Home Trending Now नपुंसक समाज आणि लाचार कायदे! चिमुरड्यांवरचे अत्याचार थांबणार कधी? | विशेष संपादकीय...

नपुंसक समाज आणि लाचार कायदे! चिमुरड्यांवरचे अत्याचार थांबणार कधी? | विशेष संपादकीय – प्रो शीतल हरीश करदेकर-

40
0

*नपुंसक समाज आणि लाचार कायदे! चिमुरड्यांवरचे अत्याचार थांबणार कधी? | विशेष संपादकीय – प्रो शीतल हरीश करदेकर-

रोज सकाळी वर्तमानपत्र उघडलं की रक्ताचे पाट आणि टीव्ही स्क्रीनवर नराधमांच्या विकृतीच्या बातम्या अंगावर येतात. बदलापूर असो, कोलकाता असो की देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातील एखादं गाव… आज आपल्या काळजाचे तुकडे असणारी लहान मुलं आणि मुली सुरक्षित आहेत का?

श्रावणात भिंतीवर ‘जिवती’चं चित्र लावून मुलांच्या दीर्घायुष्याची आणि रक्षणाची भीक मागणाऱ्या या समाजात, प्रत्यक्ष जिवंत असणाऱ्या लेकरांची अब्रू रस्त्यावर आणि शाळांमध्ये लुटली जातेय. आता वेळ केवळ मेणबत्त्या पेटवून हळहळण्याची नाही, तर सिस्टीमच्या थोबाडीत मारून प्रश्न विचारण्याची आहे!

*१. कायद्याचा धाक की पोकळ धमक्या?*
गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती उरलेली नाही. ‘तारीख पे तारीख’ देणारी न्यायव्यवस्था नराधमांना पोसण्याचे कारखाने बनत चालली आहे. लहान मुलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फास्ट ट्रॅक कोर्टात ६ महिन्यांच्या आत कठोर शिक्षा झालीच पाहिजे. कायदे कागदावर नव्हे, तर रस्त्यावर धाक निर्माण करणारे हवेत!

*२. नराधमांचे संस्कार घरातूनच सुरू होतात!*
कोणताही अत्याचारी आकाशातून पडत नाही, तो याच समाजातील घरातून जन्माला येतो. आपण मुलींना ‘कसे वागावे’ चे हजार नियम सांगतो; पण मुलाला स्त्रीचा आदर करायला शिकवतो का? मुलाला ‘नाही’ चा अर्थ समजवा. त्याचा हिंसक हट्ट खपवून घेऊ नका. तो चुकत असेल तर पाठीशी घालू नका.

*३. शिक्षणाची व्याख्या बदला!*
शाळा फक्त टक्केवारी देणारे कारखाने झाल्या आहेत. आता गुड टच-बॅड टच हे ज्ञान तिसऱ्या वर्षापासूनच सक्तीने दिले पाहिजे. प्रत्येक शाळेत आत्मसंरक्षण (कराटे/मार्शल आर्ट्स) सक्तीचे करा. आपल्या मुलींनी रडत बसण्यापेक्षा नराधमाचा गळा आवळण्याची ताकद मनगटात निर्माण केली पाहिजे.

*४. व्हिक्टीम ब्लेमिंग बंद करा!*
‘तिने काय कपडे घातले होते?’ असले घाणेरडे प्रश्न विचारणारा हा विकृत समाज आहे. पीडितेला दोष देण्याऐवजी गुन्हेगारावर सामाजिक बहिष्कार टाका. रस्त्यावर छेड काढली जात असेल तर ‘मला काय त्याचे?’ म्हणून जाणाऱ्यांनीच समाज नपुंसक केला आहे.

*५. डिजिटल विष आणि सायबर वॉच*
इंटरनेटवर मोफत मिळणाऱ्या अश्लीलतेमुळे तरुण पिढी विकृत होत चालली आहे. पालकांनी मुलं मोबाईलवर काय पाहतात यावर कडक लक्ष ठेवले पाहिजे.

*शेवट…*
जिवतीची पूजा करताना जर आजूबाजूच्या मुली सुरक्षित नसतील, तर त्या पूजेला काही अर्थ नाही. मुलींना ‘देवी’ मानू नका, त्यांना माणूस म्हणून जगू द्या आणि मुलांना ‘राजे’ बनवण्याऐवजी ‘माणूस’ म्हणून घडवा. चला, आज माई मीडिया२४ च्या माध्यमातून संकल्प करूया— अन्याय सहन करणार नाही आणि नराधमांना सोडणार नाही!

*#MaiMedia24 #Editorial #BaalSuraksha*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here