*देशातील मोठी उद्योग वसाहत होणार*
छत्रपती संभाजीनगर मध्ये पश्चिम उन्नत द्रुतगती मार्ग आणि समृद्धी महामार्गामुळे शेंद्रा-बिडकीन, डीएमआयसी सारखं क्लस्टर आता देशातलं प्रमुख क्लस्टर झालं आहे. टोयोटा, जेएसडब्ल्यू, एथर सारख्या कंपन्यांमुळे पुढच्या काळात देशामध्ये सर्वाधिक इलेक्ट्रिक व्हेईकल्स मॅन्युफॅक्चरिंग करणारं क्लस्टर हे छत्रपती संभाजीनगरचंच असणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
*उद्योग क्षेत्राचा विस्तार – ८,००० एकर अधिग्रहण*
मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत असून त्या अनुषंगाने इन्फ्रास्ट्रक्चर तयार करत आहोत. आणखी ८,००० एकर जागा अधिग्रहित करून औद्योगिक वसाहत मोठी करत आहोत. या गुंतवणुकीमुळे रोजगार निर्मिती होत असून रोजगारातून समृद्धीकडे जाण्याचा प्रयत्न मराठवाड्यात होत आहे.
*सक्षम आणि जलद दळणवळण – ३५०० कोटींची तरतूद*
जालना ड्रायपोर्टचे काम सुरू झाले असून इलेक्ट्रिक व्हेईकल्सच्या आयात-निर्यातीची सुविधा तिथून होणार आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रातही मोठा वाव असून शेंद्रा-बिडकीन आणि बिडकीन-ढोरेगाव हे दोन रस्ते सहा पदरी करत आहोत, त्यासाठी साडेतीन हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शहरातील सर्वात लांब उन्नत रस्ता तयार करत असून पुढच्या काळात ट्रॅफिक जॅम होणार नाही.
*आरोग्य सुविधांचा विकास*
छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ७१० कोटींची नवीन इमारत, धाराशिवमध्ये ५०० खाटांचे अद्ययावत रुग्णालय व मेडिकल कॉलेज, परळीमध्ये ५६५ कोटी रुपये खर्चून पशुवैद्यकीय महाविद्यालय अशा अनेक सुविधांच्या विकासाचे काम सुरू केले आहे.
*सर्व घटकांच्या जीवनात परिवर्तन*
मराठवाडा हा आकांक्षी प्रदेश असून सगळ्यांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर आणण्याचे कार्य सुरू केले आहे. समाजातील सर्व घटकांच्या पाठीशी उभे राहून शिक्षण, रोजगार, आरोग्य सुविधा देऊन त्यांच्या जीवनात परिवर्तन आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
आपल्या संबोधनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुक्तिसंग्राम सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या भेटी घेतल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण लोहाडे आणि प्रवीणा कन्नडकर यांनी केले.
—
*





















