Home मुंबई *मुंबई उपनगरातील दहिसर, कांदरपाडा,एकसर कोळीवाड्यांचे नवीन सीमांकन*

*मुंबई उपनगरातील दहिसर, कांदरपाडा,एकसर कोळीवाड्यांचे नवीन सीमांकन*

35
0

*मुंबई उपनगरातील दहिसर, कांदरपाडा,एकसर कोळीवाड्यांचे नवीन सीमांकन*
• फडणवीस सरकारचा निर्णय
*महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशावरून परिपत्रक जारी*
*•तीन महिन्यांत येणार अहवाल*
*•पूर्वीच्या सीमांकन झालेल्या पाच कोळीवाड्यांचे नव्याने वाढीव सीमांकनही होणार*

मुंबई, दि.१५ : मुंबईतील कोळी समाजाच्या पारंपरिक जमिनींच्या हद्दी निश्चित करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी मुंबई उपनगरातील पाच कोळीवाड्यांच्या आधी झालेल्या सीमांकनाव्यतिरिक्त उर्वरित क्षेत्राचे सीमांकन केले जाणार असून, दहिसर गावठाण, कांदरपाडा गावठाण-दहिसर आणि कांदरपाडा गावठाण-एकसर या तीन नवीन कोळीवाड्यांचे सीमांकन केले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भातील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

खारदांडा, जुहू कोळीवाडा, जुहू मोरागाव कोळीवाडा, मढ आणि वर्सोवा या पाच कोळीवाड्यांच्या आधी झालेल्या सीमांकनाव्यतिरिक्त उर्वरित क्षेत्राच्या हद्दीही निश्चित केल्या जाणार आहेत.

कोकण विभागाच्या भूमी अभिलेख उपसंचालकांच्या नियंत्रणाखालील यासाठी समिती नेमण्यात आली असून समितीने तीन महिन्यांच्या आत शिफारशींसह स्वयंस्पष्ट अहवाल शासनाला सादर करायचा आहे. आवश्यकतेनुसार तज्ज्ञ व्यक्ती, निवृत्त अधिकारी किंवा अन्य योग्य व्यक्तींना समितीच्या बैठकीसाठी विशेष निमंत्रित म्हणून बोलावण्याचे अधिकारही समितीच्या अध्यक्षांना देण्यात आले आहेत.

*२९ पैकी २३ कोळीवाड्यांचे सर्वेक्षण पूर्ण*
मुंबई उपनगरातील एकूण २९ कोळीवाड्यांपैकी २३ कोळीवाड्यांचे सर्वेक्षण यापूर्वीच पूर्ण झाले आहे. मात्र, या सर्वेक्षणादरम्यान काही क्षेत्रे सुटल्याची तसेच काही कोळीवाड्यांचा समाविष्ट राहिल्याची निवेदने लोकप्रतिनिधींकडून शासनाला प्राप्त झाली होती. यावर विचार करून सरकारने वाढीव क्षेत्राचे आणि राहिलेल्या कोळीवाड्यांचे सीमांकन करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई शहरातील सात प्रमुख कोळीवाड्यांच्या सीमांकनाचा प्रश्नही गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. शिवडी, सायन, कुलाबा, माहीम, मांडवी-प्रिन्सेस डॉक, वरळी आणि कफ परेड या सात कोळीवाड्यांच्या सीमांकनासाठी राज्य शासनाने यापूर्वी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीला संबंधित सीमांकनाबाबत शिफारशी सादर करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
—-
“मुंबई आणि उपनगरातील कोळी बांधव हे या परिसराचे मूळ रहिवासी आहेत. त्यांच्या पारंपरिक वस्ती आणि जमिनींच्या हद्दी स्पष्ट होणे महत्त्वाचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार सीमांकनाच्या प्रलंबित प्रश्नांवर कार्यवाही करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. उपलब्ध नोंदी आणि प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार करून ही प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करण्यावर भर दिला जाईल. कोळी बांधवांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या जमिनींसंदर्भातील प्रश्न सोडविण्यास शासन प्राधान्य देत आहे”
• चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here