Home मुंबई *राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, शेतकऱ्यांनी चिंता करू नये; महायुती सरकार दिलेला...

*राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, शेतकऱ्यांनी चिंता करू नये; महायुती सरकार दिलेला शब्द पाळणारे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

53
0

*राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, शेतकऱ्यांनी चिंता करू नये; महायुती सरकार दिलेला शब्द पाळणारे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

*मुंबई, दि. २६:* संकटाच्या प्रत्येक काळात महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहे. आताही दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांनाच आमचे संपूर्ण प्राधान्य राहील, अशी ग्वाही देतानाच आम्ही दिलेला शब्द पाळणारे असून २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून त्यासाठीच्या उपाययोजना आणि विशेष सवलती जाहीर केल्याचे सांगत शेतकरी बांधवांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

यासंदर्भात अधिक माहिती देताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुख्यमंत्र्यांसह आम्ही मंत्रिमंडळातील सहकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेत आहोत. कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला होता. कालच माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली. त्यानुसार ट्रिगर-१ लागू झालेल्या २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करणारा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

*शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या सवलती:*

१) जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन आणि कर्जवसुलीस स्थगिती
२) कृषी पंपांच्या वीजबिलात सवलत, वीज जोडणी खंडित न करण्याचे निर्देश
३) रोहयोमध्ये जास्तीत जास्त कामे, निकषात शिथिलता
४) टँकरद्वारे पाणीपुरवठा, जनावरांसाठी चारा, अन्नधान्य टंचाई भासू न देण्याचे निर्देश
५) विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी

*पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने*

पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. प्रत्यक्ष पिकांची स्थिती छायाचित्रे आणि जीपीएस कोऑर्डिनेट्ससह नोंदवली जाणार असून, नुकसानभरपाई स्वतंत्र GR द्वारे जाहीर होणार आहे.

“दुष्काळ जाहीर करणे ही सुरुवात आहे; शेतकऱ्याला प्रत्यक्ष मदत मिळणे हे अंतिम उद्दिष्ट आहे. शेतकरी बांधवांनी टोकाचा निर्णय घेऊ नये,” असे आवाहन शिंदे यांनी केले.

दरम्यान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या १२.५८ लाख शेतकऱ्यांना ऑगस्ट अखेरपर्यंत १० हजार ११५ कोटी रुपये वितरित झाल्याचेही त्यांनी सांगितले.

—
*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here