण्याचा प्रयत्न डॉ. चवरे यांनी केला आहे. कोणताही शब्दकोश परिपूर्ण नसतो.

कलालीतील काही अनोखे शब्द पाहू –
– *बिहाव* म्हणजे लग्न
– *मोळको* म्हणजे मोडक्या
– *लाळू* म्हणजे लाडू
– *घळीभर* म्हणजे घडीभर

मराठीत ‘ड’ चा कलालीमध्ये ‘ळ’ होतो, असा बदल दिसतो. हिंदीतील ‘उपरसे’ हा शब्द कलालीत ‘उप्परसे’ असा होतो. तर टीव्ही, कॉम्प्युटर, पेन, पेन्सिल, कॉलेज, टेबल असे इंग्रजी शब्द जसेच्या तसेच बोलले जातात.

या कोशात नातेसंबंध, रंग, काळ, ऋतू, नक्षत्रे, वार, महिन्यांची नावे, शरीराचे अवयव, शेती आणि व्यवहार आदी विषयांतील शब्दांचा बारकाईने विचार करण्यात आला आहे.

*उदा.* कलालीत आईला ‘माय’, मुलाला ‘टुरा’, मुलीला ‘टुरी’, लहान भावाला ‘लायनो भाई’, आत्याला ‘फूपू’, नवऱ्याला ‘लाळा’, बायकोला ‘लुगाईन’ असे म्हणतात. हिरवो-हिरवा, पांडरो-पांढरा, जांबरो-जांभळा अशी रंगांची नावे आहेत.

डॉ. रामदास चवरे लिखित ‘कलाली – मराठी शब्दकोश’ हा २८६ पानांचा आणि साडे सहा हजार शब्दांचा ग्रंथ असून पुण्याच्या यशोदीप प्रकाशनाने तो प्रकाशित केला आहे. ग्रंथाची छपाई देखील सुबक आहे.

हा ग्रंथ शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि सार्वजनिक वाचनालयांनी आपल्या संग्रही निश्चितच ठेवावा असा आहे.

*- शेषराव वानखेडे*
*ज्येष्ठ पत्रकार*
*+91 9869484800*

—
*✍️ संपादक: प्रो. शीतल हरीश करदेकर*
*MAI MEDIA 24 | https://maimedia24.com*
*🔵 Facebook | 📸 Instagram | ▶️ YouTube | 𝕏 Twitter | 💬 WhatsApp*
*Follow @maimedia24*
—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here