Home जालना / परभणी / बीड / लातूर / हिंगोली / नांदेड / उस्मानाबाद *महिला शेतकरी आत्महत्या करत आहेत, ही महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा,काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार*

*महिला शेतकरी आत्महत्या करत आहेत, ही महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा,काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार*

67
0

*महिला शेतकरी आत्महत्या करत आहेत, ही महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा,काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार*

*शेतकऱ्यांची भाकरी-चटणी स्वीकारत वडेट्टीवारांचा शब्द, शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांसोबत लढणार*

*सहा तास लोडशेडिंगने हिंगोली हैराण,सत्ताधारी लोकप्रतिनिधी कुठे? वडेट्टीवार यांचा सवाल*

हिंगोली | दि. ८ : महाराष्ट्र १९७२ नंतरच्या सर्वात भीषण दुष्काळी संकटाला सामोरे जात असून, मराठवाड्यातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. तलावांमध्ये पाणी नाही, विहिरी कोरड्या पडल्या आहेत, पिण्याच्या पाण्याचे संकट उभे राहणार आहे. अशा परिस्थितीत सरकारने केवळ जीआर काढून शेतकऱ्यांची फसवणूक न करता तातडीने हेक्टरी एक लाख रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, १९७२ च्या दुष्काळात सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून मदत केली होती. आजचा कोरडा दुष्काळ त्याहून गंभीर आहे. अल निनोचा परिणाम होणार असल्याची माहिती सरकारला आधीपासून होती. तरीही आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. सरकारने शेतकरी संकटाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.

दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आपण शेतकऱ्यांच्या बांधावर जात असून, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेत असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. हिंगोलीत मागील २० दिवसांत हिंगोली सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यात महिला शेतकऱ्याचा समावेश आहे ही धोक्याची घंटा आहे. शेतकऱ्याला सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आत्महत्येची वेळ येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करण्यात आली, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. कर्जपुनर्गठन हा कायमस्वरूपी उपाय नसून पुढील काळात शेतकऱ्याला ते कर्ज फेडावेच लागणार आहे. त्यामुळे कर्जपुनर्गठन न करता सरसकट ७/१२ कोरा करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, अशी मागणी त्यांनी केली.

दुष्काळी संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढायचे असेल तर सरकारने अनावश्यक मोठे प्रकल्प आणि खर्च थांबवून शेतकऱ्यांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा. शक्तिपीठ महामार्ग रद्द करा आणि त्यासाठीचा पैसा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरा. कुंभमेळ्यापेक्षा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे महत्त्वाचे आहे, असा घणाघात वडेट्टीवार यांनी केला.

शेतकऱ्यांनीही शक्तिपीठ महामार्ग रद्द करा अशी मागणी करत वडेट्टीवार यांना चटणी-भाकरी दिली. मंत्र्यांना काजू-बदाम दिले जातात.पण वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांनी दिलेली भाकरी स्वीकारली आणि शक्तिपीठ महामार्गाविरोधात सभागृहात आवाज उठवू तसेच रस्त्यावरही आंदोलन उभे करू, असा निर्धार व्यक्त केला.
शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांना शेतात जाऊ न देता मोजणी सुरू असल्याचा आरोप करत वडेट्टीवार यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शेतकऱ्यांच्या इच्छेविरुद्ध जमीन घेण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही. शक्तिपीठविरोधात शेतकऱ्यांच्या मागणीला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे, असे ते म्हणाले.

शेतकऱ्यांचे कर्ज माफ करताना सरकारच्या हाताला लकवा मारतो का? उद्योगपतींची कर्जे माफ होतात, मग कष्टकरी शेतकऱ्याला कर्जमाफी का नाही? शेतकरी जगला तरच देशाची आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मजबूत राहील, असे वडेट्टीवार यांनी सुनावले.

हिंगोली जिल्ह्यात तब्बल सहा तास लोडशेडिंग सुरू असल्याचा मुद्दाही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. हिंगोलीत सहा आमदार आणि दोन खासदार सत्ताधारी पक्षाचे आहेत. मग जनतेच्या प्रश्नांसाठी हे लोकप्रतिनिधी काय करत आहेत? हिंगोलीला वाली कोण? जनतेने एकदा या लोकप्रतिनिधींना जाब विचारला पाहिजे,असे ते म्हणाले.

हिंगोलीमध्ये घडलेल्या स्फोटाच्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून जखमींच्या कुटुंबीयांचीही वडेट्टीवार यांनी भेट घेतली. या दुःखद घटनेबद्दल त्यांनी संवेदना व्यक्त करत पीडित कुटुंबांना आवश्यक मदत मिळावी, अशी मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here