*ब्रेकिंग : उल्हासनगर सनद घोटाळा प्रकरण – राज्य सरकारने दिले चौकशीचे आदेश, १५ दिवसांत अहवाल मागवला*
*उल्हासनगर / मुंबई :* उल्हासनगरमधील सनद वाटपात घोटाळा झाल्याच्या तक्रारीची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे.
महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडून दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी कोकण विभागीय आयुक्तांना अधिकृत पत्र पाठवण्यात आले आहे. हे पत्र अवर सचिव सुधाकर शाहाजी यादव यांनी डिजिटली स्वाक्षरी करून जारी केले आहे. (क्रमांक : संकिण-०९२६/प्र.क्र.१११/आस्था-२)
*पत्रात काय म्हटले आहे?*
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. नोवेल साळवे यांनी उपविभागीय अधिकारी, उल्हासनगर श्री. विजयानंद शर्मा यांच्यावर सनद वाटपात घोटाळा केल्याचा आरोप करत त्यांना निलंबित करून चौकशी करण्याची मागणी शासनाकडे केली होती. या मागणीसाठी त्यांनी दि. २३.०९.२०२६ पासून आझाद मैदान, मुंबई येथे उपोषण सुरू केले आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाने निर्देश दिले आहेत की –
“श्री. नोवेल साळवे यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने सखोल व निष्पक्ष चौकशी करून सत्वर योग्य ती कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह व आवश्यक त्या कागदपत्रांसह शासनास १५ दिवसांत सादर करावा.”
या पत्राची प्रत माहितीसाठी जिल्हाधिकारी, ठाणे यांनाही पाठवण्यात आली आहे.
*पुढे काय?*
या आदेशानंतर आता कोकण आयुक्त कार्यालयाकडून सनद वाटपाचे सर्व रेकॉर्ड, प्रक्रिया आणि संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका याची तथ्यात्मक चौकशी होणे अपेक्षित आहे. चौकशी अहवाल आल्यानंतरच आरोपांमध्ये किती तथ्य आहे हे स्पष्ट होईल.
या प्रकरणी SDO श्री. विजयानंद शर्मा यांची अधिकृत प्रतिक्रिया आल्यानंतर तीही प्रकाशित केली जाईल.
*- माई मीडिया २४ | पुराव्यासह*





















