*जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र OBC कॉलमसाठी एल्गार; ‘चलो दिल्ली’चा नारा, १ नोव्हेंबरला देशव्यापी आंदोलन – विजय वडेट्टीवार*
*नागपूर, दि. १९ सप्टेंबर २०२६*
जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम असला पाहिजे, या मागणीसाठी *’चलो दिल्ली’* चा नारा देत १ नोव्हेंबर रोजी देशव्यापी आंदोलनाची घोषणा आज नागपुरात करण्यात आली. ओबीसी नेते *विजय वडेट्टीवार* यांनी ही माहिती दिली.
यासाठी व्यापक आंदोलन उभारण्यासाठी आज नागपुरात विदर्भस्तरीय ओबीसी नेते, पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
बैठकीनंतर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, “ओबीसींची स्वतंत्र कॉलमसह जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, ही आमची स्पष्ट मागणी आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे ओबीसी समाजामध्ये तीव्र असंतोष आहे. ओबीसींची खरी लोकसंख्या समोर आली नाही, तर त्यांच्या प्रतिनिधित्वाचा आणि आरक्षणाचा प्रश्न अधिक गंभीर होईल.”
*आंदोलनाची रुपरेषा:*
*१.* १३ सप्टेंबर रोजी दिल्लीत देशभरातील सुमारे ६५ ओबीसी संघटनांची बैठक झाली.
*२.* २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त तालुका स्तरावर सत्याग्रह
*३.* २५ ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय आंदोलन व मोर्चे
*४.* १ नोव्हेंबर रोजी ‘चलो दिल्ली’चा नारा देत देशव्यापी आंदोलन
दिल्लीतील आंदोलनाचे स्वरूप देशभरातील संघटनांच्या संयुक्त बैठकीत निश्चित होईल, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
*ओबीसी विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि मराठा आरक्षणावर भूमिका*
महाज्योती, बार्टी सारख्या संस्थांना लोकसंख्येच्या प्रमाणात निधी आणि शिष्यवृत्तीच्या प्रश्नावर सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
मराठा आरक्षणाबाबत बोलताना ते म्हणाले, “सरकारने कोणत्याही समाजाच्या हक्कातील वाटा दुसऱ्या समाजाला देऊ नये. ज्यांना आरक्षण द्यायचे असेल ते स्वतंत्रपणे द्या, मात्र ओबीसींच्या वाट्याचे आरक्षण कुणालाही देऊ नका. आमच्या हक्कांवर गदा आली तर आम्ही स्वस्थ बसणार नाही.”
*दुष्काळ आणि इतर मुद्दे*
मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर सरकारने केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्याच्या तिजोरीतून तातडीने मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.
नांदेडमधील काजू-बदाम चर्चेवर बोलताना ते म्हणाले, “काजू-बदाम खाल्ल्याने कोणाचे मन बदलत नाही. दुष्काळासारख्या संवेदनशील विषयावर ठोस निर्णय घ्या.”
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत ते म्हणाले, “त्या मागण्यांमधून ओबीसींचे हक्क हिरावले जात असतील तर आम्ही स्वस्थ बसणार नाही. आता न्यायालयीन लढाईही सुरू झाली आहे. शिव्या आम्हालाही देता येतात, मात्र ती आमची संस्कृती नाही.”
या बैठकीला उमेश कोर्राम, सदानंद इलमे, बबलू कटरे, विलास काळे, मोहन हरडे, अनिल डहाके व विदर्भातील ११ जिल्ह्यातील ओबीसी नेते उपस्थित होते.
—
*
माऊली, हा लेख *”विदर्भ” आणि “राजकारण”* कॅटेगरीत टाका.





















