Home मुंबई *’पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियानांतर्गत अंधेरी पश्चिम परिसरात ३८ अनधिकृत स्टॉल्सवर कारवाई*

*’पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियानांतर्गत अंधेरी पश्चिम परिसरात ३८ अनधिकृत स्टॉल्सवर कारवाई*

54
0

*’पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियानांतर्गत अंधेरी पश्चिम परिसरात ३८ अनधिकृत स्टॉल्सवर कारवाई*

*- अंधेरी (पश्चिम) रेल्वे स्थानक, विले पार्ले (पश्चिम) रेल्वे स्थानक, जोगेश्वरी (पश्चिम) रेल्वे स्थानक, विरा देसाई मार्ग आणि स्वामी विवेकानंद मार्गावरील अतिक्रमण हटविले*

बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या ‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियानाच्या अनुषंगाने अंधेरी (पश्चिम) परिसरातील अंधेरी रेल्वे स्थानक (पश्चिम), विले पार्ले (पश्चिम) रेल्वे स्थानक, जोगेश्वरी रेल्वे स्थानक (पश्चिम), विरा देसाई मार्ग आणि स्वामी विवेकानंद मार्गावरील एकूण ३८ अनधिकृत स्लॉल्सवर कारवाई करण्यात आली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून पादचाऱ्यांना सुरक्षित, सुकर आणि अडथळामुक्त मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी विविध विभागांमार्फत अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात येत आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात संपूर्ण मुंबईत २०० पदपथांवरील अतिक्रमण हटविण्यात येत आहे. या अभियान महानगरपालिकेच्या के पश्चिम विभाग कार्यालयांतर्गत गत आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे.

माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण बृहन्मुंबईमध्ये पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमण तत्काळ हटवून पदपथ अडथळामुक्त करण्यासाठी महानगरपालिकेकडून पादचारी प्रथम हे अभियान राबविण्यात येत आहे. मुंबईतील व्यावसायिक आणि नागरिकांनीही या अभियानाला सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

मुंबईतील पदपथ पादचाऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पादचारी प्रथम’अभियान हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार, विले पार्ले परिसरातील २७ रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. स्वामी विवेकानंद मार्गावरील मोठ्या प्रमाणात पादचारी वर्दळ असलेल्या परिसरातील पदपथ अडथळामुक्त करण्यावर भर देण्यात आला आहे. अंधेरी (पश्चिम) स्थानक परिसर, विले पार्ले (पश्चिम) स्थानक परिसर, जोगेश्वरी स्थानक परिसर, राम गणेश गडकरी मार्ग, वीरा देसाई मार्ग आणि स्वामी विवेकानंद मार्गावरील पहिल्या टप्प्यात ६ पदपथांवरील अतिक्रमण काढण्यात आले.

सह आयुक्त (परिमंडळ ४) डॉ. भाग्यश्री कापसे, सहायक आयुक्त (के पश्चिम विभाग) श्री. चक्रपाणी अल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अंधेरी पश्चिम स्थानक, विले पार्ले पश्चिम स्थानक, जोगेश्वरी स्थानक आणि स्वामी विवेकानंद मार्गावरील पादचाऱ्यांसाठी पदपथावरील मार्ग मोकळा झाला आहे. गर्दीच्या वेळेत होणारी वाहतूक व पादचारी कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच स्वामी विवेकानंद मार्गाच्या दिशेने नागरिकांना आता अडथळामुक्त पदपथ मिळणार आहे. या कारवाईसाठी ०१ जेसीबी, ०१ डंपर, ०७ हून अधिक अधिकारी-कर्मचारी, १५ कामगार तसेच ०५ हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले.

‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियानांतर्गत सॅण्डहर्स्ट रोड परिसरातही अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आली. वाडीबंदर येथील पदपथावरील अनिकृत दुकाने आणि स्टॉल्सवर कारवाई करण्यात आली. उप आयुक्त (परिमंडळ १) श्रीमती चंदा जाधव, सहायक आयुक्त श्री. जितेंद्र घोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here