*ऑस्करच्या शर्यतीत मराठीचा ‘गोंधळ’! ३३ बलाढ्य चित्रपटांना पछाडत थेट हॉलिवूडच्या दारात*
*मुंबई / नाशिक, दि. १९ सप्टेंबर (MAI MEDIA 24) -* मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाचा क्षण! सिन्नर, नाशिकचे सुपुत्र संतोष डवाखर दिग्दर्शित ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची ऑस्कर २०२७ साठी भारताची अधिकृत निवड झाली आहे.
फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने (FFI) काल शुक्रवारी मुंबईत ही घोषणा केली. ‘गोंधळ’ हा चित्रपट ९९ व्या अकादमी पुरस्कारांमध्ये बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म विभागात भारताचे प्रतिनिधित्व करेल.
*३३ चित्रपटांमध्ये बाजी मारली -*
FFI च्या निवड समितीचे अध्यक्ष पी. शेषाद्रि यांनी सांगितले की, गेल्या १० दिवसात ३३ चित्रपट पाहिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. या शर्यतीत यामी गौतमचा ‘हक’, सनी देओलचा ‘बॉर्डर २’, आदित्य धरचा ‘धुरंधर’, ‘१२० बहादूर’, राम चरणचा ‘पेड्डी’ सारखे मोठे चित्रपट होते.
‘गोंधळ’ व्यतिरिक्त ‘अंघ’ आणि ‘इक्कीस’ हे दोन चित्रपट टॉप ३ मध्ये होते, पण अखेर ‘गोंधळ’ ने बाजी मारली.
*काय आहे ‘गोंधळ’ची कथा?*
हा चित्रपट महाराष्ट्राच्या पारंपरिक गोंधळ या लोककलेवर आधारित आहे. मध्यरात्रीच्या गोंधळाच्या जागरणात घडणारी ही थरारक कथा आहे. सुमन नावाची तरुणी आपल्या जुलमी नवऱ्यापासून सुटण्यासाठी आणि आपल्या प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी पवित्र परंपरेलाच मृत्यूचा सापळा बनवते. भक्ती, फसवणूक आणि नियती यांचा थरारक खेळ या चित्रपटात पाहायला मिळतो.
*स्टारकास्ट आणि टीम -*
– दिग्दर्शक – संतोष डवाखर (सिन्नर, नाशिक) – IFFI २०२५ मध्ये सिल्व्हर पीकॉक सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार विजेते
– प्रमुख भूमिका – इशिता देशमुख (सुमन), किशोर कदम, योगेश सोहनी, निषाद भोईर
– संगीत – पद्मविभूषण इलैयाराजा
– वर्ल्ड प्रीमियर – ५६ व्या IFFI गोवा २०२५ मध्ये
*चौथा मराठी मानकरी -*
‘गोंधळ’ हा ऑस्करमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा चौथा मराठी चित्रपट ठरला आहे. यापूर्वी ‘श्वास’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ आणि ‘कोर्ट’ यांनी हा मान मिळवला होता.
*वडेट्टीवारांचे अभिनंदन -*
या ऐतिहासिक निवडीबद्दल काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी ट्वीट करत म्हटले आहे – “संतोष डवाखर दिग्दर्शित ‘गोंधळ’ची निवड ही संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब आहे. मराठी मातीतील कथा आता जागतिक व्यासपीठावर पोहोचत आहे.”
आता सर्वांच्या नजरा १४ मार्च २०२७ रोजी लॉस एंजेलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये होणाऱ्या ऑस्कर सोहळ्याकडे लागल्या आहेत.
*- Pro. Shittal Kardekar, MAI MEDIA 24, मुंबई
—




















