*दादर येथील स्व. माँसाहेब मीनाताई ठाकरे फुल मंडई आणि सेनापती बापट मार्ग परिसरातील १२ अनधिकृत बांधकाम, तात्पुरते शेड आदींचे निष्कासन*
*• ‘पादचारी प्रथम’ अभियान अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी उत्तर’ विभागाकडून कारवाई*
पदपथांवर पादचाऱ्यांना सुलभपणे मार्गक्रमण करता यावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत, दादर येथील स्व. माँसाहेब मीनाताई ठाकरे फुल मंडई आणि सेनापती बापट मार्गालगतच्या पदपथावर अडथळा निर्माण करणारी १२ अनधिकृत बांधकामे, तात्पुरते ताडपत्रीचे शेड, अनधिकृत कट्टे आणि ६० फेरीवाल्यांवर आज (दिनांक २३ ऑक्टोबर २०२६) निष्कासनाची कारवाई करण्यात आली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी उत्तर’ विभागाकडून ही कारवाई करण्यात आली.
महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनात, पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमणे तत्काळ हटवून पदपथ अडथळामुक्त करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ‘पेडेस्ट्रियन फर्स्ट’ (Pedestrian First) अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर, उपायुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त (जी उत्तर विभाग) योगेश देसाई यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या कारवाईत दादर येथील स्व. माँसाहेब मीनाताई ठाकरे फुल बाजार आणि सेनापती बापट मार्गालगतच्या पदपथावर अडथळा निर्माण करणारी १२ अनधिकृत बांधकामे, तात्पुरते ताडपत्रीचे शेड, अनधिकृत कट्टे आणि ६० फेरीवाल्यांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. यावेळी, पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात होता.
दरम्यान, पादचाऱ्यांसाठी सुलभ पदपथ उपलब्ध करुन देण्यासाठी महानगरपालिकेकडून उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे, पदपथांवर अडथळा निर्माण होईल, असे अनधिकृत बांधकाम करू नये अथवा साहित्य ठेवू नयेत. असे निदर्शनास आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.
***






















